ज्या दिवशी जगातून मधमाशी नष्ट होईल त्यापासून ४ वर्षात जग नष्ट होईल असं अल्बर्ट आईन्स्टाईन या शास्त्रज्ञाने म्हटलं होतं. त्यामागील कारणही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण मधमाशा या ८० टक्क्यापर्यंत परागीभवन करतात आणि परागीभवनाशिवाय अन्न तयार होऊ शकत नाही. त्यामुळे पर्यावरणामध्ये मधमाशीचे महत्त्व जास्त आहे.
त्याबरोबरच मानवासारखेच मधमाशांमध्ये समन्वय पाहायला मिळतो. ज्यामध्ये मध शोधणाऱ्या मधमाशा वेगळ्या, मध गोळा करणाऱ्या मधमाशा वेगळ्या, पोळ्याची निगा राखणाऱ्या मधमाशा वेगळ्या आणि राणी माशी वेगळी असे विभागून काम मधमाशा करतात. त्यांच्या कामामध्ये समन्वय आणि पद्धतशीरपणा असतो.
मधमाशांचे वैशिष्ट्ये
१) मधमाशी जगातील ७० ते ८० टक्के परागीभवन (pollination) करते.
२) मधमाशा २०० मीटरपासून ५ किलोमीटर अंतरापर्यंतच्या झाडावर परागीभवन करतात.
३) परागीभवन झाले नाही तर कोणतीच वनस्पती किंवा झाड अन्न तयार करू शकत नाही.
४) मधमाशीचे आयुष्य ४० दिवसांचे असते.
५) राणी माशीचे आयुष्य २ वर्षाचे असते कारण ती रॉयल जेली हे अन्न खाते.
६) राणी माशीला रॉयल जेली पुरवण्याचे काम इतर मधमाशा करतात.
७) रॉयल जेली हे सुपरफूड केवळ मधमाशीच्या एका ग्रंथीमध्ये तयार होते. ते खाल्ल्यानंतर ६० वर्षांचा व्यक्तीही ४० वर्षाची असल्यासारखी जाणवते.
८) नर माशी म्हणजे ड्रोनने राणी माशी सोबत एकदा शारिरीक संबंध ठेवले (एकदा सेक्स केला) की तो मरून जातो.
९) कोणत्याही माशीने एकदा डंख मारला की ती मरून जाते. (त्यामुळे ती कुणावरही हल्ला करत नाही, ज्यावेळी तिच्यावर संकट असेल त्याचवेळी मधमाशी हल्ला करते.)
१०) सातेरी (एपिस सेरेना), एपिस मेलिफेरा आणि एपिस ट्रायगोना या तीन जातीच्या मधमाशा भारतात पाळल्या जातात.
११) मेलिफेरा ही जात मुळची परदेशी असून तिला सर्वांत जास्त अन्न खायला लागते. या मधमाशाच्या एका पेटीतून सर्वांत जास्त म्हणजे वर्षाकाठी ४० किलो मध तयार होऊ शकतो.
१२) सातेरी म्हणजेच (एपिस सेरेना) ही भारतीय मधमाशी असून या मधमाशीच्या एका पेटीतून वर्षाकाठी ७ ते ८ किलो मध तयार होऊ शकतो.
१३) ट्रायगोना ही भारतीय मधमाशी असून पाळल्या जाणाऱ्या मधमाशांपैकी सर्वांत लहान मधमाशी आहे. या मधमाशीच्या एका पेटीतून वर्षाकाठी केवळ २०० ते ३०० ग्रॅम मध तयार होतो.
१४) ट्रायगोना ही डंखरहित मधमाशी आहे. ही माशी सर्वांत कमी मधाचे उत्पादन करते.
१५) ट्रायगोना माशीने बनवलेला मध हा मेणविरहीत असतो. ही एकमेव मधमाशी आहे जी पोळे बनवत नाही.
१६) मध गोळा करणाऱ्या, मध शोधणाऱ्या, संरक्षण करणाऱ्या माशा वेगवेगळ्या असतात.
१७) मध शोधणाऱ्या माशा डान्स करून मध गोळा करणाऱ्या माशांना दिशा दर्शवत असतात.
१८) परिसरातील मध संपत आला की राणी माशी अंडी घालायची थांबवते.
मधमाशीपालनाच्या संधी दिवसेंदिवस वाढत आहेत. सर्वांत कमी कष्ट असणाऱ्या शेतीपूरक व्यवसायांपैकी हा एक व्यवसाय आहे. यामुळे परिसरातील शेती उत्पादनात २० ते ३० टक्क्यापर्यंत वाढ होते. त्याबरोबरच मध, रॉयल जेली, मधमाशीचे विष, मेण, प्रपोलिस हे उत्पादने मधमाशीपालनातून तयार करता येऊ शकतात.