Join us

आठवडाभराच्या बंद नंतर हळदीचा लिलाव सुरू होताच 'पिवळ्या सोन्या'ची चमक उतरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 09:56 IST

Halad Bajar Bhav : पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीचा लिलाव २ जून रोजी हिंगोली येथील मार्केट यार्डात आठवडाभराच्या बंदनंतर सुरळीत झाला. परंतु, क्विंटलमागे सुमारे एक ते दीड हजाराने घसरण झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली.

पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीचा लिलाव २ जून रोजी हिंगोली येथील मार्केट यार्डात आठवडाभराच्या बंदनंतर सुरळीत झाला. परंतु, क्विंटलमागे सुमारे एक ते दीड हजाराने घसरण झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली.

मराठवाड्यासह विदर्भात हळद खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेले येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संत नामदेव हळद मार्केट यार्डातील बीट गत व्यापाऱ्यानी खरेदी केलेल्या शेतमालाच्या थप्प्या हटविण्यासाठी आठवडाभरापासून बंद होते. सोमवारपासून मार्केट यार्डातील व्यवहार पूर्ववत झाले असून, या दिवशी जवळपास चार हजार क्विंटल हळदीची आवक झाली होती.

सकाळी ११:०० वाजेच्या सुमारास बीट पुकारण्यास प्रारंभ झाला. यात १० हजार ८०० ते १३ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. सरासरी १२ हजारापर्यंत भाव पोहोचला. गतवर्षी हळदीला सरासरी १४ ते १५ हजार रुपयांचा भाव मिळाला होता. यंदाही समाधानकारक भाव मिळण्याची शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, हंगामाच्या प्रारंभापासूनच गतवर्षीच्या तुलनेत पडता भाव मिळाला.

मार्च, एप्रिलमध्ये सरासरी १३ ते १३ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव गेला होता. त्यात आता एक ते दीड हजार रूपयांची घसरण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत हळद विक्री केली नव्हती. परंतु, भावात वाढ होण्याऐवजी घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे.

हेही वाचा : जिद्दीला पेटला डी.एड धारक अन् तोट्याची शेती झाली फायद्याची; अमोदेच्या निवृत्तीरावांची वाचा 'ही' प्रेरणादायी कहाणी

टॅग्स :बाजारहिंगोलीशेतकरीशेती क्षेत्रमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती