Join us

काळजी नको, दुष्काळात फळबागा वाचविण्यासाठी ‘या’ चार गोष्टींचा अवलंब करा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 2:41 PM

ठिबकद्वारे फळबागांना पाणी देतानाही काळजी घेणे गरजेचे आहे. ठिबक संच सुरळीत चालला तरच फळझाडे जगून उत्पादन वाढणार आहे. संच सुरळीत चालतो किंवा नाही हे शेतकर्‍यांनी नियमितपणे पाहिले पाहिजे. पंप चालू असताना प्रेशरगेजचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे.

सद्यःस्थितीत अनेक ठिकाणी  शेतकर्‍यांनी 40 मायक्रॉनचे पॉलिथिन फळबागांसाठी मल्चिंग (आच्छादन) म्हणून वापरले आहे. काही ठिकाणी काडीकचरा, गव्हाचे कांड, भुसा, पालापाचोळा आदींचा वापर आच्छादन म्हणून केलेला आहे. टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा हा गढूळ, कचरायुक्त व क्षारयुक्त असल्याचे बर्‍याच ठिकाणी दिसून येत आहे. यामुळे आगामी काळात ठिबक संचामध्ये काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

1. काही ठिकाणी संचामध्ये गळती असेल तर दाब (प्रेशर) कमी झाल्याचे चटकन लक्षात येते. अशावेळी ताबडतोब गळती शोधून त्यामध्ये योग्य ती दुरुस्ती केली पाहिजे. आपल्या बागेत कोणती फळझाडे आहेत, त्यानुसार ठिबक संचाच्या ड्रीपरची निवड केली पाहिजे. मोसंबी, संत्रा, पेरू, आंबा व डाळिंब या पिकांसाठी ‘ऑनलाईन ड्रीपर’ तर केळी, पपई, ऊस, पालेभाज्या इत्यादींसाठी ‘इनलाईन ड्रीपर’ वापरले पाहिजे. सपाट शेतजमिनीसाठी साधे ‘ऑनलाईन’ तर चढउताराच्या जमिनीसाठी ‘प्रेशर कॉम्पेनसेटेड ड्रीपर’ वापरले पाहिजे. मुरमाड व वाळूमिश्रित जमिनीसाठी ‘मायक्रोस्पेअर’चा वापर करावा.

2. वेळोवेळी लॅटरलची तपासणी केली पाहिजे. लॅटरलच्या शेवटच्या ड्रीपरमध्ये अपेक्षित पाण्याचा प्रवाह सारखा येतो किंवा नाही ते तपासले पाहिजे. जर प्रवाह बंद असल्याचे आढळून आले तर लॅटरलमध्ये कुठे तरी गळती असू शकते किंवा लॅटरल दुमडलेले असू शकते. त्यासाठी प्रत्येक लॅटरलची देखभाल वेळीच करणे फायद्याचे ठरते. काही ठिकाणी ड्रीपर चोकअप झाल्यानेदेखील झाडे वाळल्याचे दिसून आले आहे. बर्‍याच ठिकाणी पाण्यात जास्तीचे क्षार असल्याने ते ड्रीपरच्या तोंडाशी जमा होऊन ठिबकचा पाणी पडण्याचा सारखेपणा कमी-जास्त होऊ शकतो. यासाठी गंधकाम्ल किंवा हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे सौम्य द्रावण ठिबक संचातून संचारावे.

3. या आम्लामुळे क्षार संपूर्णपणे विरघळून जाऊन ड्रीपरचे तोंड मोकळे होते व पाणी ठिबकण्याचा सारखेपणा सुधारण्यास मदत होते. अयोग्य छिद्राचे फिल्टर बसविले असल्यास ड्रीपर चोकअप होण्याची शक्यता असते. काही ठिकाणी पाण्यात 2 मि. ग्रॅ./लिटर एवढ्या प्रमाणात कार्बोनेट असल्यास ड्रीपर चोकअप होऊ शकतो. म्हणून सामू (पी. एच.) 5.5 ते 7 च्या दरम्यान असणार्‍या हायड्रोक्लोरिक आम्लाने संच साफ करावा.

4. सेंद्रिय पदार्थ जर पाण्यात असतील तर ड्रीपरमधून सोडियम हायपोक्लोराईडचे द्रावण संचारावे. काही ठिकाणी शेवाळामुळे ड्रीपर चोकअप होत असल्याचे दिसून आल्यास मोरचूद, गंधकाम्ल किंवा 20 पीपीएम सोडियम हायपोक्लोराईडचे द्रावण संचातून संचारावे. वेळोवेळी ड्रीपरची पाहणी करून बंद झालेल्या ड्रीपरला पिन करून अथवा बोटाने टिचकी मारून ड्रीपर सुरळीत चालू करावा. अशा प्रकारे पुढील काळात संचाची काळजी घेतल्यास फळबागा जगविण्यास निश्‍चितच मदत होईल.

टॅग्स :फळेदुष्काळशेतकरीशेती क्षेत्र