Kitchen Smoke Health Effects : किचनमधील धुराचा आरोग्यावर होणारा परिणाम आणि त्यावरील प्रभावी उपाय स्वयंपाकघरात काम करताना निघणारा धूर वरवर सामान्य वाटत असला, तरी तो आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. (Kitchen Smoke Health Effects)
विशेषतः जर किचनमध्ये हवा खेळती नसेल, तर या धुराचे गंभीर परिणाम शरीरावर होतात.(Kitchen Smoke Health Effects)
धुराचे आरोग्यावर होणारे परिणाम
किचनमधील धुरामुळे शरीराच्या विविध अवयवांवर खालीलप्रमाणे परिणाम होऊ शकतात
श्वसनसंस्थेचे आजार : धुरातील सूक्ष्म कण फुफ्फुसात गेल्याने खोकला, दम लागणे आणि दमा यांसारख्या समस्या उद्भवतात. दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास 'ब्रॉन्कायटिस'चा धोका वाढतो.
हृदयावर ताण : धुरातील कार्बन मोनोऑक्साइड आणि विषारी वायू रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी करतात, ज्यामुळे हृदयावर ताण येतो.
कर्करोगाचा धोका : तेलाच्या अति उष्णतेमुळे निघणारा धूर सतत श्वासाद्वारे शरीरात गेल्याने फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका संभवतो.
डोळ्यांच्या तक्रारी : धुरामुळे डोळे लाल होणे, पाणी येणे आणि खाज सुटणे अशा समस्या जाणवतात.
त्वचा आणि इतर समस्या : धुरामुळे त्वचेची छिद्रे बंद होऊन अकाली सुरकुत्या पडू शकतात. तसेच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, चक्कर येणे आणि थकवा जाणवू शकतो.
धुराचा त्रास कमी करण्यासाठी उपाय
आरोग्याचे रक्षण करण्यासाठी स्वयंपाकघरात खालील बदल करणे आवश्यक आहे.
वेंटिलेशन : स्वयंपाक करताना खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवावेत. हवेचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी 'इलेक्ट्रिक चिमणी' किंवा 'एक्झॉस्ट फॅन'चा वापर करणे सर्वात प्रभावी ठरते.
सुरक्षित पद्धती : फोडणी देताना नाक आणि तोंड मास्क किंवा रुमालाने झाकून घ्यावे. तेल अतिशय जास्त तापवून त्याचा धूर निघू देऊ नये आणि रिफाइंड तेलाचा वापर मर्यादित ठेवावा.
हवा शुद्ध करणारी झाडे : किचनमध्ये किंवा खिडकीत हवा शुद्ध करणारी झाडे लावल्याने प्रदूषके कमी होतात आणि ऑक्सिजनची पातळी वाढते.
हवा शुद्ध करणारी काही महत्त्वाची झाडे
खालील झाडे घरातील हवा नैसर्गिकरित्या शुद्ध ठेवण्यास मदत करतात.
तुळस : ही दिवसातील २० तास ऑक्सिजन देते आणि हानिकारक वायू शोषून घेते.
कोरफड : रात्रीच्या वेळी ऑक्सिजन सोडते आणि हवेतील 'बेंझिन' व 'फॉर्मल्डिहाइड' सारखे विषारी घटक काढून टाकते.
स्नेकप्लांट : कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेण्यात आणि रात्री ऑक्सिजन सोडण्यात हे अत्यंत कार्यक्षम आहे.
पिंपळ : मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन उत्सर्जित करण्यासाठी ओळखले जाणारे हे झाड बोन्साय स्वरूपात कुंड्यांमध्ये लावता येते.
इतर झाडे : अरेकापाम (हवेतील आर्द्रता टिकवते), मनीप्लांट (प्रदूषके काढून टाकते) आणि ऑर्किड ही झाडे देखील हवा शुद्ध ठेवण्यास उपयुक्त आहेत.
या उपायांचा अवलंब केल्यास आपण आपल्या कुटुंबाला किचनमधील धुराच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित ठेवू शकतो.
(लेखक डॉ. अंगद प्र. गरडे हे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे उद्यानविद्या विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. संपर्क क्रमांक ८४०८८३८४५०)
(लेखिका प्रा. अंकिता काळे (गरडे) या कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथे मृदा विज्ञान व कृषि रसायने विभागात माजी सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या.)