Agriculture News : खरड छाटणीनंतर सूक्ष्मघडनिर्मितीच्या कालावधीत नत्र बंद करून पाणी कमी केले जाते. आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या द्राक्षजातींनुसार वाढीचा वेग कमी-अधिक असतो. जमिनीचे प्रकारही वेगवेगळे असल्यामुळे जलधारणक्षमताही कमी-अधिक असते. यामुळे वेलीला नेमका ताण किती द्यायचा, याचे गणित आपल्याकडे नसते.
साधारण परिस्थितीत पाण्याचा ताण देतो, त्यावेळी फुटींची वाढ नियंत्रणात राहते. जमिनीत दिलेल्या पाण्यानुसार बगलफुटी कमी-अधिक प्रमाणात निघतात. मात्र वेलीला पाण्याचा ताण जास्त बसल्यामुळे काडीच्या परिपक्वतेमध्ये अनियमितता दिसून येईल.
काडी परिपक्वतेच्या कालावधीत साधारण जून-जुलै महिन्यांमध्ये झालेल्या पावसामुळे वेलीमध्ये काही बदल दिसून येतात. यावेळी एक प्रकारचा दाब वेलीवर निर्माण होतो. कॅनॉपीमध्ये वरील बाजूस पानांच्या वाट्या झालेल्या दिसून येतात. काही पानांवर स्कॉचिंगची स्थितीही दिसून येईल.
काडीची परिपक्वता पाहता एक पेरा परिपक्व होऊन पुढील पेरा हिरवा दिसतो. पुन्हा त्यानंतर पेरा परिपक्व झालेला किंवा परिपक्व होताना दिसून येतो. ही स्थिती मुख्यतः वेलीमध्ये बोट्रिडिप्लोडियामुळे दिसून येईल. यावेळी यासाठी फार काही करता येत नसले तरी वेलीला ताण बसणार नाही, यासाठी उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील.
हे लक्षात ठेवा....
- जमीन नेहमी वाफशात राहील, अशाप्रकारे पाण्याचे नियोजन करावे,
- ज्या बागेत काडी अपरिपक्व असून, परिपक्वतेला नुकतीच सुरुवात झालेली आहे, अशाठिकाणी बोर्डो मिश्रण किंवा
- ताम्रयुक्त बुरशीनाशकाची फवारणी किंवा ड्रेचिंग फायद्याचे ठरेल.
- या बागेत वाढ एकदम नियंत्रणात न ठेवता दोन-तीन पाने पुन्हा वाढतील, अशा हिशेबाने नत्रयुक्त खतांचा वापर कमी प्रमाणात पण एक-दोनवेळा करता येईल.
- उदा. युरिया ०.५-०.७५ किलो एकरी याप्रमाणे ठिबकद्वारे एक किंवा दोन दिवसांआड दिल्यास वेलीची वाढ थोडीफार होऊन वेलीवर ताण थोडा कमी होईल.
- ताम्रयुक्त किंवा ट्रायअझोल गटातील बुरशीनाशक १.५-२ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- ग्रामीण कृषी ,मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी