Join us

Washim Bajar samiti: 'या' बाजार समितीमधील धान्य खरेदी का झाली बंद वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 17:11 IST

Washim Bajar samiti: वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा राज्यभरात नावलौकीक आहे. याठिकाणी वाशिमच नव्हे; तर इतरही जिल्ह्यातील शेतमाल विक्रीसाठी आणला जातो. शेतमाल विक्रीसाठी शेतकरी येतात परंतु काही कारणास्तव बाजारसमिती बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. (Washim Bajar samiti)

सुनील काकडे

शासकीय उदासीनता कायम असल्याने शेतकऱ्यांना यंदा पीक कर्जमाफी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून, शेती व्यवसायावरील संकटाच्या या काळात काही व्यापाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांची पिळवणूक करणे सुरू केली आहे.

त्यातच शुक्रवारी 'गुड फ्रायडे'ची सुट्टी मिळूनही शनिवारी धान्य खरेदी बंद ठेवण्यात आली. रविवारीसुद्धा बाजार बंद राहणार असल्याने या प्रकारामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. (Washim Bajar samiti)

वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा राज्यभरात नावलौकीक आहे. याठिकाणी वाशिमच नव्हे; तर इतरही जिल्ह्यातील शेतमाल विक्रीसाठी आणला जातो. (Washim Bajar samiti)

असे असताना धान्य खरेदीचा परवाना रद्द झालेल्या व्यापाऱ्यांसह खासगी बाजार समित्यांशी जुळलेल्या अन्य काही व्यापाऱ्यांनी मनमानीचे धोरण अवलंबून वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनासोबतच शेतकऱ्यांनाही त्रस्त करणे सुरू केले आहे.(Washim Bajar samiti)

दरम्यान, जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्या बाजार समित्यांमधील व्यवहार सुरू असताना, १९ एप्रिल रोजी सुट्टीचा अर्ज सादर करून धान्य खरेदी बंद ठेवणे, हा त्यातीलच एक प्रकार असल्याचा संतप्त सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

खासगी बाजार समित्यांमध्ये धान्य खरेदी जोरात

* वाशिम येथे सर्व सुविधांयुक्त कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यान्वित असताना अनेकांनी खासगी बाजार समित्या थाटल्या आहेत. ह्या बाजार समित्यांमध्ये धान्य खरेदी नियमितपणे जोरात सुरू असते.

* अर्थात कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्यास शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खासगी बाजारात माल विकावा लागतो, ही बाब संबंधितांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे बोलले जात आहे.

हळद विक्रीच्या दिवशीच व्यापाऱ्यांची सुटी का ?

बाजार समितीमध्ये आठवड्यातून केवळ एकदा, शनिवारी हळद विक्रीचे दालन खुले करून दिले जाते. नेमक्या याच दिवशी व्यापाऱ्यांनी सुटी का घ्यावी, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

'मार्च एण्ड' मुळे सहा दिवस बाजार समिती राहिली बंद

'मार्च एण्ड'चे कारण समोर करून धान्य खरेदी ५ ते ६ दिवस बंद होती; त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी बाजार समित्यांमध्ये मिळेल त्या दराने शेतमाल विकावा लागला. ३ एप्रिलपासून व्यवहार सुरू झाला. त्यानंतर १० एप्रिल रोजी भगवान महावीर जन्मकल्याणकची सुटी आली. १२ एप्रिलला हनुमान जयंती, १३चा रविवार आणि १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमुळे बाजार समिती बंद होती.

१८ एप्रिलपासून स्थिती झाली पुन्हा 'जैसे थे'! १८ एप्रिल रोजी 'गुड फ्रायडे'ची सुटी आली. १९ एप्रिलला, शनिवारी धान्य खरेदी सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु व्यापाऱ्यांनी सामूहिक अर्ज दाखल करून सुटी घेतली. २० एप्रिलचा रविवार असल्याने याही दिवशी धान्य खरेदी होणार नाही. ही बाब अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक ठरत आहे.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वजन काटे तुलनेने जुने झाले आहेत. यामुळे मालाच्या वजनात घट येत आहे. बाजार समिती प्रशासनाने हे काटे बदलून द्यावे, या मागणीसाठी शनिवारी व्यापाऱ्यांनी धान्य खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, हीच व्यापाऱ्यांची देखील भूमिका आहे.  - राजेशकुमार चरखा, व्यापारी

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरळीत सुरू राहावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. बाजार समितीशी निगडित व्यापारी देखील शेतकऱ्यांप्रती सहकार्याची भूमिका ठेवून आहेत. शनिवारी व्यापाऱ्यांचा सामूहिक अर्ज आल्यानेच बाजार समिती बंद ठेवावी लागली.  - महादेवराव काकडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशिम

हे ही वाचा सविस्तर : Tur Harbhara Market: तूर, हरभऱ्याची दरकोंडी कायम; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजार समिती वाशिमबाजारमार्केट यार्ड