अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख कांदाबाजार पैकी एक असलेल्या श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच टाकळीभान उपबाजार येथील मोकळा कांदा बाजार हमालांच्या वाराई मुद्द्यावरून उद्भवलेल्या वादामुळे आज गुरुवार (दि.०७) पासून बेमुदत बंद करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी, व्यापारी, खरेदीदार, हमाल, मापाडी आणि इतर संबंधित घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
बाजार समितीच्या वतीने (दि.६) रोजी दुपारी ३.३० वाजता मुख्य कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक सभापती सुधीर वेणुनाथ नवले आणि सचिव साहेबराव वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला सर्व घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीमध्ये हमाल, मापाडी व व्यापाऱ्यांकडून वाराई दरांबाबत सुरू असलेल्या तक्रारींवर चर्चा करण्यात आली. मात्र संबंधित विषयांवर कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने अखेर बाजार समितीने कडक निर्णय घेत मोकळा कांदा मार्केट पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे जाहीर केले.
या बेमुदत बंदमुळे शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी अडचण निर्माण होणार असून बाजार बंद राहिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे व्यापारी व खरेदीदारही अडचणीत आले आहेत.
बाजार समिती प्रशासन आणि हमाल प्रतिनिधींमध्ये पुन्हा एकदा चर्चा व्हावी आणि तात्काळ तोडगा निघावा अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी करत आहेत. अन्यथा या बंदचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यातील कांदा बाजारावर होणार आहे.
नो वर्क, नो वेजेस
सध्या पूर्व व उत्तर भारतात कांद्याचे दर वाढले असून बांगलादेशला निर्यात सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांनी साठवलेला कांदा चढ्या दराने विकण्यासाठी हमालांना हाताशी धरून बाजार समिती बंद करण्याचा डाव रचला आहे. मुळात लूज (मोकळ्या) कांद्याची मापाई, तोलाई आणि काटा पावती शेतकरीच देतो. तर डम्पिंग ट्रॉलीमुळे हमालांचे प्रत्यक्ष कामच नसते. त्यामुळे "नो वर्क, नो वेजेस" नियमप्रमाणे हमाली वा वाराई शेतकऱ्यांनी देण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा अशी मागणी अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांची अडवणूक करणारी असून आम्ही याचा निषेध करतो. - निलेश शेडगे, शेतकरी संघटना अहिल्यानगर.