Buttermilk For Crops : नैसर्गिकरित्या कीड नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त साधन आहे. आंबट ताक हे कीटकनाशक आणि बुरशीनाशक या दोन्ही प्रकारे कार्य करते. ताक जितके जुने असेल तितके ते पिकांसाठी अधिक फायदेशीर ठरते.
कीड नियंत्रणासाठी ताक वापरणे हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे, कारण त्यातील प्रथिने आणि सल्फरमुळे अळी, मावा, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, ज्यामुळे पिकांची वाढ सुधारते.
दाणे भरगच्च होतात आणि रासायनिक खतांचा खर्च कमी होतो. हे जैविक नियंत्रक म्हणून काम करते, किडींना पिकापासून दूर ठेवण्यास मदत करते आणि पिकाचे आरोग्य सुधारते.
वापर -ताजे ताक वापरू नये कारण ते कीड नियंत्रणामध्ये प्रभावी ठरत नाही.अळी नियंत्रणासाठी एक वर्ष जुने ताक वापरल्यास चांगला परिणाम मिळतो. फवारणीसाठी किमान १५ दिवसांचे ताक वापरणे आवश्यक आहे.प्रति एकर सुमारे ३ ते ४ लिटर ताक १३० ते १५० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
कीड नियंत्रण -चवळीवरील केसाळ अळी व मावा या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच हे मूग व चवळीवरील पांढरी माशी नियंत्रणासाठीही प्रभावी ठरते.खोडकिडा आणि रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी उपयोगी.
- डॉ. मिलिंद जोशी, विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण), कृषी विज्ञान केंद्र, बारामती, पुणे