Join us
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत प्रथमच सोयाबीनच्या दरात अचानक वाढ कशामुळे झाली? अजून किती दिवस तेजी राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:12 IST

soybean market rate जवळपास तीन ते साडेतीन वर्षाच्या दीर्घ मंदीनंतर राज्यातील सोयाबीनच्या भावाने मोठी झेप घेतली आहे.

soybean market rate जवळपास तीन ते साडेतीन वर्षाच्या दीर्घ मंदीनंतर राज्यातील सोयाबीनच्या भावाने मोठी झेप घेतली आहे.

अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर थेट ५,१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला असून, व्यापारी वर्गाकडून येत्या काही दिवसांत हा दर ५५०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दीर्घ काळ कमी दराचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही भाववाढ दिलासादायक वाटत असली, तरी प्रत्यक्षात या तेजीचा फायदा बहुतांश शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे वास्तव आहे.

उपलब्ध माहितीनुसार, जवळपास ७५ टक्के शेतकऱ्यांनी आपला सोयाबीनचा माल यापूर्वीच कमी दरात विकल्याचे सांगितले.

उत्पादन खर्चात सातत्याने वाढ, कर्जाचा ताण आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे अनेक शेतकऱ्यांना साठवणूक करणे शक्य झाले नाही.

परिणामी, दर कमी असतानाच त्यांनी माल विकण्याचा निर्णय घेतला. आता दर वाढले असले, तरी हातात विक्रीसाठी साठा नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.

दुसरीकडे, व्यापारी आणि साठेबाजांकडे साठवलेला माल असल्याने भाववाढीचा लाभ त्यांनाच अधिक होणार आहे. शेतकरी संघटनांकडून यावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी शेतकऱ्यांना साठवणूक सुविधा, बाजारभावाची अचूक माहिती आणि योग्य धोरणात्मक पाठबळ देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, पुढील काही दिवसांत सोयाबीनचे दर आणखी वाढल्यास उरलेल्या अल्प शेतकऱ्यांना काहीसा फायदा होण्याची शक्यता असली, तरी एकूणच ही तेजी शेतकरी वर्गासाठी संमिश्र ठरत आहे.

नाफेडवर ५३२८ रुपये दर◼️ जिल्ह्यातील नाफेड खरेदी केंद्रावर ५,३२८ रुपये हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात येते. मात्र, सोयाबीन दरात वाढ झाल्याने चित्र बदलले आहे.◼️ समित्यांमध्येही सोयाबीनला समाधानकारक दर मिळताना दिसत आहे. आगामी काळात हे दर साडेपाच हजारांवर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

१५ दिवसांत लक्षणीय वाढ◼️ गेल्या १५ दिवसांत सोयाबीनच्या दरात लक्षणीय वाढ झाली. यापूर्वी ४,६०० ते ४,७०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान असलेले सोयाबीनचे भाव थेट ५,१०० रुपयांवर पोहोचले आहेत.◼️ त्यामुळे अवघ्या १५ दिवसांत सुमारे ४०० ते ५०० रुपयांची वाढ झाली. झपाट्याने झालेल्या भाववाढीमुळे बाजारात पुन्हा एकदा सोयाबीन चर्चेचा विषय ठरले आहे.

भाववाढीमागे काय कारणे?◼️ यंदा अपेक्षेपेक्षा उत्पादनात घट झाल्याने बाजारात मालाची आवक कमी आहे. दुसरीकडे, खाद्यतेल उद्योगाकडून सोयाबीनला मागणी वाढली आहे.◼️ आंतरराष्ट्रीय बाजारातील २ खाद्यतेल दरातील चढ-उतार व आयातीवरील परिणामही देशांतर्गत बाजारावर प्रभाव टाकत आहेत.◼️ शिवाय, व्यापाऱ्यांकडून साठवणूक करून ठेवलेला माल हळूहळू बाजारात येत असल्याने दरांना आधार मिळत आहे.

पुढील काही दिवस दरात तेजी राहणार◼️ सध्याची बाजाराची स्थिती पाहता, सोयाबीनच्या दरात पुढील काही दिवस तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.◼️ बाजारात मालाची आवक मर्यादित असून, मागणी स्थिर ते वाढती आहे.◼️ शिल्लक साठा कमी होत चालल्याने व्यापारी वर्गाकडून खरेदीचा ओघ वाढण्याची शक्यता आहे.◼️ सोयाबीनचे दर ५,५०० रुपयांवर जाऊ शकतात.

शेतकऱ्यांनी आधीच विकला आपला माल◼️ जवळपास तीन ते साडेतीन वर्षांच्या प्रदीर्घ मंदीनंतर सोयाबीनच्या बाजारभावांनी अखेर पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे.◼️ अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनला ५,१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून, व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत हा दर ५,५०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.◼️ मात्र, जवळपास ७५ टक्के शेतकऱ्यांनी आपला माल आधीच कमी दरात विकला आहे

साठेबाजांचे फावणार?◼️ सध्याच्या भाववाढीमुळे साठेबाजांचाच फायदा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांकडे माल कमी आहे.◼️ सगळा माल व्यापारी व साठेबाजांकडे आहे. त्यामुळे दरवाढीचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांऐवजी साठेबाजांना होऊ शकतो.

अधिक वाचा: दुधनी बाजार समितीत तूर व सोयाबीनला हमीभावापेक्षा जादा दर? वाचा काय मिळाला दर?

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीशेती