Join us

Krushi Salla : पावसाचा जोर कायम; शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:58 IST

Krushi Salla : मराठवाड्यात २० सप्टेंबरपर्यंत वादळी वारे, मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पावसाळी वातावरणात पिकांचे संरक्षण, फळबागांची काळजी आणि पशुधनाची योग्य देखभाल यासाठी कृषी तज्ज्ञांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.वाचा सविस्तर (Krushi Salla)

Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार, २० सप्टेंबरदपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  (Krushi Salla)

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली व धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, वादळी वारे (३०-४० किमी/ता) व मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पिकांच्या संरक्षणासाठी खालील उपाय महत्त्वाचे ठरतील. (Krushi Salla)

सामान्य सल्ला

शेतात पाणी साचू नये यासाठी निचऱ्याची सोय ठेवा.

फवारणी व आळवणी करताना हवामानाची उघाड पाहूनच कामे करा.

पुढील आठवड्यात पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहू शकतो, त्यामुळे शेतातील पिके व साठवण सुरक्षित ठेवा.

पीक व्यवस्थापन

कापूस

पिकात पाणी साचू देऊ नका, अतिरिक्त पाण्याचा निचरा करा.

मूळकूज किंवा आकस्मिक मर दिसल्यास: २०० ग्रॅम युरिया + १०० ग्रॅम पांढरा पोटॅश + २५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड १० लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक झाडास १०० मिली प्रमाणे आळवणी करा.

आंतरिक व बाह्य बोंडसड टाळण्यासाठी शिफारशीनुसार बुरशीनाशकांची फवारणी पावसाच्या उघाड पाहून करा.

रसशोषक कीड दिसल्यास निंबोळी अर्क (५%) किंवा शिफारसीतील कीटकनाशक फवारणी करा.

तूर

पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.

पाने गुंडाळणाऱ्या अळीवर निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस फवारणी करा.

मर रोग दिसल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड + युरिया + पांढरा पोटॅश यांचे द्रावण झाडांच्या मुळाशी द्या; ट्रायकोडर्मा/बायोमिक्सचा वापर करा.

मका

शेतात पाणी साचू देऊ नका.

लष्करी अळी आढळल्यास इमामेक्टिन बेन्झोएट किंवा स्पिनेटोरमची आलटून-पालटून फवारणी करा.

मूग/उडीद

काढणीस तयार शेंगा वेळेत काढून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवा.

फळबाग व्यवस्थापन

केळी: पाणी साचणार नाही याची काळजी घ्या; झाडांना माती चढवा व आधार द्या. काढणीस तयार घड सुरक्षित ठेवा.

आंबा: मॉलफॉरमेशन व इतर रोग टाळण्यासाठी किटकनाशकाची फवारणी पावसाची उघाड पाहून करा.

द्राक्ष: रोगग्रस्त पाने काढून टाका; पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या.

सिताफळ: पिठ्या ढेकूण किडीवर निंबोळी तेल किंवा लिकॅनिसिलीयम लिकॅनी फवारणी करा. तयार फळे सुरक्षित ठिकाणी ठेवा.

भाजीपाला व फुलशेती

पाणी साचणार नाही याची खात्री करा.

काढणीस तयार पिके वेळेवर काढा.

लागवडीत झालेली तूट लगेच भरून काढा.

फुलांच्या झाडांवर पाणी साचल्यास त्वरित निचरा करा.

पशुधन व्यवस्थापन

जनावरांना स्वच्छ व कोरडे खाद्य द्या.

पावसाळ्यात खाद्य योग्यरीत्या साठवा.

शेळ्यांना जंतनाशक औषध पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्या.

(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Fungal Diseases : संत्रा पिकात बुरशीजन्य रोग? जाणून घ्या सुरक्षितता उपाय

टॅग्स :शेती क्षेत्रपीकपीक व्यवस्थापनशेतकरीशेती