Join us

Krushi Salla : सोयाबीन–ज्वारी पिकांना धोका; शेतकऱ्यांनी काय करावे? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 10:32 IST

Krushi Salla : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाने दिला आहे कृषी सल्ला वाचा सविस्तर

Krushi Salla : मराठवाड्यात पुन्हा एकदा हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

पुढील काही दिवसांमध्ये छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, बीड, हिंगोलीसह इतर जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, जोरदार वारे व मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिकांची, मालाची आणि जनावरांची तातडीने काळजी घेणे आवश्यक आहे.

हवामानाचा अंदाज

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात तूरळक ठिकाणी वादळी वारा (ताशी ३० ते ४० किमी वेगाने), विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मराठवाडा प्रदेशात ७ व ८ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पुढील चार-पाच दिवसांत कमाल आणि किमान तापमानात विशेष फरक जाणवणार नाही.

शेतकऱ्यांसाठी कृषि सल्ला

पीक व्यवस्थापन

सोयाबीन 

पिकात पाणी साचू देऊ नका, निचरा करा.

पाने खाणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी, खोडकिडीवर नियंत्रणासाठी योग्य कीटकनाशकांची फवारणी पावसाच्या उघडीप बघून करावी.

रोगप्रादुर्भाव (रायझोक्टोनिया, करपा, चारकोल रॉट) दिसल्यास बुरशीनाशकांचा वापर करावा.

पांढरी माशी नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे लावा, पिवळा मोझॅक ग्रस्त झाडे उपटून टाकावीत.

खरीप ज्वारी 

लष्करी अळी नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट किंवा स्पिनेटोरमची फवारणी.

कीटकनाशक थेट पोंग्यात पोहोचेल अशा पद्धतीने फवारणी करावी.

ऊस 

पांढरी माशी, पाकोळी व लाल कुज रोग यासाठी फवारणी करावी.

पोक्का बोइंग व लाल कुज रोग व्यवस्थापनासाठी बुरशीनाशकांचा वापर.

खत व्यवस्थापन योग्य प्रकारे करून उसाची वाढ सुरळीत ठेवावी.

हळद 

अतिरिक्त पाणी निचरा करून झाडे सडू देऊ नयेत.

कंदमाशी व पानावरील रोगांवर फवारणी करावी.

उघडे कंद मातीने झाकावेत व वेळेवर भरणी करावी.

फळबाग व्यवस्थापन

संत्रा/मोसंबी - फळवाढीसाठी ००:५२:३४ खत फवारावे. फळगळ टाळण्यासाठी झिंकयुक्त फवारणी करावी.

डाळींब - तेल्या रोग टाळण्यासाठी बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड फवारावे. अतिरिक्त फुटवे काढून टाकावेत.

चिकू - पाण्याचा निचरा करून मुळाशी पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.

भाजीपाला

पिकात पाणी साचू नये म्हणून निचरा करावा.

काढणीस तयार भाजीपाला त्वरित काढून सुरक्षित करावा.

शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीवर नियंत्रणासाठी सापळे लावा किंवा कीटकनाशक फवारणी करावी.

फुलशेती

फुलपिकाची तातडीने काढणी करावी.

जमिनीत ओलावा टिकून असेल तेव्हा तणनियंत्रणाची कामे करावीत.

पशुधन व्यवस्थापन

गोठ्यातील वाढलेली आर्द्रता गोचीडासह इतर कीटक वाढीस पोषक ठरते. त्यामुळे गोठ्यातील भेगा-फटी स्वच्छ करून किडींचा नायनाट करावा.

जनावरांना कोरड्या, हवेशीर जागी बांधावे.

तुती व रेशीम उद्योग

तुतीच्या बागेत रासायनिक खतांचा अतिरेकी वापर टाळावा.

रेशीम कीटकानंतर उरलेल्या पानांपासून गांडूळखत तयार करून सेंद्रिय खताचा वापर करावा.

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी पिकांमध्ये पाणी साचू देऊ नये, कीड-रोग नियंत्रणासाठी योग्य वेळी फवारणी करावी आणि काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Cotton Crop Protection : कापसाचे बोंड वाळतायत; कीड नियंत्रण हाच पर्याय वाचा सविस्तर 

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी विज्ञान केंद्रशेतकरीशेतीमराठवाडा