अलीकडच्या काळात हळदीचे भाव बेभरोशाचे झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही फटका बसत आहे. त्यामुळे हळदीला 'एनसीडीएक्स'च्या वायदा बाजारातून मुक्त करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी करीत २२ ऑगस्टपासून हिंगोली येथील हळद मार्केट यार्ड बंद ठेवले होते. आता २ सप्टेंबरपासून व्यवहार पूर्ववत होणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली असून, यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मराठवाड्यासह विदर्भात हळद खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात हंगामात पाच ते दहा हजार क्विंटलची आवक होते. सध्या दीड ते दोन हजार क्विंटल हळद विक्रीसाठी येत आहे. परंतु, भावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांसह खरेदीदार व्यापारी हैराण झाले आहेत. काही तासांच्या फरकाने क्विंटल मागे दोनशे ते पाचशे रुपयांचा चढ-उतार पहायला मिळतो. परिणामी, नुकसानीला सामोरे जावे लागते.
त्यामुळे हळदीला 'एनसीडीएक्स'च्या वायदा बाजारातून वगळण्याची मागणी जोर धरत आहे. त्याकरिता २२ ऑगस्टपासून हळदीची खरेदी-विक्री बंद ठेवण्यात आली होती. परंतु, बंद काळात आर्थिक निकड असलेल्या शेतकऱ्यांना खुल्या बाजारात पडत्या भावात हळद विक्री करावी लागत होती. त्यामुळे २ सप्टेंबरपासून हळद मार्केट यार्ड खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हळदीचा लिलाव पूर्ववत होणार आहे. यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.