Join us

सीसीआयचे खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेल्या कापसावर मोठे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 12:30 IST

CCI Kapus Kharedi : शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेल्या कापसावर सध्या जिल्ह्यात मोठे संकट आले आहे. नंदुरबार आणि शहादा येथे सुरू असलेले सीसीआयचे खरेदी केंद्र बंद झाले आहे.

शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेल्या कापसावर सध्या जिल्ह्यात मोठे संकट आले आहे. नंदुरबार आणि शहादा येथे सुरू असलेले सीसीआयचे खरेदी केंद्र बंद झाले आहे.

दुसरीकडे, खेडा खरेदीही होत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. साठा करून ठेवलेला कापूस आधीच जागा अडवत असताना आता वाढत्या उष्णतेने तो अधिक कोरडा होऊन वजनात घट होत आहे. यातही ज्या शेतकरी बांधवांचे घर किंवा शेड पत्र्याचे आहे. त्यांना वजनात घट येण्यासह कापसाला आग लागण्याचीही भीती आहे.

जिल्ह्यात यंदा एक लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड झाली होती. जुलै ते ऑक्टोबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले होते.

यामुळे कापूस उत्पादन बऱ्यापैकी होते. भावदेखील चांगला मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती; परंतु सुरुवातीपासूनच सात हजारांपर्यंत दरम्यान भाव असल्याने शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत होते.

नंदूरबार आणि शहादा येथे सीसीआयचे केंद्र सुरू झाल्याने साडेसात हजार दर मिळू लागल्याने या ठिकाणी आवकही वाढली होती. परंतु ही केंद्रेही बंद असल्याने कापूस साठा करण्याशिवाय शेतकरी बांधवांना पर्याय उरला नव्हता. हा साठा केलेला कापूस आता अडचणींमध्ये वाढ करत आहे. कापूस विक्री करावा कोणाकडे, असा प्रश्न सध्या शेतकरी बांधवांसमोर आहे.

गाठी वाढल्या, खरेदी बंद

नंदुरबारातील खरेदी केंद्रावर एक लाख ६० हजार क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. कापूस आणि तयार केलेल्या गाठी ठेवण्यास जागा नसल्याने १६ दिवसांपासून केंद्र बंदच आहे. यामुळे नोंदणीही बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्याचे वातावरण तापण्यास सुरुवात

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या प्रारंभीपासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात होते. याचा परिणाम कापणी केलेल्या पिकांवरही होते. कापसातील ओलावा संपल्यानंतर त्याच्या वजनात घट येण्यास सुरुवात होते.

खासगी व्यापारी देताहेत अपेक्षेपेक्षा कमी भाव

जिनिंग उद्योगांची संख्या जिल्ह्यात चांगली आहे. या उद्योजकांकडून मात्र कापसाला सात हजारांच्या आत भाव दिला जात आहे. हे दर अपेक्षेपेक्षा कमी असल्याने त्या ठिकाणी कापूस देण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.

चार महिन्यांपासून घर कापसाने भरले

जिल्ह्यात यंदा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत कापूस वेचणी पूर्णत्वास आली आहे. वेचणी पूर्ण झाल्यानंतर सीसीआय केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांनी कापूस साठा करून घरात ठेवला होता.

क्विंटलमागे घट किती ?

वेचणीनंतर ओल्या कापसाचे वजन अधिक असते. यामुळे त्याची खरेदी व्यापारी टाळतात. कोरड्या कापूस खरेदीवर भर असतो. अती उष्णतेमुळे कापसात साधारण क्विंटलमागे २०० ग्रॅम घट येते.

सीसीआयचे केंद्र बंद आहे. नोंदणीला अडचणी येत आहेत. ५० क्विंटल कापूस गोडावूनमध्ये पडून आहे. या कापसात उंदीर वाढले आहेत. यामुळे उत्पादन येऊनही नुकसान झाले आहे. सीसीआयचे केंद्र सुरु झाल्यास अडचणी दूर होती. शासनाने केंद्र सुरु करावे. - रवींद्र शंकर पाटील, शेतकरी, परिवर्धा ता. शहादा.

पत्र्याच्या घरातल्या कापसाला जबर दणका?

जिल्ह्यात काही शेतकऱ्यांची घरे पत्र्याची आहेत. काही शेतकऱ्यांनी शेतात किंवा गोठ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये कापूस कुलूपबंद केला आहे. परंतू उष्णतेमुळे पत्रा गरम होवून कापूस कोरडा होतो.

उन्हाचा चटक्याने आर्द्रता घटते; कापूस हलका

पत्र्या शेडमध्ये ठेवलेला कापूस उन्हाच्या चटक्यामुळे कोरडा होत जातो. वातावरणातील कोरडेपणा कापसाचे वजन घटवते. जेवढे दिवस कापूस पत्र्याखाली असेल तशी वजनात घट वाढ असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगतात.

तांत्रिक अडचर्णीमुळे सीसीआयने खरेदी थांबवली आहे. अडचणी दूर झाल्यानंतर पुन्हा सुरळीतपणे केंद्र सुरु होईल. नोंदणी झाल्यानंतर कापूस खरेदी सुरु होईल. - संजय चौधरी, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा.

हेही वाचा : Agriculture Success Story : कृषी शिक्षणाचा होतोय फायदा; तुर उत्पादनात युवराजने मिळविला विशेष हातखंडा

टॅग्स :कापूसशेतकरीशेतीशेती क्षेत्रविदर्भबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती