विनायक चाकुरे
उदगीर : शेतकऱ्याला योग्य भाव देण्यासाठी उदगीरबाजार समितीने मागील काही दिवसांपूर्वी खरेदीदार व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालावर बाजार समितीकडून आकारण्यात येणारी मार्केट फीस ३३ टक्क्यांनी कमी करण्याचा ठराव घेतला आहे. (Udgir Bajar Samiti)
हा ठराव म्हणजे बाजार समितीचा धाडसी निर्णय समजला जात आहे. परंतु हा ठराव घेऊन अनेक दिवस झाले असले तरी त्याची अंमलबजावणी का होत नाही, असा प्रश्न व्यापारी उपस्थित करीत आहेत. अंमलबजावणी झाल्यास शेतकऱ्याला जास्तीचा दर मिळू शकतो. (Udgir Bajar Samiti)
उदगीर बाजार समिती ही तीन राज्यांच्या सीमेवर वसलेली मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणी कर्नाटक, तेलंगणा व शेजारच्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल मोठ्या प्रमाणात येतो. याठिकाणी शेतीवर प्रक्रिया करणारी कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे. (Udgir Bajar Samiti)
माल कमी पडतो म्हणून येथील व्यापाऱ्यांना अनेकदा इतर बाजारात जावे लागते. उदगीर बाजार समितीने मार्केट यार्डमध्ये व्यापाऱ्याने शेतकऱ्याचा माल खरेदी केल्यानंतर त्यावर बाजार समिती मार्केट फीस आकारते. (Udgir Bajar Samiti)
६० तूर प्रक्रिया करणाऱ्या ६० डाळ मिल, हरभऱ्यावर चालणारे २० कारखाने, करडई व सूर्यफुलावर चालणारे ७ ऑइल मिल उदगिरात आहेत.
७५ टक्के मार्केट फीस
* सध्या खरेदी किंमतीवर ७५ पैसे मार्केट फीस बाजार समिती व्यापाऱ्याकडून आकारले जाते. बाजार समितीमध्ये उघड बोली पद्धतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. स्पर्धात्मक बोली पद्धतीने व्यवहार होत असल्याने व्यापारी इतर खर्चासोबत मार्केट फीसचा सुद्धा हिशोब करून शेतमालाची किंमत ठरवतो.
* सध्या एक क्विंटल तूर ७ हजार रुपये दराने खरेदी केल्यास ५३ रुपये बाजार समितीला द्यावे लागतात. बाजार समितीने २५ पैसे मार्केट फीस कमी करून ५० पैसे मार्केट फीस आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास ३५ रुपयेच बाजार समितीला मार्केट फीस स्वरूपात द्यावे लागणार आहेत.
शेतमालावर प्रक्रिया करणारी मोठी कारखानदारी
* येथील बाजारात येणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतमालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे.
* सोयाबीनवर प्रक्रिया करणारे ३ कारखाने, तुरीवर प्रक्रिया करणाऱ्या ६० दालमिल, हरभऱ्यावर चालणारे २० कारखाने, करडी व सूर्यफुलावर चालणारे ७ ऑइल मिल, चिंचुक्यावर प्रक्रिया करणारा एक कारखाना असे मोठ्या प्रमाणावर कारखानदारी असल्याने याठिकाणी शेतमालाला चांगला भाव मिळतो.
* बाजार समितीने मार्केट फीस कमी करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्याला अधिकचा दर मिळू शकतो.
पाठपुराव्याअभावी अंमलबजावणी नाही
* बाजार समितीने मार्केट फीस ७५ पैशावरून ५० पैसे काढण्याचा ठराव घेतला. तब्बल ३३ टक्के मार्केट फीस कमी करण्याचा ठराव घेऊन धाडसी निर्णय घेतला.
* यामुळे बाजार समितीचे कदाचित वार्षिक उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. परंतु शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळाला तर इतर बाजारपेठेत जाणारा माल या बाजारपेठेत आल्यानंतर होणारी तूट भरून निघू शकते.
* परंतु येथील व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे योग्य तो पाठपुरावा केला नाही व समितीने शासकीय स्तरावर पाठपुरावा केल्या नसल्याचे दिसून येते.
मार्केट फीस कमी होण्याचा फायदा प्रत्यक्षपणे खरेदीदार व्यापाऱ्यांना होणार आहे. यासाठी यार्डातील खरेदीदार व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. अडत असोसिएशन अशा व्यापाऱ्यांना बैठक घेऊन सहकार्य करण्यास तयार आहे. - श्रीधर बिरादार, अध्यक्ष अडत असोसिएशन, उदगीर
मार्केट फीस कमी करण्याचा ठराव बाजार समितीने घेतला आहे. याबाबत शासकीय स्तरावर पत्रव्यवहार करून व पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. - प्रदीप पाटील, प्रभारी सचिव, बाजार समिती, उदगीर