Join us
Daily Top 2Weekly Top 5

कमी पाण्यात भरघोस उत्पादन देणाऱ्या सूर्यफुलाची लागवड ठरेल यंदा फायद्याची; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 14:10 IST

Sunflower Farming : सुर्यफुलाची लागवड खरीप, रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये करता येते. सुर्यफुल हे अवर्षण परिस्थिती सुद्धा सहन करणारे पिक आहे. सुर्यफुल तेलामध्ये अधिक प्रमाणात असलेल्या लिनोलेईक आम्लामुळे या तेलाचे आहारातील महत्व वाढलेले आहे.

सुर्यफुलाची लागवड खरीप, रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये करता येते. सुर्यफुल हे अवर्षण परिस्थिती सुद्धा सहन करणारे पिक आहे. सुर्यफुल तेलामध्ये अधिक प्रमाणात असलेल्या लिनोलेईक आम्लामुळे या तेलाचे आहारातील महत्व वाढलेले आहे. उन्हाळी सुर्यफुल हे फेरपालटीचे पिक म्हणुनही उपयोगी पडते.

राज्यामध्ये प्रामुख्याने या पिकाची मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महराष्ट्र या विभागात लागवड केली जाते. विशेष की सूर्यफूल हे कमी कालावधीत (८० ते १०० दिवस) पिक तयार होते. ज्यात तेलाचे प्रमाण ३५ ते ४५ टक्के असते. तर आहाराच्या दुष्टीने करडई खालोखाल सुर्यफुल तेल अतिउत्तम आहे.

हवामान : सुर्यफुलाची वाढ चांगली व अधिक उत्पादन येण्यसाठी ५०० मि.मी. पर्जन्यमान गरजेचे आहे. पिक कालावधी व योग्य पाऊस असल्यास ३०० मि.मी. वार्षिक पर्जन्यामान देखील पिकास पुरेशे होते. बहुतांशी पिकांची पेरणी ठरावीक हंगामात वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असते. जेणेकरून पीक वाढीच्या काळात पिकांना आवश्यक असलेले हवामान पिकांस उपलब्ध होईल. 

जमीन : जमिनीची निवड करतांना जमिन ही मध्यम ते भारी व उत्तम निचरा होणारी निवडावी व जमिनीचा सामु ६.५ ते ८ इतका असावा. आम्लयुक्त व पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही.

पूर्वमशागत : जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या घ्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे.

पेरणीचा कालावधी : उन्हाळी हंगामात सुर्यफुलाची पेरणी ही जानेवारीचा पहिला व फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवाड्यात करावी.

लागवडीचे अंतर : मध्यम ते खोल जमीन (सुधारीत वाण) यासाठी अंतर ४५ X ३० से.मी. ठेवावे व या अंतरावर लागवड केल्यास रोपांची संख्या प्रतिहेक्टरी ७४००० इतकी राहील व भारी जमीनीत लागवडीचे अंतर हे ६० X ३० मी. ठेवावे व या अंतरावर लागवड केल्यास प्रतिहेक्टरी रोपांची संख्या ५५००० इतकी राखली जाईल व संकरीत वाणासाठी अंतर हे ६० X ३० से.मी. ठेवावे. (रोपांची संख्या ५५००० प्रतिहेक्टरी इतकी राहील.)

बियाणे प्रमाण : पेरणीसाठी टोकन पद्धतीने संकरीत वाणाचे ५ ते ६ किलो बियाणे वापरावे व तिफणीने पेरणी केल्यास हेक्टरी संकरीत वाणाचे ८ ते १० किलो बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया : इमिडाक्लोप्रीड (७० टक्के डब्ल्यु. एस.) ५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे (लेबल क्लेम) याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी त्यामुळे नेक्रॉसिस या रोगांपासून या पिकाचे संरक्षण होते व पेरणीपूर्वी बियाण्यास २ ते २.५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास थायरम/बाविस्टीन(लेबल क्लेम) चोळावे. त्यानंतर मर रोगाच्या प्रतिबंधासाठी ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.

शिफारशीत जातींची निवड : सरळ वाण - मॉडर्न, पी. केव्ही. एस. एफ-९ , टि. ए . एस ८२, एस. एस ५६, भानू, एल. एस. एफ-८ , फुले भास्कर , एल. एस-८२., संकरीत वाण : के. बी. एस. एच-१ , के.बी.एस.एच-४४ , फुले रविराज, डि. आर. एस. एच-१ , पी. केव्ही. एस. एच-२७, एल. एस. एफ. ए . एच-१७१ .

विरळणी : एका जागेवर एकापेक्षा जास्त रोपे असतील तर एकच सशक्त रोप ठेवून विरळणी करावी अन्यथा सुर्यफुलाचा आकार लहान होवून उत्पादनात लक्षणीय घट येते म्हणून विरळणी ही पेरणीनंतर १० ते १५ दिवसांनी करावी त्यामुळे उत्पादनात १८ ते २३ टक्के वाढ होवू शकते .

आंतरमशागत : पेरणीनंतर १० ते १५ दिवसांनी दोन रोपांत ३० सेंमी अंतर ठेवून विरळणी करावी. तसेच पेरणीनंतर १५ दिवसांनी एक खुरपणी करावी. तसेच दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणीनंतर २० दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४० दिवसांनी करावी.

पाणी व्यवस्थापन : हलकी जमीन असल्यास पाण्याच्या सहा ते आठ पाळया, मध्यम जमीन चार ते पाच पाळया व भारी जमीनीस तीन ते चार पाळ्या देणे गरजेचे आहे. पीक वाढीच्या संवेदनशिल काळात पाण्याचा ताण पडु देवू नये याची काळजी घ्यावी जसे की कळी धरणे, फुल उमलने व दाणे भरणे या अवस्थेत पाणी वापराचे नियोजन करावे.

खत व्यवस्थापन : बागायती पिकास नत्र ६० किलो, स्फुरद ३० किलो व पालाश ३० किलो प्रति हेक्टरी प्रमाणे द्यावे. यापैकी अर्धे नत्र ३० किलो आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा पेरणीवेळी द्यावी. तर नत्राची उर्वरित मात्रा ३० किलो नत्र पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावे. तर गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडुळ खतातून द्यावे.

विशेष बाब : सूर्यफुलाच्या फूल उमलण्याच्या अवस्थेत व त्यानंतर आठ दिवसांनी २ ग्रॅम बोरॅक्स प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण व दाण्याचे वजन वाढते. २० किलो प्रतिहेक्टरी गंधकाचे प्रमाण आपण अमोनिअम सल्फेट किंवा एस. एस. पी. खतांतुन दिल्यास पिकाचे अधिक उत्पादन मिळते.

तसेच सतत एकाच जागी पीक न् घेता सूर्यफूल पिकाची फेरपालट करावी. सूर्यफुलाची मुळे जमिनीत खोलवर जातात. त्यामुळे एकाच जमिनीत दरवर्षी सूर्यफूल लागवड केल्यास जमिनीचा पोत बिघडून उत्पादन क्षमता कमी होते. तसेच रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी कमीत कमी ३ वर्षे तरी त्याच जमिनीत सूर्यफुलाचे पीक घेणे टाळावे. 

हस्तपरागीभवन : पीक फुलोऱ्यात असतांना (५० ते ६५ दिवस) जातीनुसार हाताच्या पंजास तलम कापड गुंडाळावे व फुलावरून घडयाळयाच्या काटयाप्रमाणे हळुवारपणे हात फिरवावा हे काम ७ ते ८ दिवस सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत करावे. यामुळे उत्पादनात भरघोस वाढ दिसून येते.

सुर्यफुलामध्ये परपरागीभवनासाठी मधमाशांचा उपयोग होतो त्यामुळे परागीभवन होवून चांगली फळ धारणा (दाणे भरतात) यासाठी मधमाशांच्या पेट्या ५ प्रतिहेक्टरी सुर्यफुल पिकांत ठेवाव्या. दरम्यान पीक फुलोऱ्यात असतांना शक्यतो कोणतेही किटकनाशक फवारू नये.

उत्पादन : सुधारीत वाणाचे १० ते १२ क्विंटल प्रति हेक्टरी व संकरीत वाणाचे १८ ते २० क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.

प्रा. संजय बडेसहाय्यक प्राध्यापक (कृषि विद्या)दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगावता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर.

हेही वाचा : हरभरा पिकासाठी कोणत्या सिंचन पद्धतीने कधी व किती पाणी द्यावे? जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Sunflower farming: A profitable option with high yield in less water.

Web Summary : Sunflower cultivation is profitable in all seasons, requiring less water. It matures quickly (80-100 days), yielding oil rich in linoleic acid. Plant in well-drained soil, use recommended varieties, and manage water carefully during key growth stages for optimal yield.
टॅग्स :पीक व्यवस्थापनशेतकरीशेतीशेती क्षेत्ररब्बी हंगाम