Join us
Daily Top 2Weekly Top 5

बांधावर झाड लावायला विसरू नका; खत फवारणीचा ताण नाही सोबत कमी खर्चातही जास्त उत्पन्न देणारी चिंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 10:32 IST

Tamarind Farming : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही तग धरू शकणाऱ्या भरघोस उत्पन्न व घनदाट सावली देणाऱ्या चिंचांच्या (Chinch Sheti) झाडाच्या लागवडीतून ही उत्पन्न मिळवता येते. हे झाड शेताच्या बांधावर तसेच पडीक जमिनीत ही लावता येते. तसेच कमी पाणी असले तरीही हे झाड उत्पन्न देते.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही तग धरू शकणाऱ्या भरघोस उत्पन्न व घनदाट सावली देणाऱ्या चिंचांच्या झाडाच्या लागवडीतून ही उत्पन्न मिळवता येते. हे झाड शेताच्या बांधावर तसेच पडीक जमिनीत ही लावता येते. तसेच कमी पाणी असले तरीही हे झाड उत्पन्न देते.

खत फवारणीचा जास्त खर्चही येत नाही. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे चिंचांचे झाड आहे. या झाडाचे आयुष्यमान शंभर वर्ष पेक्षाही जास्त आहे. झाड जसे मोठे होईल तसे उत्पादन जास्त प्रमाणात देते त्यामुळे अनेक शेतकरी आता चिंच लागवडीकडे वळू लागले आहेत.

खत-पाणी, फवारणी

• चिंचेच्या झाडाला चांगली वाढ आणि फळधारणा होण्यासाठी, सेंद्रिय खतांचा वापर करणे उत्तम असतो. शेणखत, कंपोस्ट खत आणि पाला पाचोळ्याचे खतांचा वापर चांगला ठरतो.

• तसेच, रासायनिक खतांमध्ये संतुलित १०:१०:१० एनपीके खत वापरल्यास झाडाला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात. या झाडाला फवारणीची गरज लागत नाही तसेच कमी जास्त पाणी असले तरीही चिंचेचे झाड चांगले उत्पन्न देते.

चिंचांचे सुधारित वाण कोण-कोणते?

चिंचांचे वेगवेगळे वाण आहेत ठिकाण बदलले की चिंचाच्या जाती ही बदलतात. चिंचाच्या काही जाती प्रतिष्ठान, योगेश्वरी नंबर - २६३, शिवाई, अकोला स्मृती, अजंठा गोडचिंच, गावरान चिंच आहेत.

एका हंगामात, एका झाडाला २ क्विंटल फळं

• चिंचाला वर्षातून एकदाच फळ लागते. फुले जून आणि जुलैमध्ये येतात आणि शेंगा थंड हंगामात पिकतात.

• बाहेरील कवच कोरडे होईपर्यंत शेंगा झाडावर पिकू द्याव्यात. चिंचेची काढणी मुख्यतः १ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान होते.

• शेंगा देठापासून दूर खेचून काढलेली फळे चांगली राहतात. साधारण एका झाडाला वर्षाकाठी दोन ते तीन क्विंटलपर्यंत चिंचा लागतात

चिंचांचा दर किती

चिंचाला दर हा साधारणतः १०० ते १२० रुपये किलोप्रमाणे लागतो. कधी हा दर कमी तर कधी जास्त ही होतो. काही वेळा चिंचाला जास्त प्रमाणात चिंच येतात, तर काही वेळा कमी प्रमाणात चिंचा लागतात त्यामुळे चिंचांचे दरही कमी जास्त होत राहतात.

झाडाला वर्षाकाठी दोन ते तीन क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न

चिंचांच्या एका झाडाचे उत्पन्न १५ ते २० हजार आहे. एका झाडाला वर्षाकाठी दोन ते तीन क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न निघते. दर चांगला मिळाला, तर एका झाडापासून वर्षाकाठी थीस हजारापेक्षा जास्त उत्पन्न मिळते.

असमतल, हलक्या जमिनीत हमखास पैसा

मध्यम ते हलकी डोंगर उताराची व मध्यम खोल जमीन योग्य आहे. चिंच वृक्ष अनेक प्रकारच्या जमिनीत उगवतो. काळ्या मातीत तो उगवतो. भुसभुशीत मातीत उगवतो. दगडधोंडे असलेल्या जमिनीत येतो. वाळूमिश्रित जमिनीत वाढतो. डोंगर उतारावरील जमिनीत नेटाने वाढतो. चिंचाच्या झाडाचे आयुष्य हे १०० वर्षापेक्षा जास्त आहे त्यामुळे चिंचाच्या उत्पादनातून हमखास पैसा मिळतो.

चिंचांचा कशा-कशात वापर?

चिंचेची उत्तम चटणी बनवतात. सॉस व सरबत बनवतात. चिंचेतील आम रसायन वापरून उत्तम आरोग्यदायी पेय बनवितात. कैरीच्या पन्ह्याप्रमाणे चिंचेपासून पन्हे बनतात. चटकदार भेळ, पाणीपुरी यात चिंचेचे पाणी वापरतात. याशिवाय अनेक खाद्यपदार्थात चिंचेचा वापर करण्यात येतो.

कलमी चिंचांना कितव्या वर्षी फळ?

कलमी चिंचांना तिसऱ्या वर्षापासूनच फुलोरा येण्यास सुरुवात होते. हा फुलोरा सुरुवातीच्या काळात कमी असतो असतो. झाड मोठे झाल्यावर जास्त प्रमाणात फुलोरा लागतो. साधारण चौथ्या ते पाचव्या वर्षापासून चिंचाच्या झाडाला फळ लागते.

चिंचांचे उत्पादन हे पडीक जमिनीवर तसेच शेतीच्या बांधावर ही घेता येते, तसेच कोरड आणि उष्ण हवामानात ही चिंचांचे उत्पादन घेता येते. याचे उत्पादन घेण्यासाठी जास्त प्रमाणात खर्चही येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंचेचे उत्पादन परवडणारे आहे. - ए.ए. टोंपे, कृषी अधिकारी, वडवणी, जि. बीड.

हेही वाचा : बळीराजाने उदरनिर्वाहाचे साधन म्हणून नव्हे तर व्यवसाय म्हणून पहावे; वाचा आधुनिक शेती व्यवसायाचे फायदे

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीफळेबाजारअन्न