छत्रपती शिवाजी महाराज. बाबरापासून औरंगजेबापर्यंतच्या मुघलांच्या साम्राज्याला सुरूंग लावणारा राजा. १७ व्या शतकात मुघल, निजाम अन् आदिलशाहीच्या काळात महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली अन् ते स्वप्न सत्यातही उतरवलं. महाराजांच्या काळातील प्रजा सुखी होती, शेतकरी सुखी होता, महाराजांनी स्थापन केलेलं साम्राज्य जनतेचं होतं हे आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत.
शिवरायांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या नाहीत? शिवरायांच्या काळात शेतकऱ्यांनी आंदोलने का केली नाहीत अन् त्या काळातील शेतकरी का सुखी होता? हा विचार आपण कधी केलाय? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला महाराजांनी पाठवलेल्या आज्ञापत्रातून मिळतात. शिवरायांचा शेतकऱ्यांबद्दलचा दृष्टीकोन अन् दूरदृष्टी कशी होती हे यातून कळतं.
बंगळूरवरून शिवाजी महाराज अन् जिजाऊ यांनी पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर परिसरात शेती केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. त्याचवेळी मुघलांकडून आणि इथल्या जुलमी सत्तेकडून शेतकऱ्यांचा कसा छळ केला जात होता हे त्यांना निदर्शनास आलं.
शेतकऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन
साधारण १६६२ सालच्या एका पत्रात छत्रपती शिवाजी महाराज सर्जेराव जेधे यांना म्हणतात की, "लगोलग तत्काळ जावा, विनाविलंब जावा, घडीचाही विलंब करू नका आणि शेतकरी, कुणबी, जो शेती करत आहे त्याला, त्याच्या कुटुंबाला, जनावरे अन् कुटुंबकबिला सुरक्षितपणे घाटाखाली किंवा त्यांना शत्रूच्या हल्ल्यापासून धोका होणार नाही अशा ठिकाणी स्थलांतरित करा. या कामात विलंब कराल तर त्याचे पाप तुमच्या मस्तकी लागेल."
शेतकऱ्यांच्या नुकसानीची काळजी
साधारण १९ मे १६७३ रोजी चिपळूणच्या हवालदाराने जुमलेदाराला पाठवलेल्या पत्राचे उल्लेख आढळतात. शिवरायांची छावणी पडली होती त्यावेळी शिवरायांनी केलेल्या सूचना या पत्रात दिलेल्या आहेत. ज्यामध्ये शिवराय म्हणतात की, "रात्री झोपताना दिव्यांच्या वाती विझवून झोपत जा. अन्यथा एखादा उंदीर ती वात तोंडात घेऊन जाईल, ती वात एखाद्या कडब्याच्या, गवताच्या गंजीला लागेल, कडबा जळून जाईल आणि जनावरांना चारा मिळणार नाही. असं झाल्यास तुम्ही जनावरे उभ्या पिकात सोडाल आणि यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. यावरून रयत म्हणेल कोण्या मुलखातून मुघल आले. मग तुमच्यापेक्षा मुघलच बरे म्हणून वाती विझवून झोपत जा." शिवरायांच्या या पत्रावरून ते शेतकऱ्यांची कशी काळजी घेत होते ते लक्षात येईल.
आग लागल्यावर धावपळ करण्यापेक्षा आगच लागू नये यासाठी शिवाजी महाराजांनी काळजी घेतली आहे. यामध्ये आग लागू नये, शेतीमाल जळू नये, वणवा भडकू नये, शेतकऱ्यांच्या मालाचे दर कमी होऊ नयेत, गरजेपेक्षा जास्त आयात होणाऱ्या मालावर आयात कर वाढवणे अशा गोष्टी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी केल्या आहेत.
यासोबतच महाराजांच्या काळात शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदरावर कर्ज मिळत होतं त्यामुळे स्वराज्यामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद इतिहासात नाही. शिवरायांच्या या धोरणामुळेच शेतकरी राजा सुखी होता.
माहिती संदर्भ - श्रीमंत कोकाटे (इतिहास अभ्यासक)