मंडळी रामराम!
खरीप कांदा रोपवाटिका तयार करण्यासाठी बियाण टाकताय? थोडं थांबून मिराताई आणि तुकाराम भाऊचा संवाद ऐका आणि मग ठरवा कशी करायची यंदा कांदा रोपवाटिका? मीराताई : काय तुकारामभाऊ, कांद्याची रोपवाटिका तयार केली का?तुकाराम : हो मीराताई, पण काळजी वाटतेय. रोपं काहीशी पिवळी पडायला लागलीत. पाणी दिल्यानंतर वाफ्यात पाणी साचतंय.
मीराताई (हसत) : म्हणून आम्ही गादीवाफ्यावर रोपवाटिका करतो! बघा भाऊ तुकाराम : गादीवाफा हे काय असतंय आणि त्यानं काय होतंय आणि त्यो कसा करायचा ?
मिराताई : चल सांगते.. अरं यामुळं पाण्याचा निचरा योग्य होतो, त्यामुळे मुळं कुजत नाहीत.माती भुसभुशीत राहते आणि मुळांना हवा मिळते.बुरशी व किडींपासून बचाव होतोmरोपं जोमदार, हिरवीगार वाढतात.
गादीवाफा कसा तयार करायचा?
लांबी: ३ मीटर (१० फूट)रुंदी: १ मीटर (३ फूट)उंची: १५–२० से.मी. (६–८ इंच)
माती भुसभुशीत करून त्यात चांगले कुजलेले शेणखत व कंपोस्ट मिसळायचं वाफ्याच्या बाजूला लहान नाल्या तयार करा जेणेकरून पाणी सहज निचरा होईल.नंतर रांगेत बियाणं पेरायच किंवा लावायच.
तुकाराम : पण मीराताई, कांद्याचं बियाणं जुने आहे. उगम होईल का कसं कळणार?मीराताई : खूप सोपं आहे भाऊ! १०० बियाणे निवडा.त्यांना ओलसर कापडात गुंडाळा किंवा ताटलीत ठेवा.रोज थोडंसं पाणी शिंपडा!७-८ दिवसांनी मोजा किती बियाण्यांनी उगम घेतला. ७५-८०% उगम झाला असेल, तर बियाणं वापरण्यास योग्य आहे.
मीराताई : आणि हो, बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी बिजप्रक्रिया करावीच लागते. थायरम किंवा कार्बेन्डाझिम (2 ग्रॅम प्रति किलो बियाणे) याने बियाणं चोळावं.नंतर 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणे याने प्रक्रिया करा.हे केल्याने मातीतील बुरशींपासून बचाव होतो आणि उगम टक्केवारी वाढते.
तुकाराम : म्हणजे मी सपाट वाफ्यात उगम घेतलेली रोपं धोक्यात टाकलीत.मीराताई : हो भाऊ! सपाट वाफ्यात पाणी साचतं, माती घट्ट होते, किडी-रोग वाढतात. गादीवाफ्यावर अशी समस्या होत नाही, अरं हे सगळं शिकाया तर जातोय बघ आम्ही शेतीशाळेला.
तुकाराम (हसत) : मीराताई, पुढच्या वेळी गादीवाफा, बियाण्याची उगमक्षमता तपासणी आणि बिजप्रक्रिया तिन्ही करतो! आणि होय शेतीशाळेला सुद्धा येतो बघ. मीराताई : बरोबर! या पद्धतींनी कांद्याची रोपं जोमदार होतील, रोपं जोमदार तर पिक जोरदार आणि मग उत्पादन हमखास वाढल.
- श्रीमती सोनाली कदम, सहाय्यक कृषि अधिकारी, आडगाव चोथवा, तालुका- येवला, जिल्हा- नाशिक