Kanda Storage : सद्यस्थितीत कांद्याला बाजारभाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी साठवणुकीवर भर देत आहेत. रब्बी (उन्हाळी) कांदा साठवण ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, जी कांद्याचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि बाजारभावाला स्थिरता देण्यासाठी मदत करते.
रब्बी हंगामात (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) लागवड केलेल्या कांद्याची साठवणूक योग्य पद्धतीने केल्यास, तो 4 ते 6 महिने टिकतो. त्यामुळे साठवणूक कशी महत्वाची आहे, ते समजून घेऊयात...
रब्बी (उन्हाळ) कांदा साठवण
जून ते ऑक्टोबर या काळात कांद्याची काढणी होत नसते. खरिपाचा नवीन कांदा ऑक्टोबरनंतर बाजारात येऊ लागतो. खरी साठवण ही रब्बी कांद्याची करावी लागते. ही साठवण फायदेशीर ठरते. स्थानिक बाजारपेठेत दराची स्थिरता आणि निर्यातीसाठी कांद्याची उपलब्धता वाढविण्यासाठी साठवण आवश्यक आहे.
कांदा साठवणगृहाचे नैसर्गिक हवादार कांदाचाळी व शीतगृहे असे दोन प्रकार आहेत. शीतगृहामध्ये ५ अंश सेल्सिअस तापमानापेक्षा कमी तापमानात कांदा टिकतो. परंतु शीतगृहातून कांदा बाहेर काढल्यानंतर लगेच कोंब येण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्याचे बाजारमूल्य कमी होते. तसेच शीतगृह उभारणीसाठी जास्त खर्च येतो.
त्यामुळे कमी खर्चाच्या नैसर्गिक हवादार कांदाचाळींची उभारणी करणे फायद्याचे ठरते. सुधारित नैसर्गिक हवादार कांदाचाळी एक पाखी व दोन पाखी अशा दोन प्रकारच्या असतात. साठवणगृहात ६५ ते ७० टक्के आर्द्रता आणि २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आवश्यक आहे. साठवणगृहात अधिक आर्द्रता (७५ ते ८० टक्के) असल्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊन कांदा सडतो. आर्द्रता एकदम कमी (६५ टक्क्यांपेक्षा कमी) झाल्यास कांद्याचे उत्सर्जन वाढून वजनात घट येते).
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी जि. नाशिक