Bhat Lagavad : भात पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी चारसूत्री भात लागवड (Char sutri bhat lagvad) तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. हे तंत्र सोपे, शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम, एकूण लागवडीतील बी, मजूर व खत यांचा खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती फायदेशीर करणारे आहे.
चारसुत्रापैकी पहिले सूत्र : १- रोपवाटीकेसाठी वापरावे जसे भाताच्या तुसाची काळसर राख रोपवाटिकेत बी पेरण्यापुर्वी गादी वाफ्यात मिसळावी. खात्रीशिर व भेसळविरहीत बियाण्यांचा वापर करावा.
- सूत्र २ : वनशेती तंत्रज्ञानाचा उपयोग करून गिरिपुष्प या हिरवळीच्या खताचा एकरी ४ मे.टन वापर चिखलणीच्या वेळी हेक्टरी १० मे.टन हिरवळीचे खत जमिनीत गाडावे.
- याकरिता धैंचा अथवा ताग वापरावा. दुसरा मार्ग म्हणजे गीरीपुष्पाची शेताच्या बांधावर लागवड करावी.
- लागवडीनंतर दुसऱ्या वर्षापासून या झाडाचा पाला भात लावणीच्या ८ ते १० दिवस अगोदर शेतात गाडावा.
- गीरीपुष्पाची हिरवी पाने ३ मे. टन प्रति हेक्टरी शेतात गाडल्यास नत्र खताकरता लागणाऱ्या खर्चात खूप बचत होते.
सूत्र : ३- सुधारित किंवा संकरित जातीच्या भातरोपांची (२५ चूड/ चौ.मी.) नियंत्रित लावणी
- अधिक उत्पादनासाठी बुटक्या, जास्त फुटवे देणाऱ्या सुधारित अथवा संकरित भातजातीचा वापर करावा.
- भात तुसाची काळी राख रोपवाटिकेमध्ये वापरून तयार केलेली रोपे (उगवणीपासून अंदाजे तीन आठवड्यांनी) लागवडीसाठी वापरावीत.
- शेताच्या बांधाजवळून लागवडीस सुरुवात करावी.
- सुधारित लागवड दोरीवर १५ सें.मी. अंतरावर असलेल्या प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा (प्रत्येकी २-३ रोपे/चूड)
- त्यानंतर २५ सें.मी. पुढे आणखी तिसरा व १५ सें.मी. अंतरावर चौथा चूड लावावा.
- अशाप्रकारे एकावेळी जोड ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत नियंत्रित लागवड पूर्ण करावी.
- खाचरात अनेक १५ x १५ सें.मी. चुडांचे चौकोन व २५ सें.मी. चालण्याचे रस्ते तयार होतात.
सूत्र : ४- खतगोळ्या खोचणे
- नियंत्रित पुनर्लागवडीनंतर त्याच दिवशी प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात मधोमध सरासरी २.७ ग्रॅमची एक युरिया- डीएपी ब्रिकेट हाताने ७.१० सें.मी. खोल खोचावी.
- एक गुंठा क्षेत्रात ६२५ ब्रिकेट्स (१.७५ कि. ग्रॅ.) पुरतात. यातून मिळणाऱ्या खताची मात्रा (एकरी) २३ कि. ग्रॅ. नत्र अधिक ११.७ कि. ग्रॅ. स्फुरद इतकी असते. पावसाच्या अभावी व इतर कारणाने लागवड लांबणीवर पडल्यास प्रति गुंठा क्षेत्रातील रोपास १ किलो युरियाचा तिसरा हफ्ता द्यावा.
- योग्य पाणी व्यवस्थापन करावे. कीड व रोग नियंत्रणाकडे लक्ष द्यावे.
रासायनिक तण नियंत्रणरासायनिक तण नियंत्रणासाठी २० ग्रॅम मेटसल्फुररॉन मिथाईल १० टक्के क्लोरोम्युरॉन इथाईल १० टक्के तयार मिश्रण ०.००४ किलो क्रियाशील घटक प्रती हेक्टरी ५०० लीटर पाण्यात पुनर्लागवडीनंतर १५ ते २० दिवसांत फवारावे व त्यानंतर ४५ व्या दिवशी एक खुरपणी करावी.पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता पाण्याच्या उपलब्धतेनुसार पेरलेल्या रोपवाटीकेतील रोपांची पुनर्लागवडी पूर्वी रोपांची मुळे क्लोरोपायरीफॉस २० ई.सी. ०.०२% + १% युरियाच्या द्रावणात ४ तास बुडवून ठेवावीत. भात लावणीच्या वेळी रोपांचे शेंडे खुडावेत. त्यावरील किडींचे अंडीपुंज, अळ्या गोळा करून त्यांचा नाश करावा. लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी मिथील पॅराथिऑन २% (हेक्टरी २० किलो) भुकटी धुरळावी.(पावसाची उघडीप असताना फवारणी करावी)
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी