राज्यात उसाची लागवड प्रामुख्याने आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू किंवा आडसाली या तीन वेगवेगळ्या हंगामात केली जाते. या पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो त्यात खोडकीडही मोठ्या प्रमाणात नुकसान करते.
किडीची ओळखपूर्ण वाढ झालेली अळी दंडगोलाकार, २० ते २५ मि.मी. लांब व हलक्या राखाडी पांढऱ्या रंगाची असते. तिचे डोके गडद तपकिरी काळसर असते.
नुकसानीचा प्रकारअंड्यातून बाहेर पडलेली अळी सुरुवातीला पाने खाते, त्यानंतर खोडामध्ये शिरून खालच्या दिशेने खोड पोखरते तर काही वेळेस जमिनीच्या पृष्ठभागाच्या बाजूने छिद्र पाडून खोड पोखरते. त्यामुळे उगवणारा पोंगा १२ ते १८ दिवसात सुकून जातो त्यास पोंगामर किंवा गाभेमर असेही म्हणतात.
किडीची आर्थिक नुकसानीची पातळी१० ते १५% पोंगेमर
एकात्मिक व्यवस्थापन◼️ हलक्या जमिनीत ऊस लागवड टाळावी.◼️ जमिनीची दुपारच्या वेळी खोल नांगरणी करावी.◼️ सुरू ऊसाची लागवड शिफारशीत वेळेतच पूर्ण करावी. उशिरा लागवड केल्यास प्रादुर्भाव वाढतो.◼️ अति प्रादुर्भावग्रस्त खोडवा पीक घेणे टाळावे.◼️ लागवडीसाठी कीडविरहित बेण्याची तसेच प्रतिरोधक किंवा सहनशील वाणांची निवड करावी.◼️ सुरू उसाची लागवड २० सेंमी खोल सरीत केल्याने खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो.◼️ नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा.◼️ उन्हाळ्यामध्ये जमिनीचे तापमान कमी करण्यासाठी, आर्द्रता वाढवण्यासाठी व पुरेसा ओलावा टिकून ठेवण्यासाठी दोन सिंचनामधील अंतर कमी ठेवावे.◼️ लागवडीनंतर ३ दिवसांनी १० ते १५ सेंमी जाडीचे पाचटाचे आच्छादन करावे.◼️ लागवडीनंतर ४५ दिवसांनी मातीची भर दिल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो.◼️ प्रादुर्भावग्रस्त पोंगे वेचून अळीसहित नष्ट करावेत. जमिनीलगत खालची २ ते ३ पाने काढून अंड्यासह नष्ट करावीत.◼️ प्रौढ खोडकीड सर्वेक्षणासाठी हेक्टरी १० कामगंध सापळे उभारावेत. त्यातील ई.एस.बी. ल्युर ३० दिवसांनी बदलावा.◼️ परोपजीवी (ट्रायकोग्रामा चिलोनिस) ट्रायकोकार्ड प्रति हेक्टरी ४ प्रमाणे १० दिवसांच्या अंतराने ५ वेळा लावावेत.◼️ किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास रासायनिक फवारणीचे नियोजन करावे.
अधिक वाचा: सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर