Join us

Tractor Rotavator : तुमच्याकडील ट्रॅक्टरच्या हॉर्स पॉवरनुसार रोटाव्हेटर कसा निवडायचा? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 19:12 IST

Tractor Rotavator : पेरणीसाठी जमीन जलद गतीने तयार करण्यासाठी रोटावेटर (Rotavator) फार उपयुक्त असे यंत्र आहे.

Tractor Rotavator : पेरणीसाठी जमीन जलद गतीने तयार करण्यासाठी रोटावेटर (Rotavator) फार उपयुक्त असे यंत्र आहे. उन्हाळ्यामध्ये शेतीची मशागत लवकर कशी करता येईल याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष वेधलेले असते. रोटावेटर या यंत्राची निर्मिती होण्याआधी नांगरणी झाल्यानंतर कल्टीवेटरच्या (Cultivator) सहाय्याने दोन तीन पास माराव्या लागत होत्या. 

पास असलेले वखरसुध्दा वापरावे लागत होते. यामध्ये शेतकरी बांधवांचा जास्त वेळ खर्च होत होता, इंधनसुध्दा जास्त लागत होते आणि त्राससुद्धा सहन करावा लागत होता. मात्र रोटावेटरच्या वापरामुळे जमीन एक किंवा दोन तासामध्ये भुसभुशीत होऊन पेरणीसाठी तयार केली जाते. जमीन भुसभुशीत झाल्यामुळे बी उगविण्याचा दर वाढला जातो. 

सोबतच जमिनीमध्ये हवा खेळती रहाते आणि बी चे रूपांतर रोपट्यामध्ये होण्यास अडचण येत नाही. रोटावेटर ६ ते ७ इंचापर्यंत जमिनीच्या खोलवर जाते आणि मातीला अशा प्रकारे तयार केले जाते की ज्यामध्ये पाऊस पडल्यानंतर माती आणि पाणी यांचे चांगले मिश्रण होण्यास मदत होते. पिकाचे कृषी अवशेष जमिनीवर किंवा जमिनीमध्ये असल्यास त्याचे मिश्रण केले जाते. रोटावेटरच्या वापरामुळे वेळेची बचत होते आणि कमी खर्चात शेतीची मशागत केली जाते.

बाजारामध्ये विविध कंपन्यांचे रोटावेटर विक्रीस उपलब्ध आहेत. शेतकरी बांधवांनी रोटावेटरची निवड करते वेळी आपल्याकडे असलेल्या ट्रॅक्टरच्या शक्ती नुसार (हॉर्स पावर) रोटावेटरच्या आकाराची निवड करावी. जर शेतकरी बांधवाकडे २५ ते ३० हॉर्स पावरचे ट्रॅक्टर असल्यास ३ फुट रुंदीच्या रोटावेटरची निवड करावी. ३० ते ३५ हॉर्स पावरचे ट्रॅक्टर असल्यास ४ फूट रुंदीच्या रोटावेटरची निवड करावी. 

३५ ते ४५ हॉर्स पावरचे ट्रॅक्टर असल्यास ५ फूट रुंदीच्या रोटावेटरची निवड करावी. ४५ ते ५५ हॉर्स पावरचे ट्रॅक्टर असल्यास ६ फूट रुंदीच्या रोटावेटरची निवड करावी. साधारणतः शेतकरी बांधवांकडे ३५ ते ४५ हॉर्स पावरचे ट्रॅक्टर बघायला मिळतात, त्यामुळे ५ फूट रुंदीचे रोटावेटर घेण्यास काही हरकत नाही. आधी चेन व स्प्रोकेट असलेले रोटावेटर बाजारामध्ये होते, पण त्यामध्ये देखभालीचा खर्च जास्त असल्यामुळे आता पुर्णतः गिअर असलेले रोटावेटर उपलब्ध आहेत. 

पि.टी.ओ. शाफ्टवरून रोटावेटरच्या ब्लेडला गिअर बॉक्समधून गती दिली जाते. ५४० फेरे प्रति मिनिट ही पि.टी.ओ. शाफ्टची गती असते आणि गिअर बॉक्सव्दारे ती कमी करून रोटावेटर शाफ्टवर साधारणतः १७० ते १८० फेरे प्रति मिनिट एवढी कमी केली जाते. रोटावेटर हे एक अत्यंत उपयुक्त यंत्र असून जमिनीची मशागत कमी वेळेत व कमी खर्चात करण्यास मदत करते.

- डॉ. अनिलकुमार कांबळे, संशोधन अभियंता                                                                                                                            अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प,                                                                                                                                      डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीकृषी योजना