Join us

Tur Bajar Bhav : तुरीसाठी दुधनी बाजार फेमस मिळतोय सर्वाधिक भाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 16:03 IST

दुधनीच्या बाजार समितीत शेतमालाला इतर बाजार समित्यांपेक्षा उच्चांकी दर दिल्याने सोलापूरसह शेजारील पाच जिल्ह्यांतील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी दुधनीच्या बाजार समितीला पसंती देत आहेत.

चपळगाव : दुधनीच्या बाजार समितीत शेतमालाला इतर बाजार समित्यांपेक्षा उच्चांकी दर दिल्याने सोलापूरसह शेजारील पाच जिल्ह्यांतील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी दुधनीच्या बाजार समितीला पसंती देत आहेत.

याठिकाणी तुरीची विक्री सुरू झाली असून, मार्केट कमिटीत लिलावात प्रतिक्विंटल १०,३७० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. सोलापूर, विजयपूर, कलबुर्गी, धाराशिव, लातूर आदी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी यावर्षी उच्चांकी दर दिलेल्या दुधनीच्या मार्केट कमिटीमध्ये खरीप हंगामातील पिके विकली आहेत.

यामध्ये विशेषतः मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, तूर आदी पिके मोठ्या प्रमाणावर विकली गेली आहेत. तुरीची आवक दुधनीच्या मार्केटमध्ये होत आहे. शासनाचा हमीभाव ७,७५० रुपये असूनही जास्ती किमतीने याठिकाणी तूर विकली गेली आहे.

मागील वर्षी अत्यल्प पावसामुळे तुरीचे कमी उत्पादन झाले आहे. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून तूरडाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. म्हणून अजूनही तुरीचे भाव वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

तुरीच्या व्यतिरिक्त उडिदाला ७,४०० हमीभाव असताना हंगामात ९,००० तर सोयाबीनला ४,३०० हमीभाव असताना ५,००० प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. तर मुगाला ८,६०० इतका हमीभाव असताना ९,०००च्या वर दर मिळाला होता.

गतवर्षी प्रमाणापेक्षा कमी पाऊस पडल्याने खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले; पण तरीही आलेल्या पिकांना व्यवस्थित दर मिळत असल्याने अलीकडच्या काही वर्षांत सोलापूरसह शेजारील जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा ओढा दुधनीच्या मार्केट कमिटीकडे वाढल्याचे दिसत आहे.

मागील वर्षी या दुधनी मार्केट कमिटीत जिल्ह्यातील इतर मार्केट कमिटीपेक्षा मोठ्या प्रमाणावर उडदाची विक्रमी आवक झाली होती.

शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नगेल्या अनेक वर्षांपासून दुधनी मार्केट कमिटीत शेतकऱ्यांच्या हितासाठी व्यापार सुरू आहे. गतवर्षी अपेक्षेपेक्षा जास्ती शेतकऱ्यांनी याठिकाणी मोठ्या विश्वासाने व्यवहार केले आहेत. यापुढील काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करणार आहोत, असे सभापती अप्पू परमशेट्टी यांनी सांगितले.

शेतकरी संपूर्ण वर्ष काबाडकष्ट करतो. शेतकऱ्यांचे हित जोपासत व्यापार प्रक्रिया पार पडते. याठिकाणी चाळणी न करता काटा करून जागेवरच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाते. म्हणूनच शेतकरी मोठ्या आशेने दुधनीच्या मार्केटकडे येतात. ही पद्धत शेतकऱ्यांना परवडते. - एस. एस. स्वामी, सचिव, दुधनी बाजार समिती

टॅग्स :तूरबाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती