Krushi Salla : मराठवाड्यात पुन्हा एकदा निसर्गाचा तडाखा बसणार आहे. प्रादेशिक हवामान केंद्र आणि कृषी विद्यापीठाने हवामान कृषी सल्ला दिला आहे.(Krushi Salla)
हवामानाचा अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या अंदाजानुसार,२७ जुलैपर्यंत मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार आणि काही ठिकाणी खूप मूसळधार पावसाची शक्यता आहे.
विशेषतः परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पावसामुळे हवामानात गारवा जाणवेल, आणि पुढील २-३ दिवसांत कमाल तापमानात २-३ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन, ज्वारी, बाजरी, ऊस, हळद
* पिकात पाणी साचू नये, यासाठी निचरा सुनिश्चित करा.
* वापसा असताना अंतरमशागती व तण नियंत्रण करावे.
* अळ्या व घाटेअळीच्या प्रादुर्भावासाठी फवारणी करावी.
प्रोफेनोफॉस ५०% EC – २० मि. / १० लिटर पाणी
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ४.९% – ६ मि. / १० लिटर पाणी
सोयाबीनमध्ये पिवळेपणा दिसल्यास
* मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 (५० मि./१० लिटर पाणी) फवारावे.
* पांढऱ्या माशीवर नियंत्रणासाठी १० पिवळे चिकट सापळे प्रति एकर बसवावेत.
फळबाग व्यवस्थापन
मोसंबी, संत्रा, डाळिंब व चिकू
* अतिरिक्त पाणी थांबणार नाही याची दक्षता घ्या.
* अंतरमशागती व तण नियंत्रण वापसा पाहून करावे.
* कीटकनाशक फवारणीसाठी उघडीपाची वाट पाहावी.
* डाळिंब बागेत अतिरिक्त फुटवे काढावेत.
* ००:५२:३४ खताची फवारणी (१५ ग्रॅम/लिटर) करावी.
भाजीपाला व फुलशेती
भेंडी, कारले, दोडका आदी भाजीपिकांची वापसा असताना लागवड/पुर्नलागवड करावी.
वांगी, मिरची, टोमॅटो रोपांना ४५ दिवस झाल्यास पुर्नलागवड करावी.
किडीच्या नियंत्रणासाठी
* पायरीप्रॉक्सीफेन ५% + फेनप्रोपाथ्रीन १५% - १० मि./१० लिटर पाणी
पशुधन व गोठा व्यवस्थापन
गोठ्यात स्वच्छता राखावी, ओलसर खाद्य देऊ नये.
संसर्गजन्य रोगांपासून बचावासाठी पशुवैद्यकीय सल्ल्याने लसीकरण करावे.
शेतकऱ्यांसाठी सूचना
पुढील २ दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने फवारणी व खतमात्रा देण्याची कामे पुढे ढकलावीत.
पाऊस थांबल्यावर आणि जमिनीत वापसा झाल्यावरच शेती कामे व फवारणी करावीत.
हवामानाच्या बदलाचा नियमित आढावा घ्यावा व वेळेवर उपाययोजना कराव्यात.
(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषि मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
हे ही वाचा सविस्तर : Mosambi Farming : शेतात शास्त्रज्ञ उतरले; मोसंबी फळगळीवर नियंत्रणाची मोहीम