मागील आठवड्यात झालेल्या सततच्या पावसामुळे कापूस पिकामध्ये पाणी साचल्यामुळे कापसाच्या झाडाची पाने मलूल होऊन झाडणे मान टाकल्यासारखी लक्षणे दिसत आहेत. ही आकस्मिक मर विकृती असून यामुळे प्रादुर्भाग्रस्त झाडे पूर्णत: वाळण्याची शक्यता असते.
जमिनीत वाफसा नसल्यामुळे आकस्मिक मर प्रादुर्भावग्रस्त झाडांमध्ये मुळाद्वारे अन्नद्रव्ये शोषण होत नाही. त्यामुळे झाडे कोमेजतात. पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात.
सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते. सततचा व मोठा पाऊस आणि जमिनीत वाफसा नसणे व हवेतील आर्द्रता जास्त झाल्यामुळे अशा प्रकारची लक्षणे दिसतात.
तसेच सततच्या पावसामुळे जमीनीमध्ये वाफसा परिस्थिती नसल्यामुळे कापसाच्या मुळामध्ये बुरशीची वाढ होऊन रसवाहिनी बंद होऊ शकतात. यालाच बुरशीजन्य मर असे म्हणतात.
त्यामुळे कापूस पिकावर अशा प्रकारची आकस्मिक मर विकृती किंवा बुरशीजन्य मर रोगाची लक्षणे दिसून आल्यास खालीलप्रमाणे व्यवस्थापन करण्याचा सल्ला वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पंडागळे यांनी दिला आहे.
कसे कराल उपाय?१) पाण्याचा निचरा करावाशेतातील साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर काढावे.२) आळवणीप्रमाण प्रति १०० लिटर पाणीअ) कॉपर ऑक्सीक्लोराइड २५० ग्रॅम + २ किग्रॅ युरिया + १ किग्रॅ पांढरा पोटॅश (००:००:५०) १०० लिटर पाण्यात घेऊन झाडाच्या बुंध्याशी फवारणी पंपाद्वारे किंवा डबा/बाटली/मगाद्वारे आळवणी (ड्रेचिंग) करावी. प्रत्येक प्रादुर्भावग्रस्त झाडास जवळपास १०० मिली द्रावण पडेल याप्रमाणे आळे/बांगडी पद्धतीने आळवणी करून झाडाच्या बुंध्याजवळील माती व्यवस्थित दाबून घ्यावी. किंवाब) पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) हे विद्राव्य खत ५०० ग्रॅम + कोबाल्ट क्लोराईड १ ग्रॅम यांचे १०० लिटर पाण्यात मिश्रण तयार करून द्रावणाची प्रति झाड १०० मिली द्रावणाची आळवणी (ड्रेचिंग) करावी. वरीलप्रमाणे द्रावणाची आळवणी म्हणजेच ड्रेंचींग करावी. फवारणी करू नये. आळवणी न करता फवारणी केल्यास फायदा होणार नाही.३) खोडाजवाळील माती दाबणेपाणी साचलेल्या कपाशी पिकात मरग्रस्त झाडे आढळून आल्यास झुकलेली झाडे मातीचा भर देऊन सरळ करावीत. कपाशीच्या झाडांचे खोड हवेमुळे ढिले पडल्यास दोन पायाच्या मध्ये घेऊन व्यवस्थित दाबून घ्यावीत.४) जमिनीतील हवा खेळती ठेवणेशेतजमीन वाफश्यावर आल्यानंतर हलकी आंतरमशागत करून कापसाच्या मुळांना हवा खेळती ठेवावी म्हणजे झाडे लवकर पूर्ववत होतील.
वरील सर्व उपाययोजना कापसाच्या शेतामध्ये झाडे मर होत असलेली दिसताच त्वरीत (२४ ते ४८ तासाच्या आत) कराव्यात. जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल. व्यवस्थापनास जेवढा उशीर होईल तेवढा फायदेशीर परिणाम कमी होईल.
अधिक वाचा: e Pik Pahani : आता पिक पाहणी होणार झटपट; वापरा अपडेटेड व्हर्जनचे 'हे' मोबाईल अॅप