Kanda Sathavnuk : कांदा भारतीयांच्या दैनंदिन आहारातील एक प्रमुख घटक आहे. वेगवेगळी व्यंजने बनविण्यासाठी कांदा हा गरजेचा असतो. त्यामुळे कांद्याला कमी अधिक प्रमाणातवर्षभर मागणी असते. जून ते नोव्हेंबर पर्यंत देशात अंतर्गत बाजारपेठेसाठी ४४ लाख टन, निर्यातीसाठी १० लाख टन कांद्याची (Kanda Storage) आवश्यकता असते. ३० टक्के कांदा साठवणीत सडला असे गृहीत धरले तरी या काळात ३० लाख टन कांद्याची आवश्यकता भासते.
त्यामुळे या काळात ३० लाख टन कांदा साठवणे (Kanda Sathavnuk) आवश्यक आहे. महाराष्ट्राचा विचार करता १२ लाख टन कांद्याची साठवण केली जाते. त्यामुळे कांदा साठवणीला मोठ्या प्रमाणावर वाव आहे. कांदा जिवंत असल्याने त्याची श्वसनाची क्रिया मंदपणे सुरूच असते. या दरम्यान पाण्याचे उत्सर्जन देखील होत असते. खालील कारणांमुळे साठवणीमध्ये कांद्याचे नुकसान होते.
वजनातील घट -रब्बी हंगामातील कांदा लागवड ही साठवणुकीच्या उद्देश्याने केली जाते. कांदा काढणीनंतर कांद्याची साठवण करण्यापूर्वी शेतातच सुकवणे अत्यावश्यक असते. कांदा काढल्यानंतर व्यवस्थित जरी सुकवला तरी एप्रिल ते जून या दरम्यानचे अधिकचे तापमान तसेच साठवण गृहांची सदोष रचना यामुळे कांद्यातील पाण्याचा आणि कर्बोदकांचा ऱ्हास होतो. पाण्याच्या उत्सर्जनामुळे जातीपरत्वे २५ ते ३० टक्के वजनात घट आढळून येते.
सड -कांदा काढणी करत असतांना उपटून काढल्यामुळे जखमा होतात. कांदा काढणीच्या नंतर व्यवस्थित सुकवला न गेल्यास जखमा भरल्या जात नाहीत. तसेच कांद्याची तोती ३ ते ४ सें.मी. न ठेवता जवळून कापल्याने सुद्धा जखमा होतात. या दोन्ही परिस्थितींमध्ये बुरशी आणि जंतूंचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने कांदा सडतो. सडी मुळे कांद्याचे या काळात १० ते १५ टक्के नुकसान होते.
कांदा सुकविणे -कांदा काढणीच्या आधी माना पडत असतांना कांद्याला सुप्तावस्था आणण्यासाठी कारणीभूत असणारे अॅबसेसीस अॅसिड तयार होते. रब्बी कांदा व्यवस्थित वाळवून चाळीत साठवला जातो. रब्बी कांदा सुकवून सुप्तावस्था प्राप्त होऊन चाळीत साठवल्यामुळे लगेच कोंब येत नाहीत, पंरतु ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात कमी तापमानामुळे रासायनिक बदल होऊन कांद्यामध्ये जिब्रेलिक अॅसिडचे प्रमाण वाढते व कांद्याची सुप्तावस्था संपते आणि कोंब बाहेर येतात. या काळात कोंब येण्यामुळे जातीपरत्वे १० ते १५ टक्के नुकसान होते.
- पवन मधुकर चौधरी, विषय विशेषज्ञ- उद्यानविद्या, कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव, नाशिकस्त्रोत- भा.कृ.अ.प.- कांदा आणि लसूण संशोधन संचलनालय, राजगुरुनगर, पुणे