Join us

शेतजमीन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी सातबाऱ्यावरील 'ह्या' गोष्टी पाहणे महत्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:10 IST

Jamin Kharedi तुम्हाला शेतजमीन खरेदी करायची आहे. आणि त्यात फसवणूक होऊ नये यासाठी तुम्ही खरेदीपूर्वी काय काळजी घेणे आवश्यक आहे ते पाहूया.

जमीन खरेदीत खोटा सातबारा, जमीन भलत्याच व्यक्तीच्या नावावर असणे, कोर्टात केस सुरू असणे अशा अनेक पद्धतींनी फसवणूक होण्याची शक्यता असते.

हे टाळण्यासाठी सात-बारा आणि आठ-अ हे उतारे तपासणे सगळ्यात महत्त्वाचे. जमिनीचं नाव, वर्णन, मालकाचं नाव, जमीन शेतीयोग्य आहे की नाही अशा गोष्टी सातबारामध्ये असतात.

सातबाराची मूळ प्रत पाहणं महत्त्वाचं आहे. छायांकित प्रतींवर विश्वास ठेवू नये. महाभूमी अभिलेखच्या संकेतस्थळावर एखाद्या जमिनीच्या उताऱ्याची डिजिटल सत्यांकित प्रत मिळू शकते.

जमीन मालकी हक्काचे पुरावे तपासणे महत्त्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीचे नाव सातबारावर आहे म्हणजे ती मालक असते असं नाही.

जमिनीचा मूळ मालक कोण हे माहिती करून घेण्यासाठी फेरफार नोंद, रजिस्टर्ड सेल्स डीड आहे का तसेच जमीन विक्रीला सर्व वारसांची परवानगी आहे का हे तपासून बघणं आवश्यक आहे.

जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराला एखाद्या वारसाची परवानगी नसेल तरी त्याबाबतचे खटले कोर्टात वर्षानुवर्षे चालतात.

जमीन कोणत्या झोनमध्ये आहे, ती शेतीसाठी आहे की बिनशेती हे तपासा. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे रेकॉईस तपासा. फेरफार सहा हाही जमीन खरेदीतला सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे.

जमिनीच्या मालकीमध्ये झालेल्या सर्व बदलांच्या नोंदी त्यात असतात. जमिनीवर कर्ज, लवाद किंवा नोटीस आहे का हे तपासण्यासाठी एनकम्ब्रन्स सर्टिफिकेट किंवा 'ईसी' तपासणं अत्यावश्यक आहे.

तहसील कार्यालयात जाऊन कागदपत्रं तपासणं, खरेदीखताचं नीट वाचन हेही गरजेचं आहे. जमीन खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक टाळायची असेल तर प्रत्यक्ष भेटी आणि जाणकार वकिलांचा सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे.

अधिक वाचा: वडिलोपार्जित शेतजमीन वाटपाचा दावा कसा दाखल करावा? काय काळजी घ्यावी?

टॅग्स :शेतीशेतकरीसरकारराज्य सरकारमहसूल विभागतहसीलदार