Join us

Harbhara Cut Worm : हरभऱ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या ह्या अळीचे कसे कराल नियंत्रण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 11:57 IST

हरभरा पिकात विविध अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताना दिसतो आहे. हरभरा पिकावर शेंडे, पाने व रोप कुरतडणारी अळी (कट वर्म) या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

हरभरा पिकात विविध अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताना दिसतो आहे. हरभरा पिकावर शेंडे, पाने व रोप कुरतडणारी अळी (कट वर्म) या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या किडीची ओळख, नुकसानीचा प्रकार व व्यवस्थापन खालील प्रमाणे आहे.

अळी कशी ओळखावी?▪️ही एक बहुभक्षीय कीड असून या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने उशिरा पेरणी केलेल्या पिकावर होतो.▪️मादी पतंग सुरूवातीला पिकाच्या व तणाच्या पानांवर तसेच कोवळ्या शेंड्यावर एक-एक करून किंवा समुहाने ३०० ते ४५० अंडी घालते.▪️अळीची लांबी ही ०.२ ते १.५ इंच असते या अळीचा रंग हा भुरकट हिरवा, काळपट किंवा करडा असतो.▪️या अळीच्या शरीरावर करड्या रंगाचा पट्टा शरीराच्या दोन्ही बाजूने असतो.▪️शेतामध्ये पाने, शेंडे कुरतडलेल्या अवस्थेत दिसून येतात, मात्र अळी ही झाडाच्या बुंध्याला माती मध्ये लपून बसते व मुख्यत्वे रात्री पिकावर येवून पाने व शेंडे कुरतडते.▪️प्रादुर्भाव जास्त असल्यास दिवसा देखील ही अळी पिकावर आढळून येते.▪️पूर्ण वाढ झालेली अळी १.५ ते २ इंच लांब असते. अळीला स्पर्श केल्यास ती शरीराचा C आकार करतांना दिसून येते.▪️पिकाच्या सर्व अवस्थांमध्ये या अळीचा प्रादुर्भाव होवू शकतो.▪️ही कीड रोप अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास रोप कुरतडते व नंतरच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पाने व शेंडे कुरतडते.▪️पुर्ण वाढ झालेली अळी ही जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते.

अळीच्या नियंत्रणासाठी उपाय१) शेतामध्ये किंवा बांधावर कचऱ्याचे ढीग तसेच तण राहणार नाही असे नियोजन करावे.२) प्रति हेक्टर २० पक्षी थांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडींच्या अळ्या खाऊन फस्त करतात.३) या अळीचा प्रादुर्भाव लष्करी अळी प्रमाणे एकच वेळी आढळून येते म्हणून शेतातील पिकामध्ये मादी पतंगाने अंडी घालू नये याकरीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरेक्टीन ३०० पीपीएम ५० मि.ली. किंवा अझाडिरेक्टीन १५०० पीपीएम २५ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.४) प्रादुर्भाव २ अळ्या प्रति मिटर ओळ अशी आर्थिक नुकसानीची पातळी आढळून आल्यास क्लोरोपायरीफॉस २० टक्के ईसी ५० मि.ली. किंवा क्लोरॅट्रॅनिलीप्रोल १८.५ टक्के ३.० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.५) आवश्यकता भासल्यास १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

फवारणी करण्या आगोदर कृषि विज्ञान केंद्राच्या तज्ञांकडून माहिती, सल्ला घ्या मगच फवारणी करा.

अधिक वाचा: हरभरा पिकातील सद्यस्थितीत घाटे अळीच्या नियंत्रणासाठी करा ह्या सोप्या फवारण्या

टॅग्स :हरभराकीड व रोग नियंत्रणपीकशेतकरीशेतीपीक व्यवस्थापन