Join us

मुख्य पिकासोबत तसेच बांधावर कडधान्यांची लागवड कमवून देईल अधिकची रोकड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 18:53 IST

आज बाजारात कडधान्यांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. शेतमालाला भाव न मिळणाऱ्या शेतकऱ्यांनी मुख्य पिकासोबत कडधान्यांची लागवड केली तर आर्थिक फायदा आहे.

आज बाजारात कडधान्यांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. शेतमालाला भाव न मिळणाऱ्या शेतकऱ्यांनी मुख्य पिकासोबत कडधान्यांची लागवड केली तर आर्थिक फायदा आहे.

आज जेवणाच्या डब्यामध्ये काय आणले आहे? शाळेत असताना जेवणाची मधली सुटी झाली की मैत्रिणींमध्ये डब्यामध्ये आपली आवडती भाजी आहे की नाही हे समजून घेण्याची घाई असायची. बहुतेक वेळा डब्यातली भाजी म्हणजे मोड आलेली कडधान्ये असायची.

शाळेतले शिक्षकही मोडाची कडधान्ये खा, असे आम्हा विद्यार्थ्यांना सारखं सांगायचे. शरीराची वाढ होण्यासाठी, झीज भरून काढण्यासाठी, कडधान्ये आहारात असावी हे खूप वेळा ऐकले होते.

कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात म्हणून कडधान्यांचे मला विशेष महत्त्व वाटायचे. हे महत्त्व काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा ठळक झाले ते नुकत्याच झालेल्या जागतिक कडधान्य दिवसामुळे. १० फेब्रुवारी रोजी 'जागतिक कडधान्य दिन' साजरा झाला आणि या आठवणींना उजाळा मिळाला.

हल्ली सधन वर्गाच्या डाएट फूडमध्ये किंवा जीमचा परिणाम दिसावा यासाठी सप्लिमेंट फूडमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांच्या यादीत प्रोटीन बार, प्रोटीन शेक हे पदार्थ लोकप्रिय झालेले दिसतात.

नेहमीच्या जेवणाच्या ऐवजी हे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यामध्ये चूक काय, बरोबर काय याबद्दल मी बोलत नाही. परंतु, आजच्या धावपळीमध्ये आणि बदललेल्या आहार सवयीमध्ये कडधान्यांना मोड आणून खाण्याचे प्रमाण कमी झालेले दिसते आहे.

तुम्हाला माहीत आहे का, की ही कडधान्ये जशी मानवी शरीराला गरजेची आहेत, तशीच ती जमिनीलाही उपयोगी आणि गरजेची आहेत. विविध हंगामामध्ये शेतकरी कडधान्यांची लागवड करतात.

शेतीच्या बांधावर, कडेला काही कडधान्यांची लागवड होते. शेतातील गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ सोबत बांधाला तूर, वाल यांची लागवड केली जाते. खरीप हंगामातील पिकांची, पावसाळा संपल्यानंतर कापणी होते.

कापणीनंतर शेतजमिनीमध्ये असलेल्या ओलाव्याचा उपयोग करून चणे, मूग, वाल, उडीद पेरले जाते. जमिनीतील ओलाव्यावर ते रुजतात आणि हिवाळ्यात पडणाऱ्या दवावर त्यांची वाढ होते. त्यामुळेच दवावर वाढणारी पिके अशीही कडधान्यांची ओळख आहे.

कडधान्यांच्या झाडांच्या पानांमधून बाष्पीभवन कमी प्रमाणात होते, त्यामुळे सिंचनाची सोय नसलेल्या शेतामध्ये कडधान्यांचे पीक घेता येते. शेतावर लावलेली ही कडधान्ये शेतजमिनींची काळजी घेत शेतीला सुपीक करत असतात.

कडधान्यांच्या मुळांशी असलेल्या गाठीमध्ये 'रायझोबियम' हे जीवाणू राहतात. हे जीवाणू हवेतील नायट्रोजनचे जमिनीमध्ये नत्राच्या स्वरूपामध्ये स्थिरीकरण करून शेतजमिनीची नत्राची गरज पूर्ण करतात.

कडधान्यांच्या झाडांच्या पानांमध्येही मोठ्या प्रमाणात नत्र असते. कडधान्यांचे पीक काढल्यानंतर या झाडांचे जमिनीत वेळाने विघटन होते. त्यातील नत्र जमिनीला मिळाल्याने जमीन कसदार होते.

आज बाजारात कडधान्यांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. शेतमालाला भाव न मिळणाऱ्या शेतकऱ्यांनी मुख्य पिकासोबत कडधान्यांची लागवड केली तर आर्थिक फायदा आहे. एकूणच कडधान्ये ही माणसाच्या पोषणासाठी, सकस शेतजमिनीसाठी आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणासाठी खूप महत्त्वाची ठरतात.

- श्रुतिका शितोळेपर्यावरण अभ्यासक 

अधिक वाचा: झेंडू पिकाचे शेतीमध्ये होणारे असंख्य फायदे माहिती आहेत का? वाचा सविस्तर

टॅग्स :शेतीपीकतूरलागवड, मशागतपेरणीआरोग्यअन्नकाढणी