Join us

दीर्घकाळ धान्य सुरक्षितेसाठी 'असे' करा साठवलेल्या धान्यातील कीड नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:57 IST

विविध किडिंसह साठविलेल्या धान्याचे उंदारापासून देखील अतिशय मोठे नुकसान होते. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत साठवेलेल्या धान्यातील कीड नियंत्रण करण्यासाठी काय करावे याची सविस्तर माहिती. 

साठवलेल्या धान्यात निरनिराळ्या प्रकारच्या किडी पडतात. धान्यावर त्यांचा जीवनक्रम पूर्ण होतो व सर्व अवस्था एकत्र आढळतात.

धान्यात पडणाऱ्या या किडीमध्ये प्रामुख्याने टोके किंवा सोंडे, छोटे भुंगेरे, खापरा, पिठातील तांबडा भुंगेरा, दातेरी भुंगेरे, दाण्यातील पतंग, तांदळावरील पतंग व कडधान्यावरील भुंगेरे इत्यादी किडी आढळतात.

त्याशिवाय साठविलेल्या धान्याचे उंदारापासून देखील अतिशय मोठे नुकसान होते. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत साठवेलेल्या धान्यातील कीड नियंत्रण करण्यासाठी काय करावे याची सविस्तर माहिती. 

अ) प्रतिबंधात्मक उपाय

१. धान्य उन्हात चांगले वाळवावे. धान्याच्या साठवणीसाठी धान्यातील ओलावा ८-१० पेक्षा कमी राहील अशी काळजी घ्यावी.

२. धान्य साठविण्याच्या अगोदर त्याची काळजी घेऊन किडग्रस्त धान्य किडीसहीत नष्ट करावे.

३. धान्यात होणाऱ्या किडी दरवाजे, भिंती, खिडक्या यातील फटीतून, रिकाम्या पोत्यातून तसेच साठवणूकीसाठी वापरलेल्या पोत्यातून बराच काळ जीवंत राहु शकतात. त्या पुन्हा नवीन साठविलेल्या धान्यावर जगतात व त्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यासाठी मॅलाथिऑन ५० ईसी ३ मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

४. धान्य साठविण्याच्या जागेत ॲल्युमिनियम फॉस्फाईड या किटकनाशकाची धुरी दिल्यास सर्व किडींच्या अवस्थांचा नाश करणे सोपे जाते व त्यापुढील संभाव्य प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते. यासाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईड याच्या २४ गोळया/१००० घनफुट गोदामात २४ तास ठेवावे.

५. धान्य साठविण्यासाठी कीडमुक्त पोते व इतर साहित्य वापरावे.

६. धान्य साठवितेवेळी जमिनीवर लाकडी फळी किंवा पॉलिथीन टाकून त्यावरच पोते रचून ठेवावी.

७ . धान्याची पोते खोलीच्या/गोदामाच्या मध्यभागी रचावी, भिंतीला लागून पोते रचू नये.

८. कडुनिंबाचा पाला, वेखंड, एरंडीचे तेल इत्यादीचा वापर करावा.

ब) गुणकारी उपाय

• धान्य साठविल्यानंतर लागलेल्या किडींचे नियंत्रण फक्त विषारी धुरी वापरुनच करावे लागते. यासाठी हवाबंद डब्यात, ताडपत्री अथवा प्लॅस्टिक आवरणाखाली धान्य ठेवून धुरी देण्यासाठी खालीलप्रमाणे धुरीजन्य कीटकनाशक वापरावे.

• ॲल्युमिनियम फॉस्फाईड ५६ टक्के : ३ गोळया/टन किंवा १५० ग्रॅम/१०० घन मिटर 

• ॲल्युमिनियम फॉस्फाईड १५ टक्के : १ गोळी (१२ ग्रॅम) / टन किंवा ६०० ते ९०० ग्रॅम / १०० घन मिटर

• ॲल्युमिनियम फॉस्फाईड ७७.५ टक्के जीआर : ३.३५ ग्रॅम / घन मिटर(वरील धुरीजन्य कीटकनाशकामार्फत शरीरात जात असल्यामुळे ती वापरताना अतिशय काळजी घेणे महत्वाचे आहे. तसेच ती तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच वापरावे.)

अशा विविध प्रकारे दीर्घकाळ धान्य योग्य रीतीने साठवून ठेवता येते. 

सौजन्य : कृषी दैनंदिनी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

हेही वाचा : पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करतांना 'अशी' घ्या काळजी; अबाधित आरोग्यासह टळेल आर्थिक हानी

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणशेती क्षेत्रशेतकरीशेतीगहूसोयाबीनमार्केट यार्ड