यशवंत परांडकर
बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांवरील वाढता खर्च, बदलतं हवामान आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन हाती येण्याआधीच खर्चाचा डोंगर उभा राहतो.(BT Cotton Seeds)
या पार्श्वभूमीवर नांदेडच्या कापूस संशोधन केंद्राने देशातील पहिले सार्वजनिक 'बीटी सरळ वाण' विकसित करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने 'बियाणे स्वातंत्र्या'ची दिशा दिली आहे.(BT Cotton Seeds)
खासगी मक्तेदारीला छेद
आतापर्यंत बीटी कापसाच्या बियाण्यासाठी शेतकऱ्यांना खासगी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत होते.
या मक्तेदारीला छेद देत नांदेडच्या कापूस संशोधन केंद्राने 'एनएच १९०१ बीटी', 'एनएच १९०२ बीटी' आणि 'एनएच १९०४ बीटी' ही सरळ वाण विकसित केली आहेत.
तसेच 'एनएच २२०३७ बीटी' आणि 'एनएच २२०३८ बीटी' या दोन वाणांची केंद्रीय निवड समितीमार्फत निवड झाली असून त्या प्रसारणासाठी सज्ज आहेत.
ही वाण 'सरळ' प्रकारातील असल्याने शेतकरी कापसापासून सरकी वेगळी करून पुढील २ ते ३ वर्षे बियाणे म्हणून वापरू शकतात. त्यामुळे दरवर्षी बियाण्यावर होणारा हजारो रुपयांचा खर्च वाचणार आहे.
कमी कालावधीत बंपर उत्पादन
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत येणारी पिके काळाची गरज ठरत आहेत. ही नवी वाणे केवळ १६० ते १७० दिवसांत काढणीस तयार होतात.
हेक्टरी १७ ते १८ क्विंटल उत्पादन क्षमता
सघन लागवड पद्धतीत अधिक झाडे, अधिक उत्पादन
कोरडवाहू पट्ट्यासाठी उपयुक्त
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील कोरडवाहू भागांसाठी ही वाणे वरदान ठरणार आहेत.
खर्चात मोठी बचत
या वाणांमध्ये रसशोषक किडी आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असल्याने औषधांचा खर्च घटतो. रासायनिक खतांची आवश्यकता देखील कमी भासते.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (वनामकृवि) मार्फत विकसित या वाणांची बियाणे किंमत सुमारे ५०० रुपये प्रति किलो आहे.
प्रति एकरी शिफारशीनुसार (२ x १ फूट अंतर) सुमारे २ किलो बियाणे पुरेसे ठरते.
संकरीत वाणांच्या तुलनेत प्रति एकरी सुमारे दोन हजार रुपयांपर्यंत होणारा बियाणे खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
शेतकऱ्यांचे अनुभव
परभणीतील शेतकरी सांगतात की 'एनएच १९०२' या वाणाच्या पानांवर असलेल्या लवेमुळे किडींचा प्रादुर्भाव तुलनेने कमी झाला आहे आणि बोंडे चांगली उमलत असल्याने वेचणी सुलभ होते.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही या वाणांमुळे बियाणे खर्चात बचत झाल्याचे सांगितले आहे. 'सरळ वाण' असल्याने पुढील वर्षी स्वतः चे बियाणे वापरणे शक्य होत असल्याचे ते नमूद करतात.
‘बियाणे स्वातंत्र्य’ची दिशा
कापूस शेतीत वाढत्या खर्चामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असताना, सार्वजनिक क्षेत्रातून विकसित झालेले हे बीटी सरळ वाण मोठा दिलासा देणारे ठरत आहेत.
कमी खर्च, मध्यम कालावधी, चांगली उत्पादन क्षमता आणि पुनर्वापराची सुविधा या गुणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भरतेला नवी ताकद मिळणार आहे.
नांदेडच्या मातीतून उगवलेले हे संशोधन केवळ नवे वाण नाही, तर कापूस उत्पादकांसाठी 'बियाणे स्वातंत्र्या'ची नवी पहाट ठरत आहे.
वनामकृवि'द्वारे विकसित 'एनएच १९०२' या बीटी सरळ वाणाच्या पानावर लव आहे. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव इतर संकरित कासापेक्षा तुलनेने कमी झाला. या वाणाची बोंडे चांगली उमलत आहेत. त्यामुळे वेचणीस सुलभ होते. - बालाजी गमे सोन्ना, (ता.जि.परभणी)
हे सरळ वाण असल्यामुळे कापसापासून सरकी वेगळी करून पुढीलवर्षी बियाणे म्हणून वापरता येते. त्यामुळे संकरीत वाणांच्या बियाण्यासाठी प्रति एकरी जवळपास दोन हजार रुपयांपर्यंत होणारा खर्च सरळ वाणामध्ये कमी होतो. - शामराव बजाज, सांडस चिंचोली, ता. माजलगाव, जि.बीड
अवाजवी खर्च येणार नाही
बीटी सरळ वानांचा उपयोग केल्यामुळे बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या खर्चात कपात होईल. त्यामुळे हे वाण फायदेशीर राहतील. कृषी विद्यापीठाने बीजी- २ स्वरूपातील सरळ वाण विकसित केले असून अधिसूचना प्राप्त झाल्यानंतर ते शेतकऱ्यांना उपलब्ध केले जाईल.
आतापर्यंत ८ शेतकऱ्यांनी हे वाण खरेदी करून नेले आहे. बियाणाची किंमत ५०० रुपये प्रति किलोग्राम असून, प्रति एकरी शिफारशी प्रमाणे (२ x १ फूट अंतर) दोन किलोग्राम अंतर बियाणे लागेल. - डॉ.के.एस. बेग, संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
Web Summary : Nanded's cotton research center developed public BT cotton varieties, offering farmers seed independence. These varieties reduce costs, mature quickly (160-170 days), and yield 17-18 quintals per hectare. They are suitable for dryland areas and require less fertilizer and pesticides, saving farmers money on seeds and inputs.
Web Summary : नांदेड़ के कपास अनुसंधान केंद्र ने सार्वजनिक बीटी कपास किस्मों को विकसित किया, जिससे किसानों को बीज स्वतंत्रता मिली। ये किस्में लागत कम करती हैं, जल्दी परिपक्व होती हैं (160-170 दिन), और प्रति हेक्टेयर 17-18 क्विंटल उपज देती हैं। वे शुष्क भूमि क्षेत्रों के लिए उपयुक्त हैं और कम उर्वरक और कीटनाशकों की आवश्यकता होती है, जिससे किसानों के बीज और इनपुट पर पैसे की बचत होती है।