Join us

हिरवळीच्या खतांमुळे जमिनीला होतोय सेंद्रिय खतांचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2023 17:52 IST

रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होत असली तरी जमिनीचा पोत सुधारून तिची उत्पादन क्षमता टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर महत्त्वपूर्ण आहे.

रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होत असली तरी जमिनीचा पोत सुधारून तिची उत्पादन क्षमता टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर महत्त्वपूर्ण आहे. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे पिकांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या सोळाही अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो.

सेंद्रिय खतांमुळे अन्नद्रव्यांच्या पुरवठ्याबरोबर मातीच्या कणांची घडण बदलून जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीमध्ये हवा खेळती राहते व जमिनीचे तापमान कमी राहते. जमिनीतील उपयुक्त जीवाणूंच्या संख्येत व कार्यक्षमतेत वाढ झाल्याने अन्नद्रव्याच्या उपलब्धतेत वाढ होते. हिरवळीच्या खतांमुळे सेंद्रिय खतांचा पुरवठा होतो. जमिनीच्या भौतिक, रासायनिक गणांमध्ये सधारणा होते.

गिरीपुष्पाचा पालाभात लावणीपूर्वी गिरीपुष्पाचा पाला चिखलणीवेळी जमिनीत गाडावा. नत्र, स्फुरद, पालाश मोठ्या प्रमाणात असल्याने ही अन्नद्रव्य भात पिकाला लगेच उपलब्ध होतात.

भाताच्या तुसाची राखभाताच्या तुसाची काळसर राख किंवा भातुरा ०.५ ते १.० किलो ग्रॅम प्रतिचौरस मीटर भाताच्या रोपवाटिकेत मिसळावे त्यामुळे रोपांना सिलिकॉन या उपयुक्त्त अन्नद्रव्याचा पुरवठा होतो.

जमिनीत गाडणे लाभदायकगिरीपुष्पाची रोपे अथवा खुंट पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतीच्या बांधावर अथवा पडीक जमिनीत लावावा. पावसाळ्याच्या सुरुवातीला गिरीपुष्पाची वाढ जोमाने होते व लागवडीवेळी पाला मुबलक उपलब्ध होतो. गुंठ्याला ४ ते ६ झाडांचा पाला पुरेसा होतो. भात लागवडीपूर्वी चिखलणी करता पाला जमिनीत गाडावा. पाला कुजून आवश्यक अन्नद्रव्ये लगेच भात पिकाला उपलब्ध होतात.

प्रदूषण वाढले, जमिनीसाठीही धोकादायकमहागड्या व घातक रासायनिक निविष्ठांचे आरोग्यावर दुष्परिणाम होत असतानाच प्रदूषणामुळे जमिनीची उत्पादकता धोक्यात येत आहे. त्यावर सेंद्रिय शेती फायदेशीर असून, याद्वारे पर्यावरणाची हानी न होता जमिनीचा सामू संतुलित राहून सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते व जमिनी सुपीक बनते.

सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीची जलधारणशक्त्ती, निचराशक्त्ती सुधारते. सेंद्रिय खते कुजून पिकांच्या वाढीसाठी पोषक द्रव्ये उपलब्ध होतात. शेणखत, कम्पोस्ट खत, भुईमूग पेंड, कडुलिंब पेंड, तिळाची पेंड, गोबरगॅस स्लरी, हिरवळीची खतांतून जमिनीला सेंद्रिय खतांचा पुरवठा होतो. जमिनीतील जीवाणूंची कार्यक्षमता वाढते व जमिनीच्या भौतिक, रासायनिक गुणांमध्ये आमूलाग्र बदल होतो. यामुळे उत्पादन खर्चात घट होऊन शेती फायदेशीर करता येते. शिवाय कमी खर्चिक पद्धती आहे. - संदीप डोंगरे

जमिनीतील अन्नद्रव्याच्या पुरवठ्यासाठी सेंद्रिय खते, हिरवळीची खते उपयुक्त ठरतात. अन्नद्रव्याच्या पुरवठ्यासाठी ताग, धैंचा, गवार, मूग, चवळी, उडीद, शेवरी, गिरीपुष्प, सुबाभूळ, सेसबॅनिया रोस्ट्रेटा यासारख्या हिरवळीच्या खतांचा वापर करावा. सतत ओलावा व सेंद्रिय पदार्थाचा पुरवठा असणाऱ्या नारळी, पोफळी व मसाला पिकांच्या बागांमध्ये गांडूळ शेतीचा अवलंब करावा, आधुनिक शेतीबरोबर सेंद्रिय शेतीची सांगड घालणे फायदेशीर आहे. - सुनंदा कुन्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी

टॅग्स :सेंद्रिय शेतीखतेभातशेतकरीशेतीपीकप्रदूषण