Join us
Daily Top 2Weekly Top 5

तासगावातील बाजारसमितीत बेदाणा उधळणीला लगाम झाला हा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 15:30 IST

बेदाणा सौद्यावेळी केवळ साडेसातशे ग्रॅमपर्यंतच तूट धरण्याचा एकमुखी निर्णय गुरुवारी तासगाव बाजार समितीने बोलावलेल्या अडते व व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

तासगाव : बेदाणा सौद्यावेळी केवळ साडेसातशे ग्रॅमपर्यंतच तूट धरण्याचा एकमुखी निर्णय गुरुवारी तासगाव बाजार समितीने बोलावलेल्या अडते व व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. जादा तूट होत असेल, तर त्याचे पैसे अडत्यांनी धनादेशाद्वारे शेतकऱ्यांना देण्याचा निर्णयही यावेळी झाला. त्यामुळे बेदाणा उधळणीला लगाम बसणार आहे.

या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची ग्वाही अडत्यांनी यावेळी दिली. तासगाव बाजार समितीत सौद्यातील बेदाण्याची उधळण होऊन शेतकऱ्यांची लूट होत होती. याबाबत 'लोकमत'मधून 'व्यापार बेदाण्याचा शेतमालाच्या लुटीचा' ही वृत्तमालिका प्रसिद्ध झाली. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत सातत्याने 'लोकमत'मधून पाठपुरावा केला होता.

अखेर बाजार समितीच्या प्रशासनाने गुरुवारी यावर तोडगा काढण्यासाठी व्यापारी-अडत्यांची बैठक घेतली. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सौद्यावेळी बेदाण्याच्या उजळणीतून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याकडे 'लोकमतने' लक्ष वेधले होते.

त्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या संचालक मंडळाने गुरुवारी अडते व व्यापाऱ्यांची बैठक घेतली. सभापती युवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी संचालक रवींद्र पाटील, महादेव पाटील, सुदाम माळी, कुमार शेटे, आर. डी. पाटील यांच्यासह अडते, व्यापारी उपस्थित होते.

दिवाळीनंतर २१ दिवसांत पैशाचा नियमशेतकऱ्यांना बेदाणा विक्री झाल्यानंतर वेळेत बिल मिळत नाही. २१ दिवसांत बिल द्यावे, अशी भूमिका संचालकांनी घेतली. मात्र, दिवाळीपर्यंत २५ दिवसांचा नियम कायम ठेवावा. त्यानंतर २१ दिवसांत बिल देण्याची ग्वाही अडत्यांनी दिली. अडते व व्यापाऱ्याऱ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना सभापती पाटील यांनी दिल्या.

असा झाला निर्णयबेदाणा उधळणीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे महादेव पाटील आणि आर. डी. पाटील यांनी सांगितले. अनेक व्यापाऱ्यांकडून दोन किलोपेक्षा जास्त तूट धरली जात असल्याची माहिती सभापती पाटील यांनी दिली. त्यामुळे सर्वमान्य तोडगा काढण्याचा निर्णय यावेळी झाला. अडत्याशी झालेल्या चर्चेनंतर सौद्यात बेदाण्याची कितीही तूट आली तरी साडेसातशे ग्रॅम तूट धरण्यात यावी. त्यापेक्षा जास्त तूट झाली तरी शेतकऱ्याला त्याचा भुर्दंड बसू देऊ नये, वाढीव तुटीचे पेमेंट अडत्याने स्वतः धनादेशाद्वारे द्यावे, असा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :बाजारशेतकरीद्राक्षेतासगाव-कवठेमहांकाळशेतीमार्केट यार्ड