Join us

यंदा तिखट होईल मस्त; मिरची उत्पादन व आवकेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 16:12 IST

गतवर्षी मिरचीला मिळालेला भाव लक्षात घेऊन त्याची लागवड खूपच मोठ्या प्रमाणात वाढली. यंदा कर्नाटकात मिरचीचे उत्पादन प्रचंड वाढल्याने दर मात्र घसरले आहेत

खरंतर दररोजच्या स्वयंपाकात चटणी खूपच महत्त्वाचे असते. पण ही चटणी करायची म्हटलं तर मिरची मसाल्याचे दर ऐकून तोंड भाजते की काय? अशी स्थिती होते. यंदा मात्र मिरचीचे दर बरेच उतरल्याने चटणी स्वस्त होणार असे दिसते. यासाठी ग्राहक लागणारा मसाला जरी दुकानातून खरेदी करत असला तरी मिरचीची खरेदी मात्र रस्त्यावर करताना दिसत आहे.

सध्या उन्हाळ्याच्या झळा वाढलेल्या आहेत. त्यातही चटणी करण्याची लोकांची धावपळ सुरू झाली आहे. मिरची-मसाले विक्री करणारी पारंपरिक दुकाने यासाठी सज्ज आहेत. पण त्याचबरोबर रस्त्यावर मिरची विक्री करणाऱ्या परप्रांतीयांचीही कमी नाही.

दुकानातील मिरचीच्या दरात अन् रस्त्यावरील परप्रांतीयांकडून मिळणाऱ्या मिरचीच्या दरात चांगली तफावत असल्याने ग्राहक रस्त्यावर मिरची खरेदी करण्यास पसंती देत आहेत. रस्त्यावर विक्री होणारी मिरची १८० ते २०० रुपये किलो दराने मिळत आहे. तर यंदा चटणीचे बजेट कमी होणार असल्याने महिला ग्राहकांच्यातून समाधान व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी होत आहे.

मिरचीचे प्रकार• गुंटूर : आंध्र प्रदेश मध्ये उत्पादित झालेली ही मिरची आपल्याकडे विक्रीसाठी येते. त्याला आपल्याकडे गुंटूर असे म्हणतात. ती खूपच तिखट व जास्त लाल असते.• बेडगी : कर्नाटक राज्यात उत्पादित झालेली ही मिरची आपल्याकडे विक्रीसाठी येते. त्याला बेडगी मिरची म्हणून ओळखले जाते. ती लाल असते पण तुलनेने तिखट नसते.• बेडगी-हायब्रीड : गुजरात राज्यात उत्पादित झालेली ही मिरची बेडगी हायब्रीड म्हणून ओळखली जाते. वरील दोन्ही मिरचीच्या तुलनेत ती गुणवत्तेने कमी मानली जाते.

उत्पादन वाढल्याने दर घसरले• गतवर्षी मिरचीला मिळालेला भाव लक्षात घेऊन त्याची लागवड खूपच मोठ्या प्रमाणात वाढली. यंदा कर्नाटकात मिरचीचे उत्पादन प्रचंड वाढल्याने दर मात्र घसरले आहेत.• याचा ग्राहकांना फायदा होणार असला तरी उत्पादक शेतकऱ्यांना मात्र फटका सहन करावा लागणार आहे.

मसाल्यांच्या दरात १५ ते २० टक्के वाढ गतवर्षीच्या तुलनेत मसाल्यांच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. पण चटणी करताना त्याचा फारसा विचार ग्राहक करताना दिसत नाही.

एक किलोसाठी चौदाशे रुपये खर्चगतवर्षी १ किलो चटणी करण्यासाठी सुमारे १७०० ते १८०० रुपये खर्च येत होता. यावर्षी मिरचीचे दर उतरल्याने १ किलो चटणी साठी १३०० ते १४०० रुपये खर्च येत आहे.

टॅग्स :मिरचीबाजारमार्केट यार्डकर्नाटकशेतकरी