Join us

Soybean Hamibhav Kendra : मराठवाड्यातील विविध हमीभाव केंद्रात काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊयात सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 17:00 IST

आर्द्रतेच्या जाचक अटीमुळे सोयाबीन घरातच ठेवण्याचा निर्णय शेतकरी घेत आहेत. मराठवाड्यातील विविध हमीभाव केंद्रात काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊयात सविस्तर (Soybean Hamibhav Kendra)

Soybean Hamibhav Kendra :

मराठवाड्यात आर्द्रतेच्या जाचक अटीमुळे सोयाबीन घरातच पडून आहे. अधिक आर्द्रतेमुळे हमीभाव केंद्रावर खरेदीची अडचण झाली. केंद्रावर नेले तर नापास होत असल्यामुळे उतारा कमी, उत्पादन खर्चही निघेना, वाहतुकीचा भुर्दंड पडत आहे. सोयाबीन काढणीची मजुरी, सण आणि रब्बीची पेरणी अशा तिहेरी संकटात बहुतांश शेतकरी अडकले आहेत.

त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडे पडेल त्या भावात सोयाबीन विक्री करण्यास सुरुवात केली आहे. हमीभावापेक्षाही खासगी बाजारात भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक  होत आहे.  त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठवाड्यातील विविध हमीभाव केंद्रात काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊयात सविस्तर

नोंदणी २१ हजार शेतकऱ्यांची; खरेदी मात्र १३५५ जणांची !

लातूर बाजारपेठेत सोयाबीनचे दर घसरल्याने धास्तावलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जिल्ह्यात १५ हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. जवळपास महिन्याभरात २१ हजार ३४१ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. परंतु, प्रत्यक्षात १ हजार ३५५ शेतकऱ्यांच्या २२ हजार ४७५ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.

जिल्ह्यातील ४ लाख ९० हजार ९०६ हेक्टरवर नगदी पीक असलेल्या सोयाबीनचा सर्वाधिक पेरा झाला. पीकही चांगले बहरले. परंतु, ऐन काढणीच्या कालावधीत मुसळधार पाऊस झाल्याने सोयाबीनचे नुकसान झाले. डॅमेज सोयाबीनला अत्यंत कमी भाव मिळू लागला.

चांगल्या सोयाबीनला सर्वसाधारण ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे. जिल्ह्यात नाफेडच्या वतीने आधारभूत किंमत योजनेंतर्गत १५ खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सोयाबीनमध्ये आर्द्रता अधिक असल्याने खरेदी ठप्पच होती.

आतापर्यंत १ हजार ३५५ शेतकऱ्यांचे २२ हजार ४७५ क्विंटल सोयाबीन खरेदी झाले आहे. हा शेतमाल १० कोटी ९९ लाख ४८ हजार ३८४ रुपयांचा आहे. खरेदीपोटी ९९३ शेतकऱ्यांना ६ कोटी ६७ लाख ९ हजार ७५८ रुपये अदा करण्यात आले आहेत.

आता वेग येईल

आर्द्रतेमुळे सोयाबीन खरेदी कमी होती. आता वेग येईल. खरेदीनंतर चार-पाच दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत आहे. - विलास सोमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, लातूर

बीड जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोटींचे सोयाबीन खरेदी

शासनाच्या वतीने नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी सुरु असून, दोन महिन्यांत जिल्ह्यातील केंद्रांवर सुमारे ११ कोटी ६४ लाख ६८ हजार ३४४ रुपयांचे २३ हजार ८०७ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे. मागील वर्षी सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ६०० रुपये होता.

२०२४ साठी शासनाने ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. बीड जिल्ह्यात १ ऑक्टोबरपासून ऑक्टोबरपासून नाफेडच्या वतीने ११ तालुक्यांमध्ये २९ केंद्रांवर सोयाबीनची नोंदणी तसेच खरेदी सुरु करण्यात आली. आतापर्यंत १४ हजार ८०१ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली.

सोयाबीन खरेदीची मर्यादा हेक्टरी ९.५ क्विंटल आणि १२ टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रतेची अट आहे. बीड जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यानच्या पावसामुळे सोयाबीनचे बहुतांश ठिकाणी नुकसान झाले. त्यामुळे पिकाचा दर्जाही घसरला आहे. सोयाबीनमधील ओलावा दीड महिन्यानंतरही कमी झालेला नाही.

त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्याकडे सोयाबीन असूनही अटी आणि शर्तींमुळे हमीदराने विक्री करता येत नसल्याची स्थिती आहे. शासनाने आर्द्रतेची अट १२ टक्क्यांवरुन १५ टक्के करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीन खरेदी संबंधीचा आदेश केंद्र सरकारकडून १५ नोव्हेंबर रोजी जारी केल्याचे सांगितले जाते. परंतु अद्याप सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रांना शासनाकडून याबाबत आदेश मिळालेला नाही. तर दुसरीकडे खुल्या बाजारात व्यापाऱ्यांकडून ३ हजार ६०० ते ४ हजार १२० रुपये क्विंटलपर्यंत दर्जानुसार भाव मिळत आहे.'

सोयाबीनच्या पडत्या दरावरून यंदा शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी

हिंगोली जिल्ह्यात १४ शासकीय खरेदी केंद्रे सुरू झाली असून, या केंद्रांवर २८ नोव्हेंबरपर्यंत १८ हजार ८०० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. शासनाने जाहीर केलेल्या ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल या दराने सोयाबीन घेण्यात येत आहे. सोयाबीनच्या पडत्या दरावरून यंदा शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी आहे.

शासनाचा हमीभाव लागवड खर्चाच्या तुलनेत कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, भाववाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीन विक्रीविना किती दिवस ठेवणार? हाही प्रश्न आहे. त्यामुळे शेतकरी आता सोयाबीन विक्रीसाठी बाहेर काढू लागला आहे. जिल्ह्यात एनसीसीएफअंतर्गत १४ खरेदी केंद्रे मंजूर असून, या सर्व केंद्रांवर सोयाबीनची खरेदी केली जात आहे.

आजपर्यंत १८ हजार ८०० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. शासकीय केंद्रांवर सोयाबीन विक्री केल्यानंतर ७२ तासांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येत आहेत. सोयाबीन दर्जेदार असावे, १२ टक्के ओलावा, काडीकचरा असू नये, आदी अटींची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागत आहे. आधीच लागवड खर्चाच्या तुलनेत कमी भाव आणि त्यातही अटींची पूर्तता करावी लागत आहे.

या ठिकाणी खरेदी केंद्र

हिंगोली जिल्ह्यात १४ ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू झाली असून, त्यांत आडगाव, जवळा बाजार, येळेगाव (सोळंके), कळमनुरी, वारंगा, हिंगोली, फाळेगाव, कनेरगाव नाका, उमरा, सिनगी नागा, साखरा, सेनगाव, वसमत व शिवणी खु. या केंद्रांचा समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यात अजूनही शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही

नांदेड जिल्ह्यात शासनाच्या वतीने नाफेडमार्फत १० ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील विविध तालुक्यांत एकूण १४ खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सदर केंद्रांवर अजूनही शेतकऱ्यांचा म्हणावा तेवढा प्रतिसाद दिसून येत नाही.

जिल्ह्यातील केंद्रावर दोन हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे. परंतु आर्द्रतेच्या अटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन या केंद्रावर नापास होताना दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे. सोयाबीन खरेदीची मर्यादा हेक्टरी ९.५ क्विंटल आणि १२ टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रतेची अट ठेवली आहे.

बारदानाअभावी रखडलेली खरेदी पुन्हा सुरू

जालना जिल्ह्यात नाफेडमार्फत १३ ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यातील ११ केंद्रे सुरू झाली असून, त्यावर आजवर १९ हजार ९४ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना क्विंटलमागे सरासरी ४ हजार ८९२ रुपयांचा दर दिला जात आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून केंद्र सरकारने जालना जिल्ह्यात एकूण १३ सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

यापैकी अंबड आणि बहिरगाव येथील केंद्रे सुरू झालेली नाहीत. उर्वरित ११ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ११ हजार ६४४ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी या केंद्रांवर नोंद केली आहे. त्यापैकी गुरुवारी (२८ नोव्हेंबर)पर्यंत ४ हजार ५५४ शेतकऱ्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत.

७ हजार ९० शेतकऱ्यांना मेसेज पाठविणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. जालना, अंबड, भोकरदन, मंठा, माहोरा, राजूर (जवखेड खुर्द), अनवा, बदनापूर, वाटूर, परतूर, जाफराबाद, आष्टी व बहिरगाव या १३ केंद्रांवर शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे.

अंबड व बहिरगाव या ठिकाणच्या दोन केंद्रांवर नोंद होऊनदेखील सोयाबीनची अद्याप खरेदी सुरू झाली नाही. बाहेरील बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी मोर्चा वळवला आहे.

आजघडीला केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करून ४ हजार ८९२ रुपये क्विंटल अशी आधारभूत किंमत दिली जात आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील ११ केंद्रांवर १ हजार १६४ शेतकऱ्यांकडून १९ हजार ९४ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.

धाराशिवमध्ये १०३१ शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी

धाराशिव जिल्ह्यात बारदाना उपलब्ध नसल्याने रखडलेली सोयाबीन खरेदी पुन्हा सुरू झाली. मात्र, पेमेंट चार दिवसांत अपेक्षित असतानाही त्याला उशीर होताना दिसत आहे. आजवर १ हजार ३१ शेतकऱ्यांची २२ हजार  १२ क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे. मात्र, केवळ १४८ शेतकऱ्यांनाच आजवर पेमेंट अदा करण्यात आले आहे.

धाराशिव जिल्ह्यात एकूण १८ खरेदी केंद्रांवरून सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यात येत आहे. आजवर १२ हजार ९७९ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंद करण्यात आली. यापोटी हमीभावानुसार १० कोटी ७६ लाख ८५ हजार १५० रुपये येणे अपेक्षित आहेत. असे असले तरी आतापर्यंत केवळ धाराशिव व दस्तापूर खरेदी केंद्रावरील १४८ शेतकऱ्यांना ६ हजार ३२८ शेतकऱ्यांना ३ कोटी ९ लाख ५६ हजार ५७६ रुपये अदा करण्यात आले आहेत.

पेमेंट प्रक्रिया गतीने, मात्र पुन्हा मंदावली  

यावेळी शेतकऱ्याच्या सोयाबीनची खरेदी झाल्यानंतर त्यांचा शेतमाल गोदामात पोहोचताच चार दिवसांत पेमेंटची प्रक्रिया अवलंबण्यात आली आहे. मात्र, त्यालाही पुन्हा विलंब होताना दिसत आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डमराठवाडाजालनालातूरबीड