Join us

Kabuli Harbhara Lagvad : काबुली हरभऱ्याचे उत्पादन वाढविण्यासाठी ह्या आहेत सोप्या टिप्स.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 15:42 IST

नवीन व सुधारीत वाणांची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यास हमखास उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल म्हणून नवीन सुधारीत वाणांचा वापर करावा. यात काबुली हरभऱ्याला बाजारात चांगली मागणी असते आणि बाजारभाव ही चांगला मिळतो.

महाराष्ट्रात लागवडीखालील असलेल्या विविध कडधान्यांमध्ये सर्वात जास्त क्षेत्र हरभऱ्याचे असून महाराष्ट्रात या पिकाखाली २९ लाख हेक्टर आणि विदर्भामध्ये ९.४० लाख हेक्टर क्षेत्र आहे. कमी उत्पादकतेची बरीच कारणे आहेत जसे बहुतांश क्षेत्रात या पिकाची पेरणी कोरडवाहू मध्ये केली जाते.

नवीन व सुधारीत वाणांची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यास हमखास उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल म्हणून नवीन सुधारीत वाणांचा वापर करावा. यात काबुली हरभऱ्याला बाजारात चांगली मागणी असते आणि बाजारभाव ही चांगला मिळतो.

काबुली हरभरा लागवडीसाठी महत्वाच्या बाबी

  • पीकेव्ही काबुली २ आणि ४ हरभऱ्याच्या टपोऱ्या दाण्याचे वाण आहेत. टपोऱ्या दाण्याला किंमत चांगली मिळते. म्हणून दाणे जास्तीत जास्त टपोर राहून उत्पादन जास्त मिळविण्याचा प्रयत्न असावा.
  • पेरणी शक्यतो ओलीताचे क्षेत्रात १० नोव्हेंबर पूर्वी करावी शक्यतो सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करावा.
  • बियाण्याचे प्रमाण दाण्याच्या आकाराप्रमाणे वाढवावे. चाड्याचे छिद्र तपासून घ्यावे.
  • पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशक विटाव्हॅक्स पॉवर ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे तसेच रायझोबियम (एकेसीआर-१) व पीएसबी ह जैविकखते प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे.
  • पेरणी जमीनीत योग्य ओलावा असतांना करावी. ओलावा कमी असल्यास प्रथम ओलीत करावे. वाफसा आल्यावर पेरावे. पेरणीनंतर अंकूरण होईपर्यंत ओलीत करू नये किंवा पेरणी वरंब्याच्या दोन्ही बाजुला अर्ध्या उंचीवर करून ओलीत करतांना सद्या पेरणीच्या खालच्या पातळीत भराव्या.
  • पीक सुमारे ४५ दिवस तणमुक्त असावे. यासाठी खुरपणी व कोळपणी करणे आवश्यक आहे. शिफारशीत तणनाशक फवारतांना जमिनीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे.
  • हरभऱ्याच्या पिकाला २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद व ३० किलो प्रति हेक्टर पालाश पेरणी वेळेस द्यावे. (प्रति हेक्टर मात्रा १२५ किलो डीएपी अथवा ५० किलो युरिया ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) तसेच जमिनीमध्ये जस्ताची कमतरता असल्यास २० किलो प्रति हेक्टर झिंक सल्फेट पेरणी सोबत द्यावे.
  • हरभऱ्याला फुलोरा असतांना व घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत करावे.
  • पक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळे पडत असतांना ओलीत बंद ठेवावे आणि घाटे जास्त सुकण्यापुर्वी कापणी करावी.
  • स्प्रिंकलरद्वारे ओलीत करण्यास हरकत नाही. परंतु ओलीताद्वारे मोजकेच गरजेनुसार पाणी दिल्या जाईल याची काळजी घ्यावी.

अधिक वाचा: Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : शेतकऱ्यांनो मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेसाठी आता घरबसल्या अर्ज करणे झाले सोपे

टॅग्स :हरभरालागवड, मशागतपेरणीरब्बीशेतीपीक