Join us

Tomato Market : टोमॅटोचे गणित बिघडण्याचे काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:39 IST

Tomato Market: यंदा भाजीपाला उत्पादनातून उन्नती साधता येईल, या आशेने शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाच्या लागवडीला प्राधान्य दिले. परंतू त्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. टोमॅटोच्या दरात का घसरण झाले ते जाणून घ्या सविस्तर.

सध्या बाजारपेठेत (Market) सर्वच भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. टोमॅटोचे (Tomato) दर कमालीचे पडल्याने बळीराजाचे टेन्शन वाढले आहे. अकोला शहरातील बाजारात दहा रुपयांमध्ये एक किलो टोमॅटो विकले जात आहेत.

दर उतरल्याने जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. पाच रुपये किलो, हा काय दर झाला?, असा सवाल शेतकरी करीत आहेत. सातत्याने भाजीपाल्याचे दर पडत असताना, शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

करावे तरी काय, उत्पादन खर्च निघणार तरी कसा? असे नानाविध प्रश्न सतावत आहेत. भाजीपाल्याची शेती तोट्यात येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

दर गडगडले व बजेटही

यंदा भाजीपाला उत्पादनातून उन्नती साधता येईल, या आशेने शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाच्या लागवडीला प्राधान्य दिले. बहुतेक भाजीपाल्याचे दर मातीमोल झाले आहेत. त्यातच टोमॅटो पिकाची अवस्था किरकोळ बाजारात अतिशय बिकट आहे.

टोमॅटो सध्या १० रुपयांना एक किलो विकले जात आहेत. शेतकऱ्यांनी रात्रंदिवस हाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेत पिकाची जोपासना केली. कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.

निर्यातीला प्राधान्य देण्याची गरज

* भाजीपाला विक्रीसाठी शासनाकडून हमीभाव निश्चित नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल दराने माल विकावा लागतो.

* व्यापाऱ्यांनी निर्यात धोरणांवर भर दिल्यास शेतकऱ्यांचे भले होण्याची शक्यता आहे.

आणखी भाव पडणार

टोमॅटोच्या दरात कमालीची घसरण झाली आहे.आणखी काही दिवस दर गडगडण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

महागडे बियाणे घेऊन लागवड केली. किडींचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता वारंवार फवारणी करावी लागली. मजुरीही वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. टोमॅटोला ठोक बाजारात ३ ते ४ रुपये किलोने दर मिळत आहे. टोमॅटो विक्रीतून शेतकऱ्यांचा उत्पादन वा वाहतूक खर्च तर दूरच, साधा तोडणी खर्चही निघत नाही. - शरद गिर्हे, शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Watermelon Tips : लालेलाल टरबूज नैसर्गिक की कृत्रिम? कसे ओळखणार वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रटोमॅटोशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्ड