Join us

लग्नसराईमुळे फुलांचे बाजार तेजीत; सजावट व शुभकार्यासाठी फुलांची मागणी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 12:17 IST

Flower Market : सध्या सर्वत्र लग्नसराईचा धामधुम सुरू आहे. लग्न सोहळा साधा असो की शाही, सजावट, केशरचना आणि पाहुण्यांचे स्वागत या सर्वासाठी फुलांची मागणी अनिवार्य असते. परिणामी, सध्याच्या काळात फुलांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.

सध्या सर्वत्र लग्नसराईचा धामधुम सुरू आहे. लग्न सोहळा साधा असो की शाही, सजावट, केशरचना आणि पाहुण्यांचे स्वागत या सर्वासाठी फुलांची मागणी अनिवार्य असते.

परिणामी, सध्याच्या काळात फुलांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम फुलांच्या दरावरही दिसून येत आहे. फुलांचे दर सुमारे २० टक्क्यांनी वाढले असून, 'फुलांचा गंध' महाग झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

लग्नसराईत वधू आणि वर पक्षातील दोघांनाही सोनं-चांदी, कपडे, जेवण आणि अन्य आवश्यक बाबींसाठी वाढलेल्या खर्चाचा सामना करावा लागत आहे. यामध्ये आता फुलांच्या दरवाढीचीही भर पडली आहे.

त्यामुळे सजावटीसाठी फुले खरेदी करणाऱ्यांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. लग्नसमारंभात फुलांना विशेष महत्त्व असते. लग्नाचा मांडव, स्टेज, वाहन सजावट, महिलांच्या केशरचनेतील गजरे, वधू-वरांचे हार, विशेष वाहन सजावट तसेच पाहुण्यांचे स्वागताच्या सर्व ठिकाणी फुलांचा फुलांच उपयोग होतो.

त्यामुळे सध्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, मात्र कडक उन्हामुळे फुलांचे उत्पादन मर्यादित प्रमाणात होत असल्याने, मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा पडत आहे. परिणामी, बाजारात फुलांचे दर २० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली शहरात राज्यातील आणि शेजारील राज्यांतील विविध भागांतून फुलांची आवक होत असली, तरी वाढती मागणी लक्षात घेता तो पुरवठा अपुरा ठरत आहे. यामुळे ग्राहकांना वाढलेल्या दराचा फटका बसत आहे.

वधू-वराचे हार व सजावट महागली

फुल विक्रेते सध्या मागणीनुसार हार, फुले व सजावटीच्या कामात व्यस्त आहेत. वधू-वराचे हार किमान ५०० ते कमाल ५००० हजार रुपयांपर्यंत बनवून दिले जाते, तर वाहन सजावटीचे दर एक हजार ते १० हजार रुपये आहे.

फुलांचे बाजार दर 

फुलांचे प्रकारकिंमत (प्रति किलो)
गुलाब२०० ते ३००
मोगरा७०० ते ८००
लाल, पिवळा झेंडू१०० ते १२०
अॅस्टर२५० ते ३००
जरबेरा८० ते ९०
जिप्सी२०० ते १००० रूपये प्रति बंडल

डच गुलाब खातोय भाव

• लग्नसमारंभात वधू-वरांनी केलेल्या पेहरावार खुलून दिसेल, अशा हारांसाठी प्रामुख्याने डच गुलाबाला जास्त प्राधान्य दिले जाते. यापृष्ठभूमीवर डच गुलाबाला मागणी अधिक आहे. त्यामुळे या जातीच्या गुलाबाचे भाव वधारलेले आहेत.

• बाजारात २० फुलांच्या डच गुलाबाचे एक बंडल सध्या ४०० रुपयांवर गेले आहे. वधू-वरांच्या मागणीनुसार तत्काळ हार बनवून दिले जातात. शिवाय अगोदरही ऑर्डर घेतले जात आहे. डच गुलाब शिवाय इतर फुलांच्या हारांना देखील मागणी असल्याचे चिखलीतील विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

सध्या फुलांना मोठी मागणी आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत फुलांचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे चढ्या दराने फुले खरेदी करावी लागत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार व नवीन ट्रेंडनुसार हार व सजावट करून देण्यात येते.- बाळकृष्ण नारायण बन्हाटे, हार विक्रेते चिखली.

 हेही वाचा : शेतकरी ताई कामाच्या ओघात स्वतःकडे दुर्लक्ष करू नको; 'या' कर्करोगाचे महिलांमध्ये प्रमाण वाढले

टॅग्स :फुलंबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डबुलडाणाशेतकरीशेतीशेती क्षेत्र