Join us

तूरीला सध्या काय भाव मिळतोय? उत्पादनात घट, शेतकऱ्यांना काय होणार फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 19:00 IST

नवी तूर येणार एक दीड महिन्यात....

किडीचा प्रादुर्भाव यामुळे गतवर्षी तुरीचे उत्पादन निम्म्याखाली आले. त्यामुळे तूर ११ हजार रुपयांवर गेली तरी शेतकऱ्यांच्या पदरात मात्र काहीही पडले नाही. उलट उत्पादन घटल्याने अनेक शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठीही उपलब्ध झाली नाही. हिंगोली बाजार समितीच्या मोंढ्यात तुरीला समाधानकारक भाव मिळत आहे.

प्रारंभी सरासरी ८ हजार रुपयांपर्यंत तुरीला भाव मिळाला. त्यानंतर भावात आणखी वाढ झाली. मध्यंतरी १२ हजार रुपयांवर तूर गेली होती तर सद्य:स्थितीत ११ हजार रुपये भाव मिळत आहे. परंतु, विक्रीसाठी तूर उपलब्ध नसल्यामुळे भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडे आता नवी तूर जवळपास एक ते दीड महिन्यात उपलब्ध होणार आहे. परंतु, यंदाही पावसाचा फटका बसला असून, तुरीची वाढ झालेली नाही. पावसाच्या उघडीपमुळे अनेक शेतकऱ्यांची तूर वाळून गेली. जी काही शेतात आहे त्यावर आता किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. नव्या तूरीला समाधानकारक भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

तुरीला भाव ११ हजारांपर्यंत...

हिंगोली बाजार समितीच्या मोंड्यात तूर सध्या ११ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. गत महिन्यात ११ हजार ५०० रुपयांपर्यंत तुरीला भाव मिळाला होता. आता मात्र भावात किंचित घसरण झाली आहे.

आणखी भाव वाढणार...

नवी तूर उपलब्ध होण्यासाठी सुमारे एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे बाजारात तुरीसह डाळीचे दरही वधारण्याची शक्यता व्यापायातून वर्तविली जात आहे.

नव्या तुरीला मिळावा भाव...

जवळपास एक ते दीड महिन्यात नवी दूर उपलब्ध होणार आहे. या तुरीला समाधानकारक भाव मिळण्याची अपेक्षा आहे. यंदाही तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहेत

पिकलेच नाही; पैसा कसा मिळणार?

पावसाचा लहरीपणा दरवर्षी पिकांच्या मुळावर राहत आहे. गतवर्षीं ऐन भरात असताना तुरीचे पीक वाळले. त्यामुळे शेंगा परिपक्व होण्याआधीच वाळून गेल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली. अशा परिस्थितीत भाव वाढूनही शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. - नंदू कन्हाळे, शेतकरी

तुरीला यंदा समाधानकारक भाव मिळाला; परंतु गतवर्षी उत्पादनात प्रचंड घट झाली आणि यंदाही तीच परिस्थिती आहे. अत्यल्प पावसामुळे तुरीची वाढ झाली नाही, त्यातच अनेक शेतकऱ्यांची तूर वाळून गेली आहे. जी काही आहे त्या तुरीवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे यावर्षीही उत्पादन घटण्याची शक्यता आहे.- रामेश्वर कव्हळे, शेतकरी 

कोणत्या बाजार समितीत काय भाव?

बाजार समिती भाव (प्रति क्विंटल)

हिंगोली ११,२००

वसमत ११,४००

कळमनुरी ११,१००

सेनगाव ११,२००

औंढा नागनाथ ११,०००

जवळा बाजार ११,२००

टॅग्स :तूरशेतकरीमार्केट यार्डबाजार