Join us

Krushi salla : वाढत्या उन्हात पिकांची अशी घ्या काळजी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 18:01 IST

Krushi salla : वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन पिकांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची (Krushi Salla) शिफारश केली आहे. वाचा सविस्तर

Krushi salla :  वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन पिकांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची (Krushi salla) शिफारश केली आहे.  वाचा सविस्तर

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची तर पुढील ३ ते ४ दिवसात किमान तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.(Krushi salla)

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची तर पुढील ३ ते ४ दिवसात किमान तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. (Krushi salla)

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात ६ मार्चदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व ०७ ते १३ मार्चदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

संदेश : पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. कापुस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 पीक व्‍यवस्‍थापन

ऊस : ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० % ३६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हळद : हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची काढणी करून घ्यावी.

हरभरा : काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी व काढणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा.

करडई : करडई पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या करडई पिकाची काढणी करून घ्यावी.

उन्हाळी तीळ : उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत ८ ते १० दिवसांनी व भारी जमिनीत १२ ते १५ दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तुषार सिंचन पध्दतीने करावे. उन्हाळी तीळ पिकास खताची दुसरी मात्रा देतांना त्यासोबत गंधक २० किलो प्रति हेक्टरी देण्यात यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे, फळधारणा सुरू असलेल्या अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.

फळ गळ होऊ नये म्हणून जिब्रॅलिक ॲसिड १ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

काढणीस तयार असलेल्या मृग बहार फळांची काढणी करून घ्यावी. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.

कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे डाळींब व चिकू बागेत आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. बागेतील फुटवे काढावेत.

भाजीपाला

भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व गादी वाफ्यावरील रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड २०% एसपी २ ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल १०.२६ ओडी १२ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५% एसजी ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

रेशीम उद्योजकांच्या रेशीम अळ्या कोष न करणे किंवा पोचट कोष होणे हा प्रश्न आहे. बहुतांशी शेतकरी कापूस, ऊस, सोयाबीन व भाजीपाला आदी पिकांकडून तुती लागवडीकडे वळलेले आहेत.

पुर्वी शेतातील जमिनीत पीक संरक्षण करण्यासाठी वापरात आलेले किटकनाशक उदा. कोराझीन किंवा बुरशीनाशक, तणनाशक उदा. ग्लायफोसेट आदीचे प्रमाण किंवा शिल्लक राहिलेला अंश जमिनीत राहिलेला असतो. नंतर तेथे तुती लागवड केली जाते आणि तुतीला आलेली पाने रेशीम किटकास खाद्य म्हणून दिल्यावर  किटक मरताना दिसतात किंवा अळ्या कोष करत नाहीत, पोचट कोष होतात. त्यावर उपाय म्हणजे २० टन कुजलेले शेणखत प्रति हेक्टर किंवा ५ टन गांडूळ खत समान दोन हप्त्यात जुन व नोव्हेंबर महिन्यात जमिनीत द्यावे व नंतर हलके पाणी द्यावे.

(सौजन्‍य: मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)हे ही वाचा सविस्तर : Bamboo Research : बांबू संशोधनासाठी प्रथमच नागपूरच्या विद्यार्थ्यांना १८ लाखांची फेलोशिप वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपीक व्यवस्थापनपीक