Kanda Sathvanuk : एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस आणि काही भागात झालेल्या गारपीटीमुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. त्यात प्रामुख्याने कांदा पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेले आहे.
विषम वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कांदा पिक पोसण्याच्या आधीच माना पडल्या आहेत. त्यामुळे कांदा पूर्ण पाने पोसला नसून गोलटी आणि चिंगळी कांद्याचे अधिक प्रमाण काढणीदरम्यान आढळून येत आहे. कांदा चाळी मध्ये दीर्घ काळ टिकावा या साठी खालील उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणे गरजेचे आहे.
- चाळीमध्ये मागील वर्षाच्या साठवूकीतील कांद्या वरील बुरशी आणि काही कीटकांच्या अवस्था सुप्तावस्थेत असल्याने त्यांच्या नियंत्रणासाठी चाळ निर्जंतुक करणे गरजेचे आहे.
- निर्जंतुकीकरणासाठी स्पर्शजन्य बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांची फवारणी करावी.
- कांदा काढल्यानंतर शेतात ३ ते ४ दिवस अशा पद्धतीने सुकवावा की दुसऱ्या ओळीच्या पातीने पहिल्या ओळीचा फक्त कांदा झाकावा.
- या पद्धतीने ३-४ दिवस साठवणूक केलेल्या कांद्याची पूर्ण सुकलेली पात ३ ते ४ सें.मी. लांब नाळ ठेवून कापावी
- पात कापल्यानंतर कांद्याची प्रतवारी करून जोडकांदा, डेंगळे आलेला कांदा आणि चिंगळी कांदा निवडून वेगळा करावा.
- चांगला कांदा एकत्र गोळा करून सावलीत ढीग घालून १० ते १५ दिवस राहू द्यावा.
- ५५ ते ७५ मि.मी. जाडीचे कांदे साठवणीत ठेवावेत. लहान व गोलटी कांदा साठवणीत लवकर सडतो.
- कांदा उपटताना जखमा झालेला कांदा चाळीत लवकर खराब होतो आणि त्याचा संसर्ग इतर कांद्यांना होत असल्यामुळे असा कांदा निवळून वेगळा करावा. त्याची चाळीत चांगल्या कांद्यासोबत साठवण टाळावी.
- कांदा चाळीत साठवताना पाखीमध्ये ४ ते ५ फुटांपेक्षा जास्त थर लावू नये. चाळीमध्ये हवा खेळती राहील यासाठी उपाययोजना कराव्यात.
- पवन मधुकर चौधरी, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या, कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव