Join us
Daily Top 2Weekly Top 5

Krushi Salla : सोयाबीन, ज्वारी, बाजरी पेरणीसाठी उपयुक्त माहिती इथे वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 16:24 IST

Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवसांसाठी वादळी वाऱ्यांची शक्यता, पेरणीस अजून थांबा. कृषि विद्यापीठाचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला. योग्य वेळ, योग्य पीक, योग्य बिजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. (Krushi Salla)

Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवसांसाठी वादळी वाऱ्यांची शक्यता, पेरणीस अजून थांबा. कृषि विद्यापीठाचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला. योग्य वेळ, योग्य पीक, योग्य बिजप्रक्रिया करणे आवश्यक आहे.(Krushi Salla)

हवामानाचा अंदाज व चेतावनी

मराठवाड्यात बहुतांश भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील २ दिवसांत कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने वाढ अपेक्षित आहे. नंतर स्थिर हवामान राहिल. किमान तापमानात विशेष फरक नाही.

सामान्य कृषी सल्ला

पेरणी करण्याची घाई करू नका.

पेरणीयोग्य पाऊस (७५-१०० मिमी) झाल्यानंतरच पेरणी करावी.

बिजप्रक्रिया केल्यानंतरच पेरणी करा.

रोगप्रतिबंध व मातीमधील जिवाणूंचा फायदा मिळतो.

पेरणीची अंतिम मुदत १५ जुलैपर्यंत सर्व खरीप पिकांची पेरणी करता येते. यात प्रामुख्याने मूग, उडीद, भुईमूग ही  पिके सोडून करावी. 

पीक व्यवस्थापन

सोयाबीन : सोयाबीनची पेरणी ४५X५ सें.मी. अंतरावर व २.५ ते ३.० सें.मी. खोलीवर करता येते. सोयाबीन पेरणीसाठी हेक्टरी ६५ किलो बियाणे वापरावे. 

सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्वी कार्बोक्झिन ३७.५% + थायरम ३७.५% (मिश्र घटक) या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम किंवा ॲझोक्सीस्ट्रोबीन २.५ टक्के + थायोफॅनेट मिथाईल ११.२५ टक्के + थायोमिथॉक्झाम २५ टक्के एफ एस १० मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी. 

बुरशीनाशकाच्या बिजप्रक्रियेनंतर थायामिथोक्झाम ३०% एफएस १० मिली प्रति किलो ग्रॅमची बिजप्रक्रिया करावी. वरील बिजप्रक्रियेनंतर बियाण्यास रायझोबियम जिवाणू खत ( ब्रेडी रायझोबियम) + स्फुरद विरघळविणारे जिवाणू खताची (पी.एस.बी.) २५० ग्रॅम प्रति १० किलो किंवा १०० मिली/१० किलो ग्रॅम (द्रवरूप असेल तर) याची बिजप्रक्रिया करावी व नंतर बियाणे सावलीमध्ये वाळवून शक्य तेवढ्या लवकर पेरणी करावी. 

बिजप्रक्रियेसाठी व.ना.म.कृ. वि. परभणी निर्मित द्रवरूप जैविक खताचा (रायझोफॉस) १० मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणात वापर करता येतो. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते. 

पेरणीपूर्वी सोयाबीन बियाण्याची तपासून पाहावी, उगवण क्षमता ७०% पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे. 

ज्वारी : खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी दोन ओळीमध्ये ४५ सें.मी., दोन झाडातील अंतर १२.५ सें.मी. ठेवावे व पेरणी ३ ते ४ सें.मी. खोलीवर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी ७.५ किलो संकरित व १० किलो सुधारीत वाणांचे बियाणे वापरावे. 

खरीप ज्वारीच्या पेरणीपूर्वी गंधक ३०० मेश ४ ग्रॅम किंवा थायरम ७५ टक्के ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी. तसेच इमिडाक्लोप्रीड ४८ टक्के एफएस १४ मिली किंवा थायमिथॉक्झाम ३० टक्के १० मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी) प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी.   

बाजरी : बाजरीची पेरणी ४५X१५ सें.मी. अंतरावर करता येते. पेरणी करतांना ४ सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बाजरी पेरणीसाठी हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. बाजरी पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास मेटालॅक्झील ३५% एसडी ६ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी.

२५० ग्रॅम ॲझोस्पिरीलम १० किलो बियाण्यास चोळून पेरणी करावी किंवा शेवटी ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पीएसबी) प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे याप्रमाणात बियाण्यावर बिजप्रक्रिया करून पेरणी करता येते. 

ऊस : ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस २०% २५ मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल १८.५% ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.  

हळद : हळद पिकाची लागवड करून घ्यावी. हळद लागवडीपूर्वी बियाण्यास क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली + कार्बेंडेझीम ५० टक्के १० ग्रॅम किंवा डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मिली + डायथेन एम-45 २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १००-१२० किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. बियाणे १० ते १५ मिनिट द्रावणात बुडवून ठेवावे.

फळबाग व्यवस्थापन

संत्रा नविन बाग लागवडीसाठी नागपूर संत्रा, किन्नो तर मोसंबी नविन बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सातगुडी व फुले मोसंबी इत्यादी जातींची निवड करावी. 

लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. 

अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत रोगनाशकाची फवारणी पावसाची उघडीप बघून करावी. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत फळगळ व्यवस्थापनासाठी,  चिलेटेड झिंक ५०० ग्रॅम + जिब्रॅलिक ॲसिड १.५ ग्रॅम १०० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. 

डाळींब नविन बाग लागवडीसाठी भगवा, फुले भगवा सुपर, गणेश, फुले आरक्ता आदी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. मृग बहार धरलेल्या डाळींब बागेत तेल्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी रोगनाशकाची पावसाची उघडीप बघून फवारणी करावी. 

चिकू नविन बाग लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल आदी जातींची निवड करावी. चिकू बागेत तणांचे नियंत्रण करावे.

भाजीपाला

पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला (वांगी, मिरची, टोमॅटो आदी) पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. 

भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनुसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पाण्याची उपलब्धता असल्यास फुल पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनुसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

रेशीम उद्योगात वर्षभर १२ लोकांना रोजगार उपलब्ध होतो. चीन देशात १ दश लक्ष लोकांना तर भारतात ७.९ दश लक्ष लोकांना रेशीम उद्योगात रोजगार उपलब्ध होतो. 

खेड्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हि काळाची गरज असून शेतीवर आधारित पशुपालन, कुकुटपालन, शेळी, मेंढी, दुग्ध व्यवसाय आणि रेशीम उद्योगामुळे शेतीची अर्थकारण बळकट होण्यास मदत मिळते. 

शहराकडे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवण्याची क्षमता रेशीम उद्योगात आहे. समाजात १२ बलुतेदाराबरोबर विणकर, बुनकर, रंगारी, कातारी यांना पण रेशीम उद्योगामुळे खेड्यात रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात वातावरणातील आर्द्रता, तापमानातील बदल, पाणी साचणे, चिखल होणे, माश्या व इतर कीटकाचा प्रादुर्भाव दिसून येतो, या कारणाने पशुधनाचे आरोग्य बिघडते, त्यासाठी खालील उपाययोजना करणे गरजेचे आहे.

पशुधनासाठी सुरक्षित व स्वच्छ निवाऱ्याची व्यवस्था करणे, गोठ्याच्या परिसरात पाऊसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, दर १५ दिवसाने गोठ्याचे पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने निर्जंतुकिकरण करावे. 

महत्वाची बाब लक्षात ठेवा

बाबसल्ला
पेरणीपावसावर अवलंबून (७५ मिमीनंतर)
खत वापरसेंद्रिय व जैविक खताचा वापर करा
तापमानकमाल तापमानात थोडी वाढ
रोग/किड नियंत्रणबिजप्रक्रिया आणि योग्य फवारण्या आवश्यक
फळबागरोपे फक्त शासकीय नोंदणीकृत केंद्रातून खरेदी करा

(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Herbicide Spray: तण नियंत्रणाची योग्य वेळ; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकृषी विज्ञान केंद्रमराठवाडामराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक