Crop Management : सद्यस्थितीत तापमान वाढले असून उन्हाळ बाजरी (Unhal Bajari) तसेच आंबा, डाळिंबपाणी व्यवस्थापन महत्वाचे ठरणार आहे. या काळात या तिन्ही पिकांच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे पाणी नियोजन करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा....
पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड किंवा १५ दिवसांतून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात फळे वाटाणा आकारापासून ते सुपारी आकाराची होईपर्यंत द्यावे. मात्र फळे काढणीस तयार होण्याच्या एक महिना अगोदर झाडास पाणी देणे बंद करावे. झाडाच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे, आंबा कलमांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी झाडाच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावावी.
डाळिंब पाणी व्यवस्थापन
- डाळिंब बागेत सिंचनासाठी ठिबक किंवा सूक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर करावा.
- डाळिंब बागेत लागवडीच्या पहिल्या दोन वर्षांपर्यंत एका ओळीसाठी एक लॅटरल आणि प्रति झाडासाठी दोन ड्रीपर्स असावेत.
- पुढे तिसऱ्या व चौथ्या वर्षासाठी दोन लॅटरल आणि चार ड्रीपर्स आणि पाचव्या वर्षापासून पुढे झाडांच्या वाढलेल्या आकारानुसार दोन लॅटरल आणि सहा ड्रीपर्स असे नियोजन करावे.
- यातून पाण्याच्या गरजेची पूर्तता करणे शक्य आहे.
- बागांची पाण्याची आवश्यकता ही झाडाचे वय, फळांचा भार, हंगाम आणि मातीचा प्रकार या घटकांवर अवलंबून असते.
बाजरी पाणी व्यवस्थापन
जमिनीच्या मगदुरानुसार व पिकाच्या वाढीच्या संवेदनक्षम अवस्थेत १० ते १२ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास, पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी), दुसरे पाणी पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी), तिसरे पाणी दाणे भरतेवेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी.
Unhali Pike : उन्हाळी बाजरी, भुईमूंग, सूर्यफूल पिकाचे व्यवस्थापन कसे कराल? वाचा सविस्तर