Join us

परदेश अभ्यास दौऱ्याकरीता कशी होणार शेतकऱ्यांची निवड? काय आहेत निकष? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 09:39 IST

Shetkari Pardesh Abhyas Doura राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणाऱ्या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणाऱ्या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे.

शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसीत होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरुप योग्यवेळी पोहर्चावणे आणि त्यासाठी आवश्यक सहाय्य व सोयीसुविधा पुरविणे निकडीचे आहे.

कृषि विस्तार कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरीता करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी कृषि विभागाकडुन राज्यातील शेतकऱ्यांचे परदेश दौरे ही योजना राबविणेत येत आहे.

परदेश अभ्यासदौऱ्याकरीता शेतकरी निवडीचे निकष

  • अभ्यास दौऱ्याकरीता जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा.
  • स्वतःच्या नावे चालु कालावधीचा (मागील सहा महिन्यातील) ७/१२ व ८-अ उतारा असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याच्या उत्पनाचे मुख्या साधन शेती असावे व तसे त्याने स्वयंघोषणापत्रात नमुद करावे (प्रपत्र-२)
  • शेतकऱ्याचे अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आय डी असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी कुटुंबामधुन फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्याने स्वखर्चाने जरी इतर कुटुंब सदस्यास सोबत घ्यावयाचे असेल तरी सहल व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही. सोबत शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडावी. (कुटुंब या व्याखेमध्ये पती, पत्नी व त्यांचे १८ वर्षाखालील मुले मुली)
  • शेतकऱ्याने त्याच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवसी २५ वर्षे पुर्ण असावे. कमाल वयाची अट नाही परंतु शेतकरी शारीरीकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकिय प्रमाणपत्र (किमान एम.बी.बी.एस डॉक्टरचे) सादर करावे.
  • शेतकऱ्याची अभ्यास दौऱ्याकरीता निवड झाल्याचे पत्र कृषि विभागाकडुन मिळाल्यानंतर देखील शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरीकदृष्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकिय प्रमाणपत्र (किमान एम.बी.बी.एस डॉक्टरचे) सादर करावे. कोरोनाविषयक तपासणी करुन तसा अहवाल कृषि विभागास सादर करणे बंधनकारक आहे. या अहवालानुसार शेतक-यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग ७-१० दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्यास शेतकरी शारीरीकदृष्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे बंधनकारक राहील.
  • शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा, पुराव्यासाठी पारपत्राची मुदत/वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी. पारपत्राची वैध मुदत दौरा निघताना किमान तीन महिन्यापेक्षा जास्त असावी.
  • शेतकरी शासकिय, निमशासकिय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीस नसावा, तसेच वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टर, वकिल, सीए (चार्टड अकाउंटंट), अभियंता, कंत्राटदार इ. नसावा. तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमुद करावे. (प्रपत्र-२)
  • शेतकऱ्याने यापुर्वी शासकिय (केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत, कृषि विद्यापिठामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत) अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा, तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमुद करावे. (प्रपत्र-२)
  • शेतकरी निवडीबाबत अंतिम अधिकार राज्यस्तरीय समितीकडे राखीव असतील.

अधिक माहितीसाठी जवळील सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा.

अधिक वाचा: Ranbhajya: पावसाळ्यात रानभाज्यांची जादू; चवीबरोबरच 'या' रानभाज्यांचा आरोग्यालाही मोठा फायदा

टॅग्स :शेतकरीशेतीराज्य सरकारकृषी योजनासरकार