Chhatrapati Sambhajinagar : मधमाशा जगातून नष्ट झाल्यानंतर पुढील चार वर्षांमध्ये जगाचा नाश होईल असं वाक्य थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटलं होतं. कारण अन्नधान्यांच्या आणि फळांच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये मधमाशांचा मोठा वाटा असतो. जवळपास ९० टक्क्यापर्यंत परागीभवनाचे काम हे मधमाशांकडून होत असते. पण मराठवाड्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांना मधमाशा कमी झाल्याचा अनुभव आला आहे. मधमाशा कमी झाल्यामुळे डाळिंबाच्या बागेला बहार लागला नसल्याची धक्कादायक माहिती शेतकऱ्यांनी दिली.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोसंबीचे पीक घेतले जाते. पण अलीकडे शेतकरी मोसंबी उपटून डाळिंबाची लागवड करत आहेत. या डाळिंबाच्या बहार व्यवस्थापनावेळी शेतकऱ्यांना शेतात येणाऱ्या मधमाशांचा अभाव दिसून आला. मधमाशा नसल्यामुळे पहिला बहार गळून गेला आणि दुसऱ्या बहारात मधमाशा आल्याने दुसऱ्या बहाराची सेटिंग योग्य झाल्याची माहिती आहे.
काय आहे मधमाशांचे काम?
कोणत्याही फळांची किंवा अन्नधान्यांची निर्मिती होण्यासाठी नर फुल आणि मादी फुलांचा संगम होणे गरजेचा असतो. नर आणि मादी फुलावरील पोलन्सच्या माध्यमातून ही प्रक्रिया होते आणि यासाठी मधमाशांच्या माध्यमातून हे पोलन्स नर आणि मादी फुलांवरील प्रवास करत असतात. या प्रक्रियेलाच परागीभवन असं म्हटलं जातं. म्हणजे परागीभवन करण्यासाठी मधमाशी खूप महत्त्वाची असते.
का होतायेत मधमाशा कमी?
रासायनिक खतांचा बेसुमार वापर, कीटकनाशांचा मोठ्या प्रमाणावरील वापर, बदलते हवामान या सर्वांमुळे मधमाशांच्या अधिवासावर संकट येऊ लागले आहे. मधमाशांना पोळे तयार करण्यासाठी त्या परिसरात विविध झाडे, फुलांची झाडे, पाणी असणे गरजेचे आहे. पण या गोष्टींची उपलब्धता नसल्यामुळे मधमाशांचे पोळे कमी झाले आहेत.
मधमाशांच्या अभावामुळे काय परिणाम?
मधमाशा कमी झाल्यामुळे फुलांचा बहार गळून जाण्याचे प्रमाण वाढले असून पैठण तालुक्यातील धनगाव येथील शेतकऱ्यांना पहिला बहार वाया गेला आहे. याच बहारात मधमाशा आल्या असत्या तर शेतकऱ्यांना पहिलाच बहार धरता आला असता.
आम्ही साधारण ४० ते ४५ दिवसांपूर्वी बहार धरला. त्यावेळी झाडाला फुले आली होती पण मधमाशी नसल्यामुळे पूर्ण बहार गळून गेला. आम्ही पुन्हा बहार धरला आणि सध्या मधमाशा असल्यामुळे चांगली सेटिंग झाली आहे. आम्ही बागेत पूर्णवेळ निरिक्षण केल्यामुळे आम्हाला ही गोष्ट लक्षात आली.
- शुभव खवले (शेतकरी, धनगाव, ता. पैठण)
अलीकडे रासायनिक खतांच्या वापरामुळे मधमाशा बागेत येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. याचा तोटा मोसंबी आणि डाळिंब पिकातही दिसून येतोय. शेतकऱ्यांनी यामुळे विषमुक्त किंवा कमी रासायनिक खतांचा वापर करून शेती करायला हवी.
- यज्ञेश कातबने (युवा शेतकरी, धनगाव, ता. पैठण)