राज्यात सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून सर्वत्र शेतजमिनींच्या नांगरणीची लगबग आहे. याच काळात एक मोठी समस्या समोर येते ती म्हणजे शेताच्या बांधांवरील वाद.
अनेक वेळा नांगरणी करताना नकळत दुसऱ्याच्या बांधावर नांगर जातो किंवा आपला बांध दुसऱ्याने कोरल्याची तक्रार होते. अशा क्षुल्लक गोष्टींपासून मोठे वाद उभे राहतात आणि काही वेळा हे वाद कोर्टापर्यंतही जातात. परिणामी आर्थिक आणि मानसिक त्रास होतोच.
मात्र त्या सोबत दोन्हीही शेतकरी कुटुंबाचे यात मोठे नुकसान होते असे म्हणणे देखील वावगे ठरणार नाही. तेव्हा या समस्येवर एक साधा, सोपा आणि फायदेशीर उपाय म्हणजे शेत-बांध संवर्धन. याचा अर्थ म्हणजे फक्त बांध टिकवणे नाही, तर बांधाचा योग्य उपयोग करून आर्थिक उत्पन्नाचा स्रोत तयार करणे होय.
शेत-बांध संवर्धन म्हणजे नक्की काय?
शेतातील चारही बाजूंनी असलेल्या बांधांवर विविध प्रकारची झाडे लावून त्याचे हरित आणि संरक्षक रूपांतर करणे म्हणजे शेत-बांध संवर्धन. या झाडांमध्ये मुख्यतः फळझाडे, वनशेती असे प्रकार निवडता येतात.
या झाडांपासून २-३ वर्षांनंतर उत्पादन सुरू होते आणि शेतकऱ्याला नियमित आर्थिक लाभ मिळू शकतो. काही झाडे बांध मजबूत ठेवण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात. उदा. सुरू, काटेरी बाभळी इ.
• फळझाडे - सीताफळ, जांभूळ, आवळा, लिंबू, चिकू, पेरू, नारळ इ.
• वनशेती झाडे - बाभूळ, साग, महोगणी इ.
शेत-बांध संवर्धनाचे फायदे काय?
• बांधाची ओळख स्पष्ट होते - एकदा झाडे लावल्यावर बांध कायमचा ठरतो. त्यामुळे वादास कारणच राहत नाही.
• वाद टळतात - स्पष्ट सीमारेषा असल्याने एकमेकांच्या क्षेत्रात नांगर घालण्याचा धोका राहत नाही.
• अतिरिक्त उत्पन्न - झाडांपासून मिळणारे फळ, लाकूड, औषधी घटक विकून उत्पन्न मिळते.
• जमिनीचे रक्षण - बांधावरील झाडांमुळे मातीची धूप थांबते, पाणी मुरते आणि जमिनीचा पोत टिकून राहतो.
• पर्यावरण संरक्षण - झाडांमुळे हवामानात समतोल राहतो, पक्षी, मधमाशा यांसाठी नैसर्गिक अधिवास तयार होतो.
शेत-बांध संवर्धन करतांना 'हे' मात्र विसरू नका!
• झाडांची निवड स्थानिक हवामान, माती आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार करावी.
• झाडे लावताना त्यांच्या मुळांमुळे शेजाऱ्याच्या शेतात अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी.
• लागवड केल्यानंतर झाडांची नियमित देखभाल आवश्यक असते.
हेही वाचा : खरीप हंगामापूर्वी 'हे' एक काम करा अन् यंदा खतांचा अतिरिक्त खर्च टाळा