Agriculture News : शेतातील पिकांना पाण्याचा, रासायनिक खतांचा अतिवापर होत असल्याने महाराष्ट्रातील जमिनी क्षारपट होत चालल्या आहेत. जमिनीचा सामू (PH) वाढत आहे, त्यामुळे जमिनी नापिकीच्या उंबरठ्यावर आलेल्या असुन कोणत्याही पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेती तोट्यात जात आहे. जमिनी नापिक होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे.
जल, जमीन आणि हवामान हे घटक जोपर्यंत पिकांना पोषक होणार नाही, तोपर्यंत बळीराजा खऱ्या अर्थाने राजा होऊ शकत नाही. शेतीचे नुस्ते उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत नाही तर त्याच्या उत्पादनाला बाजारात उत्पादन खर्चावर आधारित चांगला भाव मिळत नाही. तोपर्यंत या देशांची अर्थव्यवस्थाच मोठी होऊच शकणार नाही. शेती या व्यवसायाला प्रतिष्ठा देऊन, सद्यस्थितीत चालना देणे अत्यंत गरजेचे आहे.
जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी काय करता येईल :
शेतकरी बांधवांनी तीन वर्षात एकदातरी रब्बी हंगामात कोरडवाहू करडई पीक त्यानंतर उन्हाळी हंगामात मूग कडधान्य पीक घेणे गरजेचे आहे. दोन्हीं पीक जमिनीच्या सुपीकतेसाठी आणि सुधारणेसाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात.
करडई पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्याने ते जमिनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच मूग पिकाच्या मुळावर रिझोबियम जिवाणूंच्या गाठी असतात. त्यामुळे हवेतून नत्राचे स्थिरीकरण होण्यास मदत होते. विशेषतः जमिनीची धूप थांबवण्यासाठी आणि जमिनीचा कस वाढवण्यासाठी दोघेही उत्तम पीक आहेत.
खोल नांगरट : जमीन ३ वर्षांतून एकदा खोल नांगरट करावी, जेणेकरून मुळे खोलवर जाऊन जमीन सुधारण्यास मदत होईल.सेंद्रिय खत : जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीची खते (उदा. ताग, धैंचा) वापरावीत. हेक्टरी ५ टन कुजलेले शेणखत वापरल्यास जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची भुसभुशीतपणा : जमिनीत खोलवर सोट मुळ जाणाऱ्या पिकांची लागवड करणे, मुळे जमिनीत खूप खोल (२ ते ३ मीटरपर्यंत) गेल्यामुळे जमिनीच्या खालील थरातील कडकपणा कमी होतो आणि जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते. तसेच जमिनीचे पोत (soil structure) सुधारण्यास मदत होते.पोषक तत्वांचे पुनर्चक्रण : मुळे जमिनीच्या खोल थरातून पोषक तत्वे वर आणतात, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. पिकाची कापणी केल्यानंतर उरलेला पाचोळा किंवा अवशेष जमिनीत मिसळल्यास ते जमिनीसाठी उत्तम सेंद्रिय खत ठरतात.हवेची हालचाल : मुळे खोल गेल्यामुळे जमिनीच्या आत हवेची हालचाल सुधारते, ज्यामुळे मातीची रचना सुधारते.सेंद्रिय कर्ब : पाने गळणाऱ्या आणि मूळ कुजणाऱ्या पिकांची लागवड करावी जेणे करून पाने, मूळ कुजल्यानंतर जमिनीत सेंद्रिय पदार्थ वाढेल.पिकांची फेरपालट : म्हणजे एकाच जमिनीत दरवर्षी तेच पीक न घेता पिके बदलून घेणे. यामुळे जमिनीचा कस टिकून राहतो. वेगवेगळ्या गटातील पिके आलटून पालटून घेतल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.क्षारयुक्त पाणी टाळणे : क्षारयुक्त पाणी पिकांसाठी अत्यंत घातक मानले जाते. योग्य व्यवस्थापन न केल्यास ते जमिनीची आणि पिकांची कायमस्वरूपी हानी करू शकते.ठिबक सिंचन : जमिनीतील पिकांना मोकाट पद्धतीने पाणी देण्याचे टाळून पाण्याचा वापर ठिबक सिंचनाद्वारे (Drip Irrigation) करणे अधिक फायदेशीर ठरते, पिकांना गरजे पुरता मोजके पाणी दिल्याने जमिनीची सुपीकता टिकुन राहण्यास मदत होते. जमिनीत पाणी साचून राहू देऊ नये, यासाठी योग्य निचरा व्यवस्था करावी. जमिनीत पाण्याचा निचरा योग्य राहील याची काळजी घ्यावी, जेणेकरून क्षार जमिनीच्या खाली जाण्यास मदत होईल.
- प्रा. डॉ.सुमेरसिंग राजपूत, तिळ पैदासकार, अखिल भारतीय समन्वित तीळ सुधार प्रकल्प, तेलबिया संशोधन केंद्र,जळगाव.
Web Summary : Excessive water and fertilizer use cause saline land in Maharashtra. Improve soil by crop rotation, organic fertilizers, deep plowing, and avoiding saline water. Drip irrigation helps maintain soil fertility.
Web Summary : महाराष्ट्र में अत्यधिक पानी और उर्वरक के उपयोग से भूमि लवणीय हो रही है। फसल चक्रण, जैविक उर्वरक, गहरी जुताई और खारे पानी से परहेज करके मिट्टी में सुधार करें। टपक सिंचाई से मिट्टी की उर्वरता बनाए रखने में मदद मिलती है।