Join us

Soybean procurement : अडथळ्यांची परिकष्टा करूनही सोयाबीन खरेदी होईना? काय आहे परिस्थिती वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:22 IST

Soybean procurement : राज्यातील बाजार समितीच्या (Market yard) आवारात अडथळ्यांची शर्यत पार करीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू आहे. यातील शेतकऱ्यांचे अनुभव वाचा सविस्तर

संपूर्ण कुटुंब राबराब राबलं, मोठ्या कष्टानं सोयाबीन पिकवलं... चार पैसं जास्तीचं मिळतील म्हणून बाजारात न जाता हमीभाव केंद्रावर सोयाबीन आणलं... इथं आलो तर चार-चार दिवस नंबर येईना... वाहन इथं सोडून घरी जावं तर चोरांची भीती अन् वाहनाजवळच थांबवं तर उपासमार पक्की... अशा शब्दात ७५ वर्षीय शेतकरी रावसाहेब रोहिले यांनी आपली वेदना 'लोकमत ऍग्रो'कडे मांडली.

मायबाप सरकारनं कसल्याही परिस्थितीत सोयाबीन खरेदीचे दिवस वाढवावेत, असं साकडंही त्यांनी शासनाला घातलं.

धाराशिव बाजार समितीच्या (Market yard) आवारात अडथळ्यांची शर्यत पार करीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू आहे. बारदाना (Bardana) तुटवड्याचा अडथळा दूर झाल्यानंतर केंद्राचा काटा हलला.

खुल्या बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षा (Guaranteed Price) कमी दाम मिळत आहे, तर दुसरीकडे हमीभाव खरेदीची मुदतही सरत आली आहे. यातूनच केंद्रांवर शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. वाहनांची रांग लागली आहे.

चार-चार दिवस थांबूनही सोयाबीनचे माप होत नसल्याने शेतकरी घायकुतीला आलेत. वयोवृद्ध शेतकरी रावसाहेब रोहिले वाहनातून शेतीमाल घेऊन आले आहेत. चार दिवस झाले तरी त्यांचा नंबर आला नाही. त्यामुळे सोयाबीन वाहनातच आहे.

धाराशिव येथील सोयाबीन खरेदी केंद्र परिसरात विक्रीसाठी सोयाबीन घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगाच रांगा दिसत आहेत.

शेतकरी मापं शिल्लक...

जिल्ह्यातील २१ हमीभाव केंद्रांवर ३५,४०० शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी आहे. २४ जानेवारीपर्यंत जवळपास १८ हजार शेतकऱ्यांच्या दोन लाख क्विंटल मालाची खरेदी केली असून, १७,६०० शेतकऱ्यांचे जवळपास दोन लाख क्विंटल सोयाबीनचे माप बाकी आहे.

हाती उरलेत चार दिवस

* 'नाफेड'ने सप्टेंबर महिन्यात हमीभावाने सोयाबीनची खरेदी करण्यास सुरुवात केली असून, ३१ जानेवारीपर्यंत खरेदीची मुदत आहे.

* यामुळे नोंदणी केलेल्या निम्म्या शेतकऱ्यांना बेभावाने सोयाबीनची विक्री करावी लागणार आहे.

 * शासनाने मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

* प्रतिदिन हजार रुपये दर वाहनाला बसून द्यावा लागतोय. तेही इथचं थांबलेत. घरी गेल्यास माल चोरीला जाण्याची भीती त्यांना सतावतेय.

* सरकारनं ३१ तारखेला केंद्र बंद न करता मुदत वाढवावी, अशी त्यांची मागणी आहे.

रोहिले यांचे प्रातिनिधिक उदाहरण असले तरी केंद्र परिसरातील अन्य शेतकऱ्यांचीही काही वेगळी अवस्था नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्याबाबत सर्वच शेतकरी आग्रही दिसून येत आहेत.

एक महिन्यापूर्वी मेसेज मिळाला. माल आणल्यानंतर चार ते आठ दिवस उलटून गेले तरी माप होत नाही. नोंदणी केल्यानंतर शासनाने शेतकऱ्यांचा माल वेळेत खरेदी करणे गरजेचे आहे. वेळेत बारदाना देत नसून शेतकऱ्याने स्वतःच्या बारदान्यात आणलेले सोयाबीन घेतले जात नाही. - संदीप कदम, शेतकरी.

हे ही वाचा सविस्तर : Bajara Crop : शेतकऱ्यांनो उन्हाळी बाजरीचे तंत्र जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डशेतकरीशेती