मोसंबीच्या झाडाला चांगली व जोमदार वाढ झाल्यावर आणि झाडांचा सांगाडा बनल्यावर झाडावर फळे घेण्यास सुरवात करावी. लागवडीनंतर पहिल्या तीन वर्षात झाडांची चांगली वाढ योग्य वाटल्यास चौथ्या वर्षी माफक ताण देवून कमी प्रमाणात फळे घ्यावीत.
ताण सुरु करण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची फळे काढावीत व बागेचे पाणी हळूहळू कमी करीत नंतर बंद करावे. ताण देण्याचा काळ हा जमिनीच्या प्रतीनुसार व झाडाच्या वयानुसार कमी जास्त होऊ शकतो.
मोसंबीतील ताण व्यवस्थापन१) ताण सुरु केल्यानंतर पानांचा मुळचा रंग कमी होऊन फिक्कट व नंतर पिवळी पडतात असे होत असताना पाने गळून पडेपर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवतात.२) साधरणपणे पंचवीस टक्के पानगळ झाल्यास ताण बसला असे समजावे.३) पानांनी तयार केलेल्या कर्बयुक्त अन्न झाडांच्या फांद्यात साठते. या कर्बयुक्त अन्नपदार्थाचा उपयोग झाडांना नवीन पालवी फुटण्यास, फुले येण्यास, फळधारणा होण्यास मदत होते अशा प्रकारे झाडांना ताण दिल्यास एकाच वेळी फुलोरा येतो आणि व्यापारीदृष्ट्या हे फायद्याचे ठरते.४) ताण जरुरीपेक्षा जास्त बसणार नाही याची काळजी घ्यावी. भारी जमिनीत, ओल धरून ठेवणाऱ्या जमिनीत बागेस एक हलकी नांगरट करावी.५) नांगरटीमुळे मुळ्यांची थोडी छाटणी होऊन झाडांना पाणीपुरवठा कमी होतो.६) झाडांची वाढ थांबते, सर्वसाधारणपणे मुळांची छाटणी करणे झाडांसाठी हानिकारक असले तरी क्वचित वेळी झाडांची ताणाची परिस्थिती पाहून ते करावे लागते.
अधिक वाचा : Mosambi Ambiya Bahar : मोसंबी पिकात अधिक फळ लागण्यासाठी झाडांना कसा द्याल ताण; वाचा सविस्तर
ताण सोडल्यानंतर व्यवस्थापन१) आंबे बहारासाठी मोसंबीच्या बागेस ताण दिला असेल तर विहिरीचे हलक्या प्रमाणात पाणी देऊन ताण सोडावा.२) यावेळी भरखते, संपूर्ण स्फूरद, पालाश व अर्धनत्र देऊन आंबवणी द्यावे.३) त्यानंतर पाच ते सात दिवसांनी फुले येतात. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी (चिंबवणी) द्यावे.४) तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे.५) ताण सोडल्यावर वीस ते पंचवीस दिवसांनी फुले येतात. त्यानंतर उरलेल्या नत्राचा (निम्मा) हप्ता एक ते दीड महिन्यांनी द्यावा.६) आंबे बहारच्या मोसंबी बागेस पाणी देणे निसर्गावर अवलंबून नसल्याने हा खात्रीचा बहार ठरलेला आहे.
एकात्मिक खत व्यवस्थापन१) मोसंबीच्या झाडांना त्यांच्या वयाप्रमाणे वेगवेगळी खते ठराविक प्रमाणात लागतात. मोसंबीच्या बागांना कमी प्रमाणात खतांचा पुरवठा केला तर आरोह वाढतो.२) कोणते खत कोणत्या वेळी आणि किती प्रमाणात द्यावे हे जमीन, हवामान झाडाचे वय आणि उत्पादनक्षमता यावर अवलंबुन आहे.३) पाच वर्षानंतर प्रत्येक झाडास ५० किलो शेणखत अथवा १५ किलो लिंबोळी पेंड, प्रत्येकी ४०० ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश बहार धरताना पहिल्या पाण्याच्या पूर्वी द्यावी, फलधारणेनंतर ४५ दिवसांनी आणखी ४०० ग्रॅम नत्र द्यावे.४) हलक्या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार हप्त्यात विभागून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते.५) तसेच झाडांना मुख्य अन्नद्रव्यासोबत दुय्यम व सूक्ष्मअन्नद्रव्याचा देखील नवती फुटताना म्हणजेच जानेवारी-फेब्रुवारी, जुन-जुलै आणि सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये शिफारशीनुसार पुरवठा करावा.
- डॉ. संजय पाटीलप्रभारी अधिकारीमोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर९८२२०७१८५४