Pune : "ग्रामीण भारतातील ८० टक्के महिला शेतीमध्ये काम करतात. पण त्यांना कुणी शेतकरी म्हणत नाही किंवा त्यांना शेतकऱ्यांचा दर्जा मिळत नाही. शेतीतील प्रत्येक कामामध्ये महिलांचा वाटा महत्त्वाचा आहे. देशातील शेतकरी आणि शेतमजूर केवळ १० दिवस जरी संपावर गेले तरी पूर्ण देश उपाशी मरेल" असे मत जेष्ठ पत्रकार आणि ग्रामीण व्यवस्थेचे अभ्यासक पी. साईनाथ यांनी व्यक्त केले आहे.
मकाम आणि सोपेकॉम या संस्थेने आयोजित केलेल्या "भविष्य पेरणाऱ्या" या प्रदर्शनामध्ये आयोजित केलेल्या व्याख्यानादरम्यान ते बोलत होते. राज्यभरातील महिला शेतकरी, महिला शेतमजूर आणि महिला उसतोड कामगार यांच्या जीवनावर आधारित विविध माध्यम प्रदर्शन या संस्थेने भरवले होते. ज्यामध्ये काव्यवाचन, फोटो प्रदर्शन, चित्रपटाचे स्क्रीनिंग, महिलांवर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन यांचा सामावेश होता.
दरम्यान, तिसऱ्या व शेवटच्या दिवशी म्हणजेच २३ मार्च रोजी जेष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी महिला, शेती आणि काम या विषयावर व्याख्यान केले. यामध्ये त्यांनी "सरकारी धोरणामुळे शेतकऱ्यांना आणि महिला शेतकऱ्यांना त्रास होतो, शेतकऱ्यांना सरकारी पातळीवर कायम डावललं जातंय, स्वामिनाथन आयोग लागू केला जात नाही, महिला शेतकऱ्यांची गणना केली जात नाही, सातबाऱ्यावर महिलांचे नाव लावले जात नाही, शेतकरी महिला आत्महत्या करत नाही असं म्हणणे चुकीचे आहे. शेतकरी महिलासुद्धा आत्महत्या करतात पण त्यांची नोंद ठेवली जात नाही." अशा अनेक प्रश्नांना त्यांनी हात घातला.
"महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली, मी या योजनेच्या विरोधात नाही. अजून जास्त पैसे महिलांना मिळायला हवेत, पण यासाठी पैसा कुठून आणला याचा विचार आपण केला पाहिजे. या योजनेसाठी मनरेगा, अंगणवाडी महिला, पोषण आहार आणि बालविकास योजनेतून पैसे कट करून इकडे वळवले जातायेत." असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
"महिला शेतकऱ्यांचे शेती क्षेत्रामध्ये योगदान मोठे आहे. ग्रामीण भारतात ८० टक्के महिला शेतात काम करतात पण त्यांचा त्यांना मोबदला मिळत नाही. जगभरात २४ तासात १२.५ अब्ज तास महिला विना वेतन काम करतात. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख मिळायला हवी" असं ते म्हणाले.